Lemon Orchard Agrowon
यशोगाथा

Lemon Orchard Farming : सतरा एकरांतील लिंबूबाग देतेय शाश्‍वत उत्पन्न

Lemon Cultivation : अकोला जिल्ह्यात उमरा येथील मधुकर पुरुषोत्तम खवले यांनी १९९७ च्या सुमारास चाकोरीबाहेर जाऊन या भागात अडीच एकरांत सर्वप्रथम लिंबू लागवड केली. आजगायत या पिकात सातत्य ठेवत १७ एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र विस्तारले आहे.

 गोपाल हागे

Lemon Farming Management : अकोला जिल्हयात अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी उमरा गावचा परिसर आहे. सिंचनाच्या सोयी असल्याने विविध पिकांसाठी हा भाग चांगला मानला जातो. केळी, पपई, संत्रा आदी फळपिकांसह कपाशी, सोयाबीन, विड्याची पाने, पानपिंपरी अशा पिकांची विविधता येथे दिसून येते. अकोट तालुक्यात लिंबूवर्गीय पिकात संत्र्याला प्राधान्य दिले जाते. वर्षानुवर्षे शेतकरी या पिकातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. परंतु याच गावातील मधुकर पुरुषोत्तम खवले यांनी चाकोरीबाहेरचा विचार करीत १९९७ च्या सुमारास अडीच एकरांत लिंबू पिकाची निवड केली.

इतक्या वर्षांचे सातत्य ठेवत मोठ्या चिकाटीने त्यांनी आज १७ एकरांत लिंबाची बाग विकसित केली आहे. खवले यांची एकूण साठ एकर शेती आहे. मात्र त्यातील हे १७ एकर एकेठिकाणी आहे. तेथे पूर्ण लिंबाचीच बाग आहे. उर्वरित सर्व खारपणपट्टा असून, ती शेती मक्त्याने करण्यास दिली आहे.

...अशी विस्तारली लिंबाची बाग

या भागात लिंबाची सर्वप्रथम लागवड केली त्या वेळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खवले यांच्या या प्रयोगाविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. पण न डगमगता त्यांनी वाटचाल सुरूच ठेवली.

सध्या उत्पादन अवस्थेतील १० व २० वर्षांची बाग त्यांच्याकडे पाहण्यास मिळते. तिसरी बाग चार वर्षे वयाची असून, यंदा नवी लागवड केलेल्या बागेत ३३१ झाडे आहेत. १८ बाय १८, २० बाय १८ व २० बाय २० फूट अशा लागवड अंतरावरील बागा आहेत. खवले सांगतात, की लिंबू हे असे पीक आहे की अन्य पिकांच्या तुलनेत देखभाल, मशागत कमी लागते. उन्हाळा, पावसाळ्यात त्याचे तेवढे नुकसान होत नाही.

मजूर कमी लागतात. वर्षाचे दोन्ही बहर पकडून किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न हे पीक हमखास मिळवून देते. त्यांनी सुरुवातीपासूनच काटेकोर नियोजन व व्यवस्थापनावर भर दिला. झाड सरळच वाढेल यासाठी खास निगा ठेवताना रोपाच्या बुंध्याला काठीचा आधार दिला. आज संपूर्ण बागेत एकही झाड वाकडेतिकडे वाढलेले पाहायला मिळत नाही.

एका ओळीत लावलेली बाग दृष्टीस पडते. झाडांना जमिनीपासून तीन फुटांपासून वरती आकार देण्यात येतो. बागेत मध्यभागी एक ओळ मोकळी ठेवली आहे. यामुळे बागेच्या दोन्ही टोकांपर्यंत ये-जा करणे सोपे जाते. शिवाय झाडांना सूर्यप्रकाश, मोकळी हवा मिळते. बागेत कुठलेही तण वाढू देत नाहीत. बाग नियमित स्वच्छ ठेवण्यावर जोर असतो.

पाण्याचे व्यवस्थापन

झाडांना ठिबकद्वारेच पाणी देण्यात येते. झाडाच्या बुंध्यापासून विशिष्ट अंतर ठेवत दोन लॅटरलच्या साह्याने सिंचन करण्यात येते. उमरा भागात पाण्याची प्रचंड कमतरता आहे. सिंचनाच्या सोयी पुरेशा प्रमाणात उभ्या राहू शकलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत खवले यांनी २० वर्षांपूर्वी गावात पहिले शेततळे घेतले. दरवर्षी त्यात लाखो लिटर पाणी जिरवले जाते. शेततळे ‘ओव्हर फ्लो’ झाल्यानंतर शेजारील विहिरीत त्याचे पुनर्भरण केले जाते.

शेततळ्याच्या बाजूला असलेल्या बोअरला पाणी चांगले असून तेथून एक किलोमीटरवर पाइपलाइन करून दुसऱ्या शेतात पाणी नेले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर काटकसरीने केला जातो. संपूर्ण शेतात कुठेही ‘लिकेज’ ठेवलेले नाही. जलसंवर्धनाच्या उद्देशाने शेतांच्या आजूबाजूला असलेल्या नाल्यांचे खोलीकरण करून त्यातील पाणी विहिरींमध्ये सोडले आहे. गावातील अन्य शेतकरी ज्या वेळी पाणी समस्येला सामोरे जात असतात, त्या वेळी डोळस नियोजनामुळे खवले यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळते.

जागेवरच होते विक्री

खवले हस्त व मृग अशा दोन बहरांत उत्पादन घेतात. प्रत्येक बहरात प्रति झाड ६० ते ६५ किलो किंवा त्याहून अधिक उत्पादन मिळते असे ते सांगतात. पूर्वी अकोट येथे लिंबाची विक्री व्हायची. आता व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतो. त्याच्याकरवीच काढणीदेखील होते. अलीकडील चार- पाच वर्षांची सरासरी काढल्यास प्रति किलो ३० रुपये दर मिळतो. यंदा सर्वाधिक ४० रुपये, तर मागील वर्षी २० रुपये दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लिंबू व अन्य शेतीतूनच सारी प्रगती साधली आहे. पक्के घर बांधले. आठ ते १० एकर शेती घेतली असे खवले यांनी सांगितले.

बांधावरील सागवान ठरला लाखमोलाचा

सुमारे १७ ते १८ वर्षांपूर्वी लिंबू बागेच्या बांधावर सागवानाची झाडे लावली होती. यंदा या १२९ झाडांची कापणी केली. त्यातून सुमारे तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. आता त्यास नवे फुटवे निघाले असून त्यांचीही जोपासना सुरू आहे. सन १९९९ मध्येही सागवानाची ५० ते ६० झाडे लावली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या विक्रीतून एक लाख रुपये मिळाल्याचे खवले यांनी सांगितले.

मधुकर खवले ९८२२२३६४७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT