Lemon Orchard Cultivation : लिंबाला चांगला भाव मिळण्यासाठी असं नियोजन करा

Citrus Crop : लिंबू हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
Lemon Orchard Cultivation
Lemon Orchard CultivationAgrowon

Lemon Production : वर्षभर उत्पादन देणारे पीक म्हणून लिंबाकडे पाहिल जातं. त्यामुळे बरेच शेतकरी लिंबू लागवडीकडे वळताना दिसतात. लिंबाला वर्षभर मार्केट असल तरी ठरावीक म्हणजे मे - जून महिन्यात चांगला भाव मिळतो.  त्यामुळे योग्य पद्धतीने लिंबू बागेच नियोजन करण गरजेच आहे. त्यादृष्टीकोणातून लिंबू बाग लागवडीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.       

लिंबू हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन लागवडीस योग्य असते. जमिनीचा सामू ६.५ ते ८ असावा.  भारी, पाणथळ, चोपण तसेच रेताड, खडकाळ जमिनीत लिंबाची लागवड करू नये. 

लागवड ः 

लिंबू लागवडीपूर्वी जमीन उभी-आडवी नांगरट करून व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. लागवड चौरस पद्धतीने ६ बाय ६ मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकारचे खड्डे खोदावेत. चांगली माती किंवा पोयटा ४ ते ५ घमेली शेणखत, १ किलो निबोंळी पेंड, दीड ते दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट च्या मिश्रणाने खड्डे भरावेत.   

सुधारीत जाती लावडीसाठी साई शरबती, फुले शरबती या वाणाची निवड करावी. लिंबाची रोपे कृषी विद्यापीठाची रोपवाटिका किंवा शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून खरेदी करावी.

Lemon Orchard Cultivation
Lemon Rate In Mumbai : तापमानवाढीचा लिंबाला तडाखा

लागवड

लागवड पावसाळ्यात म्हणजे जुन - जुलै मध्ये करावी.  रोप लागवडीच्या वेळी शेंड्याकडील ४ ते ५ पाने ठेवून बाकी सर्व पाने काढून टाकावीत.

 लागवडीनंतरची काळजी

दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणं आवश्यक आहे, तसेच झाडांना वळण देणं आवश्यक आहे, पण पहिली दीड वर्ष कसलीच छाटणी करू नये. रोपे दोन वर्षाची झाल्यावर वळण द्यावे, त्यासाठी आवश्यक तेवढीच छाटणी करावी. पूर्ण वाढलेल्या झाडाचे मुख्य खोड जमिनीपासून साधारणपणे ७५ सेंटीमीटर पर्यंत सरळ असावे. या उंचीवर चोहोबाजूला विखुरलेल्या स्थितीत ३ ते ४ जोमदार फांद्या ठेवाव्यात. मुख्य खोडावर आलेली फूट अंकुर अवस्थेत असतानाच काढत राहावी. दाट झालेल्या आणि रोगट फांद्या आणि पाणसोट काढून टाकावेत. छाटणी केलेल्या जागेवर १० टक्के बोर्डोपेस्ट लावावी.

रोपांना नियमित पाणी द्यावे. यासोबतच खत व्यवस्थापन जोमदार वाढ आणि अपेक्षित उत्पादनासाठी नियमित खत पुरवठा आवश्यक आहे. हवामानाचा विचार केला असता जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात झाडांना नवीन पालवी येते, अशावेळी नियमित खतांचा पुरवठा करावा.  

कागदी लिंबाच्या झाडाला वर्षभर पालवी आणि फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. पण उन्हाळ्यात येणाऱ्या लिंबालाच जास्त भाव मिळतो. त्यामुळे या काळात लिंबू फळे येण्यासाठी हस्त बहाराचे योग्य पद्धतीने नियोजन करणं आवश्‍यक आहे. लिंबूवर्गीय झाडांना बहर येण्याकरिता झाडाची वाढ करणाऱ्या अन्नद्रव्यांचा संचय होणं गरजेच असतं. अन्नद्रव्यांचा संचय झाडांच्या फांद्यामध्ये झाल्यानंतर पोषक हवामान मिळताच बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात.       

लिंबाला चांगला भाव मिळण्यासाठी      

लिंबू बागेत आंबिया बहर, मृग बहार आणि हस्त बहार असे तीन बहार धरता येतात. आंबिया बहाराची फुलधारणा ही जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान होऊन फळांचे उत्पादन जून ते ऑगस्ट या महिन्यात मिळते. उत्पादन भरपूर प्रमाणात मिळते. पण या काळात बाजारात फळांना फार कमी भाव असतो. मृग बहराची   फुलधारणा जून-जुलै महिन्यात होऊन फळांचे उत्पादन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मिळते. या फळांची चकाकी आणि प्रत ही चांगली असते. पण या फळांना देखील बाजारात कमी दर मिळतो. तर हस्त बहराची  फुलधारणा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होते. आणि फळे मार्च-मे महिन्यामध्ये काढणीस येतात. या काळात मात्र फळांना मागणी आणि दरही चांगला असतो. जास्तीत जास्त बागायतदारांचा कल हा हस्त बहाराकडे असतो. पण हा बहर सहज घेता येत नाही. कारण लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये साधारणतः आंबिया बहर ६० टक्के, मृग बहर ३० टक्के तर हस्त बहर १० टक्के येतो. त्यामुळे हस्त बहर घेण्याकरिता शास्त्रीय दृष्टिकोन ठेवूनच मशागत, खत व्यवस्थापन आणि संजीवकांचा उपयोग करावा लागतो. हस्त बहर घेण्यासाठी आवश्‍यक असलेला पाण्याचा ताण देणे पावसाळ्यात (ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये) शक्य होत नाही. त्यामुळे हा बहर घेण्यास अडचणी येतात. त्यामुळे लिंबाला जर चांगला भाव मिळवायचा असेल तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हस्त बहाराच नियोजन करावं. 

माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com