Rural Development : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावे ऊसक्षेत्रात पुढारलेली आहेत. मात्र हातकणंगले तालुक्यातील व कोल्हापूरपासून पंधरा किलोमीटरवर असलेले संभापूर हे तसे जिरायती स्थितीत येणारे गाव आहे. साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात दहा टक्के शेती ओलिताखाली आहे. या क्षेत्रात ऊस असतो. सोयाबीन, भुईमूग ही अन्य पिके असतात.
आरोग्य, पाणी किंवा अन्य मूलभूत व महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देत ग्रामस्थांना त्यातील चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीचा राहिला आहे. अक्काताई प्रकाश झिरंगे या लोकनियुक्त विद्यमान सरपंच आहेत. यापूर्वी त्यांचे पती सरपंच होते. या दांपत्याने ग्रामपंचायत सदस्य, शासकीय व कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. ग्रामस्थांची वेळोवेळी साथ मिळाली. सामाजिक उपक्रम राबवण्यातही गाव अग्रेसर असते.
त्यामध्ये ग्रामस्थांनी हिवरे बाजार, पाटोदा आदी ठिकाणी भेट देऊन तेथील उपक्रम जाणून घेतले. त्यातूनच आपल्या गावातील सुधारणांसाठी दिशा मिळाली. तत्कालीन ग्रामसेवक आस्मा मुलाणी, विद्यमान ग्रामसेवक गीता कोळी, कृषी सहायक महादेव जाधव आदींचाहु गावविकासात मोलाचा वाटा राहिला आहे. जिल्हा, राज्य पातळीवरील अधिकारी व राजकीय नेत्यांनी भेटी देऊन गावाचे कौतुक केले आहे.
गावांतील विविध उपक्रम स्वच्छ पाण्यासाठी हिरवे कार्ड
गावातील दोन विहिरींमार्फत गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. पाण्याचे स्रोत शुद्ध ठेवण्यासाठी ग्रामपंचायत काटेकोर असते. त्यामुळेच सलग तीन वर्षे स्वच्छ पाणीपुरवठ्याबाबतचे ‘हिरवे कार्ड’ प्राप्त झाले आहे.
त्यामुळे ‘चंदेरी कार्ड’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुद्ध पाण्याचा ‘प्लांट’ ही गावात आहे. पाच रुपयांना वीस लिटर या दराने पाणी उपलब्ध करून दिले जाते. सध्या जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजू, शाळा, उद्याने, स्मशानभूमी आदींसह उपलब्ध व शक्य जागेत विविध झाडे लावली आहेत. त्यातून गावात हिरवाई तयार झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत एकही झाड सुकून जाणार नाही असा प्रयत्न असतो. एकूण लोकसंख्येच्या २६ टक्के वृक्षलागवड करण्यात आली आहे.
तलावाचे रुपडे पालटले
गावातील मोठा सार्वजनिक तलाव लोकसहभागातून सुशोभित करण्यात आला आहे. त्याचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत नसले तरी विहिरींची पातळी त्यामुळे बारमाही चांगली राहते. तलावात कचरा होणार नाही व परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घेतली जाते. त्यामुळे तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. लोकसहभागातून विहिरीतील गाळ काढणे व बंधारा बांधणे आदी कामेही झाली आहेत.
शाळांचे सौंदर्य खुलले
जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांचे सुशोभीकरण अग्रक्रमाने झाले. स्वच्छता व आकर्षक रंगरंगोटीमुळे शाळांचे सौंदर्य अंतर्बाह्य खुलले आहे. शाळेतील सांडपाणी शोषखड्यातच मुरवण्यात आले आहे. हिरवीगार क्रीडांगणे लक्ष वेधून घेतात. प्रत्येक वर्गात ‘टेलिव्हिजन’ संच आहे.
विद्यार्थ्यांना ‘डिजिटल’ पद्धतीनेही शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. नव्या शाळेबरोबर जुन्या शाळेचे नूतनीकरण करून त्याला रेल्वे स्थानक व रेल्वे डब्यांचा लूक दिला आहे. शाळेच्या प्रांगणात परसबाग तयार करण्यात आली आहे.
काँक्रिटीकरण, भुयारी गटारी
बहुतांशी रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. भुयारी पद्धतीने गटारी व शोषखड्डे काढण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी साचून निर्माण होणारी दुर्गंधी टळली आहे. प्रमुख ठिकाणी ‘हायमास्क’ पथदिवे लावले आहेत. गावात पाच ‘बायोगॅस’ प्रकल्प कार्यान्वित आहेत. ग्रामपंचायतीमार्फत खरेदी केलेल्या घंटागाडीमार्फत कचरा संकलन व व्यवस्थापन होते.
गावविकासातील ठळक बाबी
ग्रामपंचायतीकडे ट्रॅक्टर, टॅंकर, घंटागाडी आदी सुविधा. ग्रामपंचायतीचे दप्तर, ग्रामस्थांना सुविधा देण्याच्या तत्परतेमुळे २०२१-२२ मध्ये गावाला आयएसओ मानांकन. केंद्र शासनाच्या मूल्यांकनात ग्रामविकास कामांमध्ये सातत्य असलेल्या पहिल्या ७५ गावांमध्ये सध्या संभापूर ७३ वा स्थानावर.
गावात एकूण ७४ बचत गट. ९३१ महिलांचा त्यात सहभाग. सुकन्या योजनेत २३ मुलींचा सहभाग. जे ग्रामस्थ वेळेवर कर भरतात त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रोत्साहनपर दिवाळीला साखर भेट. सुमारे चार टन साखरेचे वाटप. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुतर्फा झाडे. मजबूत शेड, मोकळ्या ठिकाणी बाकड्यांची व्यवस्था, झाडांभोवती आकर्षक कट्टे. प्रत्येक ठिकाणी सुविचार लिहिले आहेत.
मिळालेले पुरस्कार
आर. आर. पाटील आबा सुंदर गाव तालुकास्तरीय प्रथम, २०२०-२१ मध्ये जिल्हास्तरीय प्रथम.
संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरीय प्रथम, पुणे विभाग द्वितीय.
- प्रकाश झिरंगे ९९२१३९६२६२ (माजी सरपंच)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.