Village Development : स्वस्त धान्य, खते विक्रीत ‘श्री भावेश्‍वरी’ बचत गटाचे सातत्य

Women's Self Help Group : स्वस्त धान्य दुकान, खत विक्री आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार थेट बांधावर खतांचा वेळेत पुरवठा करण्यात महिला बचत गटाने ग्रामविकासामध्ये उत्तम कामगिरी केली आहे
Women's Self Help Group
Women's Self Help GroupAgrowon

राजकुमार चौगुले

कोल्हापूर जिल्ह्यातील बेलवळे खुर्द (ता. कागल) हे शेतीच्या दृष्टीने अग्रेसर गाव. गावातील दहा महिलांनी एकत्रित येऊन २००३ मध्ये श्री भावेश्‍वरी स्वयंसाह्यता महिला बचत गटाची स्थापना केली. जिल्हा बॅंकेकडून आर्थिक साह्य घेत गटातील सदस्यांनी हळूहळू प्रगती करण्यास सुरुवात केली.

शासकीय विभागाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती बचत गटाला मिळते. आजवर गटाने स्वस्त धान्य विक्री केंद्र, अनुदानावर बियाणे वाटप, वैरण विकास कार्यक्रमांतर्गत चवळी बियाणे, मकावाटप केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तूर बियाणे, लिंबू रोपे, कोकोपीट वाटपही केले आहे. या वर्षी जून महिन्यामध्ये प्रत्येक कार्डधारकास एक रोपवाटप करून ते जगवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमांच्या जोडीला गेल्या १० वर्षांपासून शेतकऱ्‍यांना थेट बांधावर खते उपलब्ध करण्याचा उपक्रम गटाने राबविला आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

Women's Self Help Group
Advance Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या बँक खात्यावर ८० कोटींची अग्रिम जमा

स्वस्त धान्य विक्री केंद्रापासून सुरुवात

बेलवळे खुर्द गावामध्ये स्वस्त धान्य दुकान नसल्याने गावकऱ्यांना आठ किलोमीटरची पायपीट करावी लागायची. शासनाकडून रेशन धान्य दुकान बचत गटांना देण्याबाबत आदेश आला होता. हे आव्हान गटाने स्वीकारत स्वस्त धान्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. कागल तालुक्‍यातील महिला बचत गटाला रेशन धान्य वितरित करण्याचा पहिला परवाना श्री भावेश्‍वरी स्वयंसाह्यता महिला बचत गटाला मिळाला. साडेआठ टन रेशन स्वतःच्या बचत गटातून भरल्यानंतर धान्य दुकान सुरू झाले. २०११ पासून आतापर्यंत अविरतपणे बचत गटाच्या माध्यमातून रेशन दुकानाच्या माध्यमातून धान्य दिले जाते आहे.

स्वस्त धान्य विक्री केंद्रात पैशांचे सर्व व्यवहार एक महिला पाहते. बायोमेट्रिक सुरू होण्याअगोदर संगणकीकृत पावत्यांद्वारे रेशन वितरण होत असे. बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब केल्यापासून त्यात आणखी पारदर्शकता आली. शिवाय महिला सदस्या रेशन दुकान चालवत असल्याने गैरप्रकार टाळण्यास मदत झाल्याचे गटातील सदस्या सांगतात.

मागणीनुसार त्वरीत खतपुरवठा

परिसरातील शेतकऱ्यांना २०१० पासून युरियाचा तुटवडा जाणवून नये यासाठी सातत्याने काम केले जात आहे. त्यात कृषी विभागाच्या सहकार्याने गटातील महिलांना यश आले आहे. खतटंचाईच्या काळातही गटाने ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वाने खतांची विक्री केली. कृषी अधिकाऱ्यांनी याची वेळोवेळी चाचपणी करून गटाचे कौतुक केले आहे. खत पुरवठ्याविषयी विश्‍वासार्हता निर्माण झाल्याने खतांचा पुरवठाही बचत गटाला आवश्‍यक त्या प्रमाणात होत गेला.

Women's Self Help Group
Sugarcane Rate Protest : कोल्हापूर ऊसदर आंदोलन! चालू ट्रॅक्टर थांबवून पेटवला, चंदगडमधील घटना

‘व्हॉट्सॲप’द्वारे खतांची नोंदणी

अनेक दुकानदार सांगतील ती खते शेतकऱ्यांना घ्यावी लागतात. मात्र गटाने मॉल प्रमाणे पद्घतीचा अवलंब केला आहे. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची खते उपलब्ध करण्यात येतात. त्यामुळे शेतकरी आवश्यकतेनुसार हवी ती खते पाहून मागणी नोंदवू शकतात. अनेक शेतकरी ‘व्हॉट्सअप’च्या माध्यमातून ऑनलाइन खतांची मागणी नोंदवितात. तसेच पेमेंटही ऑनलाइन पद्धतीने करतात.

दुग्ध व्यवसायाला चालना

बचत गट स्थापन केल्यापासून आतापर्यंत गटातील सदस्यांना प्रत्येकी दोन म्हशींचे वाटप करण्यात आले आहे. गटातील महिलांना म्हैस पालनातून उत्पन्नाचा चांगला आधार मिळाला आहे. सध्या गटातील महिलांकडे २० जातिवंत दुधाळ म्हशी आहेत. बचत गटाच्या प्रगतीसाठी जिल्हा बॅंकेचे मोलाचे योगदान मिळाले आहे. योग्य वेळी कर्जपुरवठा करून गटातील महिलांना आर्थिक मदत केली आहे. बॅंकेचे अध्यक्ष आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून बचत गटाला सातत्याने मार्गदर्शन आणि मदत मिळत असल्याचे गटातील महिला सांगतात. आजवर राज्यातील विविध बॅंकांतील चाळीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन बचत गटाच्या उपक्रमांची माहिती घेत कौतुक केले आहे.

नफ्याचे समान वाटप

खत व अन्य वस्तूंच्या विक्रीतून मिळणारा नफा गटातील महिला सदस्यांना समप्रमाणात वितरित केला जातो. खर्च वजा जाता प्रत्येक महिलेला दहा टक्के वाटा मिळतो. याशिवाय ज्या महिलांना पैशांची गरज आहे, त्यांना गटाकडून कर्जही दिले जाते. बचत गटाच्या अध्यक्ष म्हणून सौ. साधना कोतेकर काम पाहत आहेत. साधनाताई गटाच्या कामकाजाचे नियोजन, आर्थिक गुंतवणूक, गटाचे कार्य लोकांपर्यंत, शासनापर्यंत पोहोचविणे आदी कामे पाहतात. सौ. रूपा पाटील या सचिव असून हिशेब, सभा नियोजन, बॅंक व्यवहार, नवीन तंत्रज्ञान माहिती, धान्य विभागाचे कामकाज पाहतात. सौ. नम्रता पाटील या अन्य कार्यालयीन कामे पाहतात.

बचत गट भरतो आयकर

बचत गट हे महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी स्थापन केले जातात. काटेकोर नियोजन केल्यास किती नफा होऊ शकतो, हे श्री भावेश्‍वरी स्वयंसाह्यता महिला बचत गटाने दाखवून दिले आहे. गटाद्वारे आयकरदेखील भरला जातो. गेल्या दहा वर्षांपासून यात गटाने सातत्य राखले आहे. गटाचे लेखापरीक्षण हे मान्यता प्राप्त लेखापरीक्षकांकडून केले जाते.

- सौ. रूपा पाटील (सचिव) ७५८८६२१५३०

मिळालेले पुरस्कार

जिजामाता जिजाऊ स्वावलंबन, आदर्श महिला बचत गट पुरस्कार, जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट महिला बचत गट, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती इत्यादी पुरस्कारांनी गटाचा सन्मान करण्यात आला आहे. याशिवाय ‘हिरकणी नव महाराष्ट्राची’ आणि भरारी महिला बचत गट स्पर्धेत प्रथम क्रमांकही गटाने मिळवला आहे.

थेट बांधावर खत विक्री : बचत गटामार्फत खत विक्रीचा परवाना घेण्यात आला. या माध्यमातून परिसरातील १५ ते २० गावांमधील शेतकऱ्यांना थेट बांधावरच मागणीनुसार खतांचा पुरवठा केला जातो. खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना खताच्या दुकानात जावे लागते. पण गटाद्वारे शेतकऱ्यांना थेट बांधावर खतविक्री केली जाते. अगदी एका पोत्याची मागणीही नोंदविली जाते. खतांचा पुरवठा करण्यासाठी बचत गटाकडे स्वतःचा टेम्पो आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेम्पोमधून बांधावर खते पोहोचवली जातात. काही वेळा शेतकरी मजुरांची उपलब्धता झाल्यानंतर खताची मागणी नोंदवता. अशावेळी सकाळी सात वाजतादेखील शेतकऱ्यांना शेतात खते पोहोच केली जातात. अनेक ठिकाणी ही योजना फारशी प्रभावीपणे राबली जात नाही. मात्र नाममात्र नफा हे धोरण कायम ठेवत गटाने त्यात सातत्‍य राखले आहे. त्या माध्यमातून गटाद्वारे वर्षाला सुमारे सव्वा कोटी रुपयांची खत विक्री केली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com