Women Farmer Success Story Agrowon
यशोगाथा

Flower Farming : पतीच्या समवेत शेती फुलवली, पुढे नेली

Women Farmer Success Story : मूकबधिर असलेल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कल्पना विष्णू वाघमारे (पाखरसांगवी. जि, लातूर) यांनी मोठ्या हिमतीने घरच्या साडेसहा एकरांत स्वावलंबन साधण्यासह व्यावसायिक शेती फुलवली आहे.

विकास गाढवे

Rural Women Entrepreneurship : पाखरसांगवी (ता. जि. लातूर) येथील कल्पना विष्णू वाघमारे या शेतकरी महिलेने व्यावसायिकता, जिद्द, हिंमत व धडपडीतून शेतीत स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. लातूरच्या पश्‍चिमेस असलेल्या पाखरसांगवी शिवारात खंडापूर रस्त्यावर वाघमारे कुटुंबाची साडेसहा एकर शेती आहे.

कल्पना यांचे सासरे चंदर वाघमारे फुलशेती व त्यासाठी लागणाऱ्या रोपांची निर्मिती करायचे. त्यांचे २०१८ मध्ये निधन झाले. कुटुंबात सासू चतुराबाई, पती विष्णू व तीन मुले आहेत. पती मूकबधिर असून त्यांचे आयटीआयपर्यंत शिक्षण झाले आहे.

अपंगत्वामुळे त्यांना एकट्याने शेती करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आपल्यालाच पुढाकार घेऊन घरचा शेतीचा वारसा पुढे चालवावा लागेल हे कल्पना यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी घराबाहेर पडून शेतीमध्ये झोकून दिले.

समाजात वावरताना बळ मिळाले

महिला आर्थिक विकास मंडळाच्या सहयोगिनी समिना मुजावर व एकता लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सुजाता तोंडारे यांची ओळख झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १३ महिलांना एकत्र करून माउली बचत गट स्थापन केला. दोनशे रुपयांची बचत सुरू केली. अध्यक्ष म्हणून कल्पना यांनी गटाचे व्यवहार चांगले ठेवले.

त्यामुळे वर्षभरातच व्यवसायासाठी कर्ज मिळाले. गटामुळे समाजात वावरताना बळ आले. एकटे वाटले नाही. बाहेरच्या जगात कसे वावरायचे हे कळून आले. सोबतच गटाच्या माध्यमातून शेती व अन्य खर्चांसाठी अर्थसाह्य मिळाले.

विविध पीक पद्धतींचा व बाजारपेठांचा अभ्यास झाला. बचत गटातून मिळालेल्या कर्जातूनच टोमॅटो उत्पादनासाठी तारकाठी, संरक्षित शेती सामग्री, ठिबक सिंचन आदी सुविधा उपलब्ध करता आल्या. अजूनही गरज भासल्यास बचत गटाचा कायम आधार आहे.

शेतीची जबाबदारी

सासऱ्यांनी शेतीतील प्राथमिक धडे दिले होते. त्यामुळे कल्पना यांना शेती तशी नवी नव्हती. मात्र त्यांच्या निधनानंतर जबाबदारी पार पाडताना सुरुवातीला थोडी कसरत झाली. बाजारपेठेत कोणत्या काळात कोणत्या भाजीपाल्याला मागणी आहे, काय दर मिळतो याचे गणित समजून घेतले.

आज आले, टोमॅटो, तसेच झेंडू, शेवंती, ॲस्टर आदी फुलपिके, तसेच त्याच्या रोपांची वर्षातून दोन ते अडीच लाखांच्या संख्येने निर्मिती केली जाते. पार्सलनेही रोपे पाठवून देण्याचीही व्यवस्था आहे.

कर्नाटकातील बिदर जिल्ह्यापासूनही शेतकरी रोपेखरेदीसाठी येतात. गादीवाफे तयार करून रोपे तयार केले जातात. शेडनेटमध्ये शेवंतीच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. फुलशेती व रोपनिर्मितीचे कौशल्य आत्मसात करून घरचा वारसा कल्पना पुढे चालवत आहेत.

कामांचे व्यवस्थापन

मशागत, पेरणीपासून ते काढणी, विक्रीपर्यंत सर्व कामांचे व्यवस्थापन करण्यात कल्पना तरबेज आहेत. त्यांचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो. घरची कामे आटोपून त्या सकाळी साडेनऊ वाजता शेतात येतात. पती व मजुरांच्या साह्याने मशागत, वाफे तयार करणे, लागवड, फवारणी, पाणी देणे, काढणी आदी सर्व कामे त्या करतात. संध्याकाळी साडेसहापर्यंत शेताचे व्यवस्थापन सांभाळून त्या घरी परततात.

तीन मुलांपैकी वैभव (वय वर्षे २२) हा शेतीकामांत मदत करतो. मार्केटिंग वा विक्रीची जबाबदारीही त्याच्याकडे असते. विशाल आणि विश्‍वजित शिक्षण घेत आहेत. शेतीमाल, रोपे, भाजीपाला खरेदीसाठी व्यापारी व शेतकऱ्यांचाही शेतात राबता असतो. रात्रीच्या सुमारास काहीवेळा बचत गटाच्या महिलांसोबत बैठक असते. घरी सध्या चार म्हशी देखील असून दुधापासून कुटुंबाला रोजच्या खर्चासाठी हातभार लागतो.

शेतीतून प्रगती

टोमॅटो, कांदा, पालक, कारले, दोडका, मिरची अशी विविधता ठेवली आहे. एका पिकांतून नुकसान झाले, तर दुसऱ्या पिकातून भरून काढण्याचा प्रयत्न असतो. यंदा टोमॅटो पिकाचे सुमारे सात लाखांचे नुकसान झाले. त्याची बाजारपेठेत विक्री होते. तर आले व कांदा व्यापारी शेतात येऊन खरेदी करतात.

बचत गटाच्या विविध ठिकाणच्या स्टॉलमधूनही फुलांची विक्री होते. लातूर नजीकच शेती असल्याने शहरांतून फुलांना कायम मागणी असते. घरचे शेणखत उपलब्ध होत असले तरी वर्षाला बाहेरून देखील खरेदी करावे लागते. शेतीतील उत्पन्नातील बहुतांश पैसा शेतीतच वापरल्याने अनेक सुविधा तयार करता आल्या.

विहिरीचा गाळ काढून शेतात पसरला. अडीच एकरांतील जमीन समपातळीत करून घेतली. सुरुवातीची दोन ते तीन वर्षे ८० ते ९० हजार रुपयांचे शेणखत दरवर्षी शेतात वापरले. उत्पन्नात वाढ होऊ लागल्यावर संपूर्ण शेतात ठिबक सिंचन व्यवस्था करून घेतली. दोन विंधन विहिरी खोदल्या. साडेआठ लाख रुपये खर्च करून शेडनेटची उभारणी केली.

घराची दुरुस्ती केली. मुलांचे शिक्षण सुरू आहे. येत्या काळात आंबा व नारळ लागवडीसोबत वरणा, कारले, दोडके आदी भाजीपाला घेण्याचे नियोजन आहे. शेतीतील वीस वर्षांहून अधिक तगडा अनुभव तयार झाल्याचे कल्पना सांगतात.

कल्पना वाघमारे ७९७२२१४७९४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT