Flower Farming Management : पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील निरगुडे (वाघाळे) येथील प्रकाश राऊत यांनी शेवंती फूलशेतीच्या रूपाने आपल्या कुटुंबात आनंद, स्थैर्य व यशाचा बहार निर्माण केला आहे. दसरा-दिवाळी आणि गुडीपाढवा अशा दोनवेळच्या सण- हंगामांचे उद्दिष्ट ठेऊन त्यांनी नियोजनपूर्वक केलेले लागवड व्यवस्थापन त्यांच्या अडीच एकर शेतीचे अर्थकारण उंचावण्यास कारणीभूत ठरले आहे.
साधारण श्रावण- गणेशोत्सवापासून फूल उत्पादकांसाठी विक्रीचा हंगाम सुरू होतो. तो नवरात्री, दसरा दिवाळी, मार्गशीर्ष महिना व पुढे उन्हाळ्यात लग्न समारंभापर्यंत सुरू राहतो. या काळात आपण उत्पादित केलेल्या फुलांना चांगले मार्केट मिळावे अशी शेतकऱ्यांची धडपड असते. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील कुसूर, येणेरे, निरगुडे, काले, दातखिळवाडी, सुराळे आदी गावे फूलशेतीसाठी प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या प्रसिद्ध दादर फूलबाजारावर त्यांची हुकमत आहे. याच गावांपैकी निरगुडे (वाघाळे) येथील प्रकाश राऊत शेवंती फूलशेतीत हातखंडा मिळवलेले शेतकरी म्हणून ओळखले जातात.त्यांची अडीच एकर शेती असून सुमारे दोन एकर त्यांचे शेवंतीचे क्षेत्र असते.
राऊत यांची शेवंती शेती
राऊत यांनी शेवंती शेती हंगामाचे दोन भाग पाडले आहेत. साधारण दसरा- दिवाळी सणासाठी असलेली मागणी ओळखून ते जूनच्या दरम्यान रोपे लावतात. सप्टेंबरच्या दरम्यान फुलांचे उत्पादन सुरू होते. नोव्हेंबर- डिसेंबरपर्यंत फुले मिळत राहतात. या हंगामानंतर राऊत यांना वेध लागतात ते गुढीपाडवा सणाचे. या काळात फुले विक्रीस आणण्यासाठी मग लागवडीचे नियोजन चार-पाच महिने आधीच सुरू होते. या फुलांना पाणी मर्यादित लागते. विहीरी व बोअरच्या साथीने उन्हाळ्यातील हंगाम चालतो.
राऊत सांगतात की शेवंतीच्या सफेद फुलांना बाजारात अधिक मागणी असते. त्यामुळे त्या वाणाच्या निवडीवर अधिक भर असतो. काही प्रमाणात पिवळ्या फुलांची लागवडही केली जाते. एकरी सुमारे १० हजार ते १२ हजार रोपे लागतात. नर्सरीतून ती आणली जातात. सफेद वाणाच्या झाडांची उंची सुमारे साडेचार ते पाच फुटांपर्यंत असल्याने त्याला आधारासाठी मांडव करावा लागतो. फुले व पाकळ्यांची जाडी जास्त असल्याने वजन चांगले मिळते. साहजिकच दर चांगला मिळतो. पाकळ्या जाड असल्याने टिकवणक्षमताही चांगली असते.
लागवडीतील ठळक बाबी
लागवडीत दोन ओळींमधील अंतर जास्त ठेवल्याने तोडणी करण्यास सोपे जाते. हवा खेळती राहून किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. साडेचार फुटी रुंद आणि एक फूट उंचीचे गादीवाफे, ठिबक सिंचन व मल्चिंग पेपर यांच्या साह्याने लागवड होते. रासायनिक खते, ह्युमिक ॲसिड यांच्याबरोबरीने शेणखत वा कोंबडीखत देण्यावर राऊत यांचा भर असतो. त्यांची पाचहजार लेअर पक्षांची पोल्ट्री आहे. त्यामुळे वर्षाला १२ ट्रॉलीपर्यंत कोंबडीखत उपलब्ध होते. राऊत यांनी निवडलेल्या वाणाची उंची आणि फुटवे जास्त आहेत. फुलांच्या वजनाने झाड खाली वाकू नये यासाठी रोपांना आधार देण्यासाठी बांबूचा वापर केला आहे. त्यास तारा व सुतळ्या यांचा वापर करण्यात आला आहे.
काढणी व पॅकिंग
राऊत सांगतात की दोन एकरांत दररोज एकहजार ते १२०० किलोपर्यंत फुले मिळतात. आठवड्यातील सुमारे चार ते पाच दिवस यात सातत्य असून त्यानुसार काढणीचे नियोजन करावे लागते. त्यानंतर फुले क्रेटमध्ये ठेवली जातात. पॅकिंग झाल्यावर पेपरचे आच्छादन केले जाते. पॅकिंगमध्ये हवा खेळती राहत असल्याने फुलांचा दर्जा टिकून राहतो. वजनही चांगले राहते. दादर व परळ येथील फूल मार्केटला ही फुले पाठवली जातात.
संपूर्ण कुटुंबाची साथ
प्रकाश यांचे संपूर्ण कुटुंब शेवंती शेतीत गुंतले आहे. आई लताबाई, वडील किसन, पत्नी रंजना यांची त्यांना समर्थ साथ आहे. रिया व अथर्व ही दोन मुले अभियांत्रिकी शाखेत शिकत असून मोकळ्या वेळेत त्यांचीही शेतीत मदत होत असल्याचे प्रकाश सांगतात. बाजारपेठेत पांढऱ्या शेवंतीसह गुलाबी, जांभळी, पिवळी या रंगाच्या शेवंतीलाही मागणी वाढत आहे. त्यामुळे जुन्नर परिसरात ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन विविध रंगी शेवंती घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
दर, उत्पन्न व अर्थकारण
दसरा- दिवाळीच्या काळात या फुलांना किलोला ४० रुपयांपासून कमाल १५० रुपयांपर्यंत दर मिळतो. गुढीपाडवा कालावधी हा उन्हाळ्याचा असल्याने या काळात अन्यत्र ठिकाणाहून आवक कमी असते. साहजिकच किलोला १५० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळवण्याची संधी असते. यंदा दसऱ्याला प्रति किलो १२५ ते १५० रुपये तर दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि पाडव्यावेळी २०० ते २२५ रुपयांपर्यंत कमाल दर मिळाला. यंदापेक्षा मागील वर्षी दर चांगले मिळाले होते असे राऊत म्हणाले. मार्गशीर्ष महिन्यामध्ये किलोला ७० ते ८० रुपये दर मिळण्याचा अंदाज आहे. दोन्ही हंगामांचा विचार केल्यास एक एकरासाठी लागवड, रोपे, निविष्ठा, मजुरी, काढणी व वाहतूक असा किमान सव्वालाख रुपये खर्च येतो. मिळणारे उत्पन्न आणि खर्च वजा जाता सुमारे ६० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो.
प्रकाश राऊत ७८७५६६४७६४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.