Cauliflower Farming Technique : ‘ऑरेंज सिटी’ अशी नागपूर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर हे तालुके संत्रा-मोसंबी लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यात त्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक २३ हजार हेक्टर क्षेत्र याच भागात आहे.
हा भाग आता भाजीपाला उत्पादनासाठी देखील नावारूपास आला आहे. काटोल तालुक्यातील मेंडकी, गोंडी डिग्रस, मसली, वल्ली, खापा, सोनोली, इसापूर ही गावे पांढूर्णा (मध्य प्रदेश) मार्गावर आहेत.
हा भाग पूर्वी कपाशी, सोयाबीन सारख्या पिकांसाठी प्रसिद्ध होता. परंतु अर्थकारण उंचावण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांकडून पर्यायी पिकांचा शोध सुरू झाला. तो भाजीपाला पिकांवर थांबला.
फ्लॉवर झाले मुख्य पीक
फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, पालक, कोंथिबीर आदी पिकांवर या भागातील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. यात सर्वाधिक क्षेत्र फ्लॉवरचे आहे. मेंडकी गावात २००० च्या दरम्यान फ्लॉवर लागवडीला सुरुवात झाली.
एकरी चांगली उत्पादकता व वर्षभर उपलब्ध होणारा खेळता, ताजा पैसा यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी याच पिकावर मुख्य भर दिला. एकट्या मेंडकी गावात फ्लॉवर खालील क्षेत्र २०० एकरांपेक्षा अधिक पोहोचले असावे. अन्य सात गावांतील एकत्रित विचार करता या पिकाखालील क्षेत्र एक हजार एकरांपेक्षा अधिक असावे.
शेतकऱ्यांचे अनुभव
खामली गावातील तीन भावंडांच्या संयुक्त केने कुटुंबाने अनेक वर्षांपासून फ्लॉवर पिकात सातत्य राखले आहे. तीन भावांपैकी प्रदीप सांगतात की आम्ही तीन- चार एकर क्षेत्र दरवर्षी या पिकासाठी राखीव ठेवतो. वर्षभरात पावसाळा, हिवाळा व उन्हाळा अशा तीनही हंगामांत आम्ही हे पीक घेतो.
सुमारे १८ बाय १८ इंच अंतरावर लागवड करतो. एकरी सरासरी १८ हजार रोपे राहतात. बाजारपेठेत ज्या वाणांना मागणी राहते त्याच निवडण्याकडे कल असतो. पावसाळ्यात एकरी उत्पादन सर्वांत कमी म्हणजे एकरी ८ ते १० टन, हिवाळ्यात १५ ते २० टन, तर उन्हाळ्यात आम्हाला सर्वाधिक म्हणजे २०, २५ टनांपर्यंतही उत्पादन मिळते.
अर्थात, त्यासाठी हवामानाच्या सर्व बाबी अनुकूल असणे गरजेचे असते. अन्य शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार पावसाळ्यात फ्लॉवरचा गड्डा लहान राहतो. किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादकता कमी मिळते. हिवाळा, उन्हाळ्यात तुलनेने गड्ड्याचा दर्जा चांगला राहतो. एकंदरीतच वातावरण पोषक राहत असल्याने गड्ड्याचे वजन दोन ते अडीच किलोपर्यंतही मिळते
फ्लॉवरसाठी बाजारपेठा
काटोल तालुक्यातील फ्लॉवर उत्पादक गावांसाठी नागपूर ही मुख्य बाजारपेठ आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, नागपूर, गोंदिया तसेच राज्याबाहेर रायपूर, भिलाई, बिलासपूर (छत्तीसगड) या भागांत देखील इथला फ्लॉवर पाठविला जाते.
भाजीपाला उत्पादकांचा पट्टा म्हणून हा भाग नावारूपास आल्याने बिहारमधील काही व्यापारीही या भागात येऊन एजंटांमार्फत खरेदी करतात. वाहतुकीसाठी अनेकांनी मालवाहू वाहनांची खरेदी केली आहे. त्यातून त्यांना रोजगार मिळाला आहे.
प्रति मालवाहू वाहनात तीन ते चार टन तर परराज्यांत दहा टनांपेक्षा अधिक माल पाठविण्यावर भर राहतो. त्यासाठी लगतच्या तीन ते चार गावांतील शेतकऱ्यांचा माल एकत्रित केला जातो. त्यामुळे वाहतुकीवरील खर्चाचा भार कमी होतो.
पाटणाच्या (बिहार) बाजारपेठेसाठी २० किलोच्या पोत्यातून माल पाठवावा लागतो. मालाचे वजन वीस किलोपेक्षा अधिक भरल्यास अतिरिक्त माल निःशुल्क ठेवून घेतला जातो. त्यामुळे वजनाबाबत काटेकोर राहावेच लागते.
उंचावले अर्थकारण
पावसाळ्यात एकरी उत्पादकता कमी राहत असल्याने दर तेजीत राहतात. केने यांच्या अनुभवानुसार वर्षभर दरांमध्ये सातत्याने चढ-उतार राहते. कधी किलोला कमाल ५० रुपये दर मिळतो. हा आमच्यासाठी सर्वाधिक ठरतो.
तर कधी ३० ते ४० रुपये, तसेच ३ रुपयांपासून ते २० रुपयांपर्यंतही दर मिळतात. यंदा सुरवातीला ३५ ते ४० रुपयांचा दर मिळाला. आता २० रुपये दराने व्यवहार होत आहेत. दर जेव्हा अत्यंत खाली घसरतात त्या वेळी उत्पादन खर्चाची भरपाईदेखील होत नाही.
उत्पादन खर्चाची भरपाई व्हायची असल्यास किमान १० रुपये दर मिळणे अपेक्षित राहते. एकूण विचार केल्यास हे पीक एकरी एक, दीड ते दोन लाखांपर्यंत व काही वेळा त्याहून देखील अधिकचा नफा देऊन जाते.
एकरी उत्पादन खर्च ४० हजारांपर्यंत येतो असे केने सांगतात. ते सांगतात, की १२ सदस्यांचे आमचे संयुक्त कुटुंब आहे. याच पिकामुळे घरचे व शेतीचे अर्थकारण प्रगत करता आले. दोन घरे बांधली. तिसरे घर बांधणे सुरू आहे. घरातील विवाह, वैद्यकीय कारणांसाठी पैसा उभा करता आला.
खामली येथील रोशन काळे यांचे फ्लॉवरचे अवघे एक एकर क्षेत्र आहे. परंतु हंगामी एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न ते देऊन जाते असा दावा ते करतात. अंगद भैसवार यांची एकत्रित कुटुंबाची ३० एकर शेती आहे. त्यात मोठ्या क्षेत्रावर संत्रा-मोसंबी आहे. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे १० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर फ्लॉवरची लागवड व्हायची. आता त्यांनी क्षेत्र कमी करून ते निम्म्यावर आणले आहे.
प्रदीप केने ७०५७१९२२७६
रोशन काळे ८८०६५६९९६३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.