Vegetable Farming : फ्लॉवर पिकातून मिरवडीची बनतेय ओळख

Cauliflower Farming : पुणे जिल्ह्यातील मिरवडी (ता. दौंड) येथील शेतकऱ्यांनी उसाऐवजी भाजीपाला पिकांकडे आपल्या मोर्चा वळवला आहे. वर्षातून तीन ते चार वेळा फ्लॉवरसारखे पीक घेणारे गाव म्हणूनही त्याची ओळख बनत आहे.
Vegetable Farming
Vegetable Farming Agrowon
Published on
Updated on

संदीप नवले

Pune News : पुणे जिल्ह्यातील मिरवडी (ता. दौंड) येथील शेतकऱ्यांनी उसाऐवजी भाजीपाला पिकांकडे आपल्या मोर्चा वळवला आहे. वर्षातून तीन ते चार वेळा फ्लॉवरसारखे पीक घेणारे गाव म्हणूनही त्याची ओळख बनत आहे. या पिकातील मोठी आर्थिक उलाढाल होत असून, गाव विकासाच्या वाटेवर निघाले आहे.

पुण्यापासून २५ ते ३० कि.मी. अंतरावर मिरवडी-मेमाणवाडी (ता. दौंड) या गावाची लोकसंख्या दोन ते अडीच हजार आहे. भौगोलिक क्षेत्र हे जवळपास १,१९८ हेक्टर असून गावाजवळून जाणाऱ्या नदीमुळे बहुतांश शेती बागायती आहे. कुटुंबाची संख्या सुमारे ४५० असून, त्यातील ३५० कुटुंबे ही भाजीपाला पिके घेतात. एकेकाळी ऊस पिकांवर अवलंबून असलेल्या संपूर्ण गावाने भाजीपाला (तरकारी) पिकांमध्ये ओळख निर्माण केली आहे. शेतीतून सधनता प्राप्त केलेल्या या गावाने ग्रामविकासातही आघाडी घेतली आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी आर. ए. जाधव यांची मोठी मदत होते.

फ्लॉवरचे गाव

७ ते ८ वर्षांपूर्वी गावातील ८० टक्के शेतकऱ्यांची ऊसशेती होती. पण वर्षातून एकदाच आणि तेही अनेक वेळा विभागून येणाऱ्या पैशापेक्षा नियमित उत्पन्नाच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांचा पर्याय निवडला. मागील पाच ते सहा वर्षांत फ्लॅावर, कोंथिबीर, पालक, टोमॅटो अशा पिकांकडे अनेक शेतकरी वळले आहेत. नवीन पिकांमुळे येणाऱ्या अडचणींचा सामना करत गावात फ्लॉवरचे क्षेत्र वाढत गेले. आजमितीस अनेक कुटुंबाकडे दहा गुंठ्यांपासून दोन एकरांपर्यंत फ्लॅावरचे पीक घेतले जाते. त्यातून सुमारे १००-१५० एकरपर्यंत फ्लॉवर लागवड असते. अन्य भाजीपाला पिकांखाली १५० ते २०० एकरांवर लागवड असते.

Vegetable Farming
Vegetable Farming : कुंजीरवाडीने मिळवली पालक पिकात ओळख

गावात ६० टक्के फ्लॉवर लागवड

फ्लॅावर हे पीक मध्यम ते भारी जमिनीमध्ये चांगले येते. तसेच येथील हवामानही पिकासाठी पोषक आहे. विक्रीसाठी पुणे, मुंबईची बाजारपेठही जवळच आहे. सलग किंवा उसामध्ये आंतरपीक म्हणून फ्लॉवर पीक लावले जाते. नांगरटीनंतर सरी वरंबा किंवा पट्टा पद्धतीने जमीन तयार केली जाते. त्यात सामान्यतः रोपवाटिकेतून आणलेली रोपे लावली जातात. साधारणपणे पावणेदोन ते दोन महिन्यांत फ्लॉवर पीक काढणीस येते. त्यामुळे वर्षात तीन ते चार पिके घेता येतात. तर काही शेतकरी काढणीचे नियोजन सोपे करण्यासाठी टप्प्याटप्प्याने लागवड करतात. त्यातून चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होते.

पावसाळ्यात चांगली मागणी

पावसाळ्यात अन्य भाजीपाला पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे बाजारात आवक कमी राहून, बाजारभाव चांगला मिळतो. तर हिवाळा, उन्हाळ्यात मागणी कमी असते. हिवाळ्यात पोषक वातावरण असल्याने उत्पादनात काही प्रमाणात वाढ होते. मात्र सर्वांचीच पिके त्या काळात येत असल्यामुळे दर घसरलेले असतात. या काळात येथील शेतकरी पुणे बाजार समितीसोबतच चंदननगर, हडपसर अशा बाजारांतही माल पाठवतात.

काढणीच्या नियोजनाविषयी अक्षय कुंभारकर म्हणाले, की पूर्वी मी ऊस पिकाचे उत्पादन घेत होतो. गावातील काही शेतकऱ्यांचे पाहून मीही फ्लॉवर पिकाकडे वळलो. माझ्याकडील साडेचार एकर शेतीपैकी एक एकर स्वतंत्र फ्लॉवर लागवड केली असून, उर्वरित साडेतीन एकरांवरही आंतरपीक म्हणून फ्लॉवर लागवड करतो. काढणीसाठी चार ते पाच मजूर लागतात. सध्या काढणी सुरू असून, मालाला पुणे मार्केटमध्ये प्रति किलो १८ ते २० रुपये दर मिळत आहेत.

उलाढाल

गावातील फ्लॉवर उत्पादक शेतकरी दोन महिन्यांतील या पिकातून एकरी किमान दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतो. उत्पादन खर्च एकरी ३० ते ३५ हजार रुपये वजा केला असता किमान एक ते सव्वा लाख रुपये मिळवते. थोडक्यात, एखाद्या नोकरदाराप्रमाणे एक कुटुंब महिन्याला साधारण ५० रुपये उत्पन्न मिळवते. गावात या पिकाच्या माध्यमातून जवळपास वार्षिक एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होते.

गावात वृक्ष लागवड

मिरवडी येथे लागवडीसाठी भौगोलिक परिस्थितीनुसार बहुतांश देशी वृक्षांची निवड केली. उदा. वड, पिंपळ, जांभूळ, आंबा, चिंच, आवळा इ. संपूर्ण वर्षांमध्ये एकूण लोकसंख्येपेक्षा २० टक्के अधिक म्हणजे १६ हजार देशी झाडे रस्त्यांच्या दुतर्फा, गायरान, गावठाण, वनविभाग अशा ठिकाणी लावलेली आहे. त्याला काटेरी कुंपण, ठिबक सिंचन केले आहे. गावामध्ये पक्ष्यांचा ज्युस बार, इंद्रजित पार्क, चिंचबन, शिवछत्रपती उद्यान, जिव्हाळा पार्क, अतिथी वन, स्मृती वन असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.

लक्षवेधी विकासकामे

ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत सुसज्ज, प्रशस्त व देखणी बनवलेली आहे. पांढऱ्या रंगामुळे गावकरी ग्रामपंचायतीला ‘व्हाइट हाउस’ असे म्हणतात.

बंद अवस्थेत असणाऱ्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची डागडुजी, सुशोभीकरण केले. त्यानंतर आरोग्य सेवा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून उपकेंद्र सुरू करण्यात यश आले आहे.

शाळेसाठी भौतिक सुविधा पुरविल्या जातात. शालेय साहित्यासोबत खेळाचे साहित्य, क्रीडांगण याची तजवीज केली जाते. विविध उपक्रम, स्पर्धा व बक्षिसे अशा अनेक योजनांसह शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात.

आजवर सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे पूर्ण झाली आहे. वन पर्यटन, जलजीवन मिशन, पाणंद रस्ते अशी अनेक प्रस्तावित विकास कामे (रक्कम ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक) जिल्हा नियोजन निधीतून मंजूर झाली आहेत.

शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले

उसासारखे नगदी पीक घेत असताना बहुतांश शेतकरी पूर्वी साध्या किंवा धाब्याच्या घरांमध्ये राहत असत. मात्र भाजीपाला पिकांनी चांगलीच उभारी दिल्याने शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले आहे. आता गावात बहुतांश शेतकऱ्यांचे बंगले झाले असून, त्यापुढे दुचाकी आणि चारचाकी उभी दिसते. मुलेमुली उच्चशिक्षित होत आहेत.

गावाला मिळालेले पुरस्कार

आर. आर. ऊर्फ आबा पाटील स्मार्ट पुरस्कार.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम पुरस्कार.

आदर्श कृषी ग्राम पुरस्कार.

पिंपरी चिंचवड येथील स्वच्छ सुंदर व हरित गावामध्ये सन्मान.

आदर्श विकसित ग्रामपंचायत पुरस्कार.

गावात ग्रामविकासासोबत शेतीला प्राधान्य देण्यात येत आहे. भाजीपाला पिकाकडे शेतकरी वळत असून, फ्लॉवरसारख्या पिकांमुळे आर्थिक उलाढाल वाढली आहे. गावाचा विकास साधला जात आहे.

- सागर शेलार, ८८८८०५७२८८

माजी आदर्श सरपंच, मिरवडी

पूर्वी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती स्वतःपुरते भागेल इतपतच होती. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असून, गावातील विकासकामांना चालना मिळाली आहे. गावात रस्ते, पाणी, वृक्षलागवड यावर प्राधान्याने भर दिला आहे. त्यामुळे केवळ तालुक्यात नव्हे, तर जिल्ह्यातही मिरवडी गावाची बऱ्यापैकी ओळख निर्माण होऊ लागली आहे.

- शांताराम पांडुरंग थोरात, सरपंच, मिरवडी

अक्षय कुंभारकर, ८९५६६९२७२४

(प्रयोगशील शेतकरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com