Profitable Farming Model : अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील राजेंद्र केशवराव गिरमे हे प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांचे दोन बंधूंचे कुटुंब आहे. धाकटे बंधू किशोर पुण्यात व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत.
राजेंद्र यांचा मुलगा संकेत देखील पुण्यात आयटी क्षेत्रात नोकरी करतो. मुलगी सईचे माळीनगर (जि. सोलापूर) येथील फळ उत्पादनातील प्रगतिशील शेतकरी सत्यजित वसंतराव राऊत यांच्याशी विवाह झाला आहे.
सुमारे ५२ वर्षांपूर्वी पदवीचे शिक्षण घेऊन राजेंद्र यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत करिअर सुरू केले. तेव्हापासून आज वयाच्या ६८ व्या वर्षी उत्साहाने व आवडीने आज स्वतः आपल्या वडिलोपार्जित १६ एकर शेतीची जबाबदारी सांभाळत आहेत. राजेंद्र यांना पत्नी पूर्वा यांचे शेतीत सहकार्य तर माळीनगर येथील चुलतबंधू दिनेश गिरमे यांचे मार्गदर्शन होते.
शेतीतले प्रयोग व विकास
सध्या १६ एकरांपैकी नऊ एकरांवर फळबाग, अडीच एकरांवर ऊस तर पाच एकरांपर्यंत सोयाबीन, कांदा आहे. राजेंद्र यांनी जेऊर कुंभारीचे तीन वर्षे सरपंचपद भूषवले. कोळपेवाडी येथील सहकारमहर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पाच वर्षे संचालक व दीड वर्ष ते उपाध्यक्षही होते.
शेतीच्या विकासासह सामाजिक कार्यांतही त्यांचे भरीव योगदान आहे. शेतीत कायम प्रगतिशीलता जपणारे गिरमे कुटुंब चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून पेरूचे उत्पादन घेतात. सन १९७८-७९ च्या काळात त्यांनी तीन एकरांत पेरूची लागवड केली होती. सुमारे २२ वर्षे बाग संभाळली.
त्यानंतर त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी आंबा व लिंबू या मिश्रबागेचा प्रयोग केला. यात ३० बाय ३० फुटांवर आंबा तर मधल्या पंधरा फुटांमध्ये लिंबू घेतला. आंब्याची सुमारे १२२ तर लिंबाची सुमारे ३२२ झाडे आहेत. अशा प्रकारची मिश्रफळबाग करणारे राजेंद्र हे या भागातील पहिलेच शेतकरी आहेत. याशिवाय चिकू, फणसाची झाडेदेखील आहेत.
उल्लेखनीय उत्पादन
आंब्यात केसर बहुतांश आहे. बागेतील लिंबू तीनही बहरांमध्ये म्हणजे वर्षभर उत्पन्न देतो आहे. आंब्याच्या प्रत्येक झाडाला सुरवातीला ५० किलोपर्यंत आंबे मिळत. केसरला मागणी अधिक असते. सुरुवातीपासून जागेवर स्थानिक विक्रेत्याला विक्री व्हायची. आता झाडे मोठी झाली असून प्रत्येक झाडाला १०० किलोपर्यंत फळे मिळतात.
व्यापाऱ्यांना जागेवरच एक रकमी विक्रीमुळे तोडणीसह विक्रीसाठी होणारा खर्च कमी होतो. लिंबाला वर्षभरातील हंगामानुसार किलोला २० रुपयांपासून ते ३५ ते ४० रुपयांपर्यंत व उन्हाळ्यात १५० रुपयांपर्यंत दर मिळतो. दोन्ही पिके मिळून वर्षभरात आठ लाखांच्या दरम्यान उत्पन्न देतात.
पेरूची शेती करारावर
श्री साईबाबांचे शिर्डी हे देवस्थान गिरमे यांच्या शेतापासून सहा किलोमीटरवर आहे. येथील बाजारपेठेत पेरूला चांगली मागणी असायची. गिरमे कुटुंबानेही सन २००३ च्या दरम्यान लखनौ ४९ वाणाची ६४० झाडे लावली आहेत. पूर्वी या बागेचे व्यवस्थापन ते स्वतः करीत. आता मजूरटंचाई तसेच शरीर थकले असल्याने व्यापाऱ्याला वर्षभराच्या करारावर (खोती पद्धतीने) बाग दिली आहे.
जुनं ते सोनं
राजेंद्र यांच्या आजोबांनी तीन एकर क्षेत्राच्या बांधावर आंब्याच्या स्थानिक गावरान वाणांची २५ झाडे लावली होती. ७० वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही ही झाडे सक्षम आहेत. प्रत्येक झाडाला मोठ्या प्रमाणात दर्जेदार आंबे येतात. या झाडांपैकी तीन झाडांना वर्षातून दोनदा (मे व पावसाळा हंगाम) फळे येतात. या वाणाच्या कैऱ्यांना चांगली मागणी आहे. बांधावरच्या या झाडांची जपणूक करताना ‘जुनं ते सोनं’ असे गिरमे अभिमानाने म्हणतात.
व्यवस्थापनातील बाबी
पाण्यासाठी दोन विंधन विहिरी आहेत. पाण्याची उपलब्धता चांगली असली तरी संतुलित पाणी देण्यासाठी पंधरा वर्षांपासून ठिबक सिंचनाचा वापर होतो. बागेतील पालापाचोळा जागेवर गाडल्याने त्याचे काही दिवसांमध्ये खत तयार होते. आंबा फळांची काढणी झाल्यानंतर साधारण जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मुख्य व्यवस्थापन सुरू होते.
झाडांच्या खाली आलेल्या फांद्यांची छाटणी करून खोडात खांदणी केली जाते. त्यानंतर प्रति झाडाला २५ ते ३० किलो शेणखताचा वापर होतो. लिंबाच्या झाडांचीही आंब्यासोबत मशागत होते. त्यालाही शेणखताचा वापर होतो. फळांची गुणवत्ता जपण्यासाठी माशीचा प्रादुर्भाव होऊन नये म्हणून प्लॅस्टिक बॉटलच्या साह्याने तयार केलेल्या सापळ्यांचा वापर होतो.
सलग पंधरा वर्षापासून सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीचा पोतही सुधारला आहे. गरजेनुसार शेणखताची साडेतीन हजार रुपये प्रति ट्रॉली दराने खरेदी होते. रासायनिक निविष्ठांचा वापर जवळपास नसल्याने बागेत मधमाशी, मित्रकीटकांचा वावर अन्य ठिकाणच्या तुलनेत अधिक असल्याचे राजेंद्र सांगतात.
‘ॲग्रोवन’ मार्गदर्शक
राजेंद्र पहिल्या अंकापासून ॲग्रोवनचे वाचक आहेत. जेऊर कुंभारीपासून सावळीविहीर (ता. शिर्डी) हे दहा किलोमीटरवर तर कोपरगाव १३ किलोमीटर अंतरावर आहे. दररोज शक्य अशा एका ठिकाणी न चुकता जाऊन ते ॲग्रोवन अंक खरेदी करतात. त्यातील माहितीच्या आधारे त्यांनी विविध प्रयोग केले.
त्यामुळे ‘ॲग्रोवन’ माझा मार्गदर्शक आहे असे राजेंद्र आवर्जून सांगतात. अनेक वर्षांचा शेतीतील अनुभव असलेले राजेंद्र सांगतात, की शेतीतील खर्च वाढला आहे. उत्पादनखर्चावर आधारित दर मिळणे गरजेचे झाले आहे. यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून मजूरटंचाईची समस्या कमी करणे गरजेचे झाले आहे.
राजेंद्र गिरमे ९५२७०२०६२७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.