Cold storage Update Agrowon
यशोगाथा

Bedana Processing : शीतगृहांद्वारे झाले बेदाण्याचे मूल्यवर्धन

Grape Season : सांगली जिल्हा बेदाणा निर्मितीचे हब असून, येथे शीतगृहांची साखळी तयार झाली आहे. जोडीला आधुनिक तंत्राच्या सुविधांचा वापर होत असल्याने बेदाण्याच्या गुणवत्ता वृद्धीस व मूल्यवर्धनास मदत मिळाली आहे. त्यामुळे बेदाणा शीतगृहात ठेऊन योग्य दरांची प्रतिक्षा करणे व त्यानुसार विक्री करून अपेक्षित फायदा मिळवणे शेतकऱ्यांना शक्य होत आहे.

Abhijeet Dake

Cold storage Update : सांगली जिल्हा व त्यातील जत, विटा, खानापूर, आटपाडी, तासगाव, पलूस, मिरज आदी भाग निर्यातक्षम द्राक्षे व बेदाण्यासाठी अग्रेसर आहेत.

द्राक्ष हंगाम सुरू झाला की या तालुक्यांतील बेदाणा उत्पादकांची बेदाणा निर्मितीसाठी धांदल सुरू होते. अलीकडील काळात बेदाणा शीतगृहात ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

बेदाणा निर्मिती

सांगली जिल्ह्यातील बेदाणा निर्मितीमागील पार्श्‍वभूमी सांगायची, तर १९८०-१९८४ या काळात काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येत बेदाणा निर्मितीचा प्रयोग केला. त्याला यश मिळाल्यानंतर हळूहळू इतरांकडूनही बेदाणा निर्मितीला वेग आला. बेदाणा ठेवण्यासाठी त्या वेळी कोणत्या सुविधा नसल्याने असलेल्या दरात विक्री करावी लागे.

उत्पादन वाढू लागले तसे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील शीतगृहाचा आधार झाला. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला बेदाणा मुंबई, दिल्ली या ठिकाणच्या शीतगृहात ठेवला जायचा. आपल्या भागातच शीतगृहाची सोय करता येईल का, असा विचार बेदाणा व्यापारी अशोक बाफना यांनी १९९४ च्या दरम्यान केला.

विविध ठिकाणी जाऊन शीतगृहाची उभारणी, यंत्रे व तंत्राचा अभ्यास केला. त्यातून तासगाव येथे पहिले शीतगृह उभे राहिले.

शेतकरी झाले जागरूक

नाशीवंत मालाची योग्य पद्धतीने साठवणूक न केल्यास मनासारखा दर मिळत नाही. मिळेल त्या दराने तो विकावा लागतो. त्यामुळे केवळ एकरी उत्पादनाला महत्त्व नाही. तर काढणीपश्‍चात तंत्रज्ञान वा साठवणुकीला तेवढेच महत्त्व असल्याचे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पटले. साधारण वर्ष २००० नंतर त्यास चालना मिळाली.

त्यामुळेच मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आदी मोठ्या शहरांपुरती मर्यादित असलेली शीतगृहांची सुविधा सांगली जिल्ह्यातही सुरू झाली. साहजिकच मालाची प्रतवारी, त्याची योग्य साठवणूक व योग्य दर मिळताच विक्री या बाबींमध्ये अनेक शेतकरी जागरूक झाले आहेत. बेदाण्याला वर्षभर मागणी असते.

परंतु सण, लग्न-समारंभाच्या काळात दरही चांगले असतात. जानेवारी ते मार्च (लग्न, सण), एप्रिल ते जून (लग्न, रमझान), जुलै ते सप्टेंबर (गणपती उत्सव) ऑक्टोबर ते डिसेंबर (दसरा, दिवाळी) व बेकरी उद्योग अशा वर्षभरातील विविध टप्प्यांमध्ये शेतकरी बेदाणा विक्रीचे नियोजन करतात. त्यांना शीतगृहांना मोठा आधार झाला आहे.

सांगली जिल्हा बनला ‘ट्रेडिंग हब’

सांगली जिल्ह्यात सर्वाधिक बेदाणाच शीतगृहात ठेवला जातो. त्यानंतर हळद, चिंच, गूळ, धने, ड्रायफ्रूट्‍स (सुका मेवा) आदींचा क्रमांक लागतो. शीतगृहांची संख्या, मिळणाऱ्या सुविधा यामुळे हा जिल्हा ‘ट्रेडिंग हब’ बनला आहे.

देशभरातील व्यापारी बेदाण्याप्रमाणेच अन्य शेतमाल खरेदी करून येथील विविध शीतगृहांमध्ये ठेवतात. बेदाणा शीतगृहात आला की बॉक्स पॅकिंग होते. त्यावर शेतकऱ्याचे नाव, बॉक्सची संख्या आदी माहिती संगणकावर नोंदविण्यात येते. शीतगृहामध्ये तापमान हा महत्त्वाचा घटक असतो. बेदाण्यास ४ ते ८ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल ठरते.

शीतगृह सुविधा

-पाच हजार ते अडीच लाख बॉक्सपर्यंत ठेवण्याची मर्यादा

-प्रति महिना प्रति टन ६०० ते ६५० रुपये भाडेशुल्क.

-विम्याचे संरक्षण (त्यासाठी प्रति बॉक्सला पाच रुपये शेतकऱ्यांकडून आकारणी)

-शीतगृहात आधुनिक तंत्राचा वापर.

-७० टक्के बेदाण्यांचे उत्पादन आणि उलाढाल सांगली जिल्ह्यात.

-शीतगृहात माल ठेवल्याने देशभरात विक्रीच्या दृष्टीने मोठी सुविधा निर्माण झाली. गरजेच्या वेळी माल बाजारपेठेत आणणे शक्य झाले.

बेदाणा शीतगृहे व साठवणक्षमता

ठिकाणे... शीतगृहे ... क्षमता (टन)

तासगाव ... ४९ ... ८०,९००

सांगली ... ४२ ... ५९,३००

(स्रोत तासगाव बाजार समिती)

संपर्क - सुशील हडदरे- ९८२२११४१०४

मी बेदाणा उत्पादक आहे. मागील चार वर्षांपासून तासगाव भागातील शीतगृहात माझा दहा टनांपर्यंत बेदाणा ठेवतो. बाजारात अपेक्षित दर नसल्यास बेदाणा न विकता शीतगृहात ठेऊन योग्य दरांची प्रतीक्षा करतो. त्यानुसार विक्रीचे नियोजन करतो. उदाहरण सांगायचे तर बेदाण्याला किलोला १०० ते १२० रुपये दर असेल तर तो शीतगृहात ठेवणे पसंत करतो. महिन्याचे भाडे प्रति टनाला ६०० रुपये असते. शीतगृहात ठेवल्याने पुढे बेदाण्याला किलोला १४० ते १९०, २५० रुपयांपर्यंत कमाल दर मिळवणे मला शक्य झाले आहे. शीतगृहात बेदाण्याची गुणवत्ता, चमक देखील वाढते असे मला अनुभवण्यास आले आहे.
सागर जाधव अकोले मंद्रूप, दक्षिण सोलापूर ९५११९५९४७६
शेतकऱ्यांनी बेदाणा आमच्या शीतगृहामध्ये ठेवायला दिला म्हणजे काम पूर्ण झाले असे होत नाही. त्यांना बेदाणा निर्मिती, गुणवत्तेबाबत योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले जाते. बाजारपेठेशी सातत्याने संपर्क ठेवून दररोजच्या दरांची माहिती दिली जाते. तासगावच्या बाजारपेठेने बेदाण्यात नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे.
सुदाम माळी. सिद्धिविनायक ॲग्रोटेक कोल्ड स्टोअरेज, तासगाव, ९६३७६५२७२७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rohit Patil NCP-SP : विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठा फटका; तरिही सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचाच

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

SCROLL FOR NEXT