Organic Farming  Agrowon
यशोगाथा

Organic Farming : आदिवासी पाड्यात तंत्रज्ञानाला चालना

Tribal Farmer : पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे येथील आदिवासी शेतकऱ्यांना एकात्मिक, सेंद्रिय पद्धतीचे विविध पिकांतील सुधारित तंत्रज्ञान व मार्गदर्शन देण्यात येते.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : जळगाव जिल्ह्यात पाल (ता. रावेर) येथे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यरत असून, सुमारे सात तालुक्यांमध्ये त्याचे कार्यक्षेत्र आहे. यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा हे तालुके केळी, बागायती शेतीमध्ये अग्रेसर आहेत.

या भागात केव्हीकेने जमीन आरोग्य, सुपीकता व सेंद्रिय-नैसर्गिक शेतीवर अधिक भर दिला आहे. रावेर, चोपडा व यावल तालुक्यांमध्ये सातपुडा पर्वतीय क्षेत्र आहे. येथील आदिवासी क्षेत्रात पाण्याचे स्रोत बारमाही नसतात. खरिपावर अनेक शेतकऱ्यांची भिस्त असते.

प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे तर गारखेडा (ता. रावेर) या दुर्गम गाव परिसरात चार- पाच आदिवासी पाडे आहेत. सुमारे ३०० पर्यंत लोकसंख्या आहे. जमीन मध्यम, तीव्र उताराची, हलकी आहे. पाण्याचे स्रोत कमी असल्याने शेतकरी नदी-नाल्यांचे पाणी अडवून त्याचा उपयोग रब्बीसाठी करतात. काही शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या आहेत.

अशा गावांमध्ये किंवा तीन तालुक्यांतील प्रत्येकी ५० शेतकऱ्यांना व एकूण १५० शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून नैसर्गिक- सेंद्रिय व एकात्मिक प्रकल्प, सुधारित पीक पद्धती व तंत्रज्ञानाचा लाभ केव्हीकेतर्फे देण्यात येत आहे.

प्रकल्प व प्रात्यक्षिके

प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुमारे ५० शेतकऱ्यांना पॉलिथिन पद्धतीचे व एक टन क्षमतेचे गांडूळ खत बेड्‍स व सोबत प्रत्येकी एक किलो गांडूळ कल्चर देण्यात आले आहे. खतनिर्मितीत पीक अवशेषांचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. यातून रासायनिक खतांचा वापरावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

सातपुडा भागात सोयाबीन क्षेत्र वाढत आहे. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना फुले संगम, फुले अग्रणीआदी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील सुधारित वाण देण्यात आले आहे. यातील ३० टक्के उत्पादन बियाणे म्हणून साठविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

त्यामुळे दरवर्षी बियाणे विकत घेण्याची गरज उरलेली नाही. त्यावरील खर्च कमी झाला आहे. घरच्या शास्त्रशुद्ध बियाण्याचा वापर केल्याचा फायदा दिसून आला आहे. गारखेडात आदिवासी सेंद्रिय शेती गट कार्यरत आहे. तेथे शेतकरी बियाणे संवर्धन करण्याचे काम करीत आहेत.

कपाशी व तूर पीकपद्धती व गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी जैविक कीडनाशके व एकात्मिक नियंत्रण पद्धतीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. ट्रायकोडर्मा ना काही जैविक घटक, पिवळे, निळे चिकट सापळे वितरित करण्यात आले.

मिश्र पीक पद्धतीला चालना देण्यात येत आहे. अनेक शेतकरी घरापुरते तर काही विक्रीसाठी तीळ, तूर आदी पिके घेत आहेत. आदिवासी उपयोजना अंतर्गत जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्र व पाल केव्हीकेच्या मदतीने जेएलटी ४०८ या तीळ वाणाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

एकरी एक ते दीड क्विंटल उत्पादन त्यांनी हलक्या, मध्यम जमिनीत साध्य केले आहे. काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या तिळाची विक्री लगतच्या बाजारांत करीत आहेत. या तिळास किलोला ३०० ते ४०० रुपये दर आहे.

रानभाजी महोत्सवाला चालना

सातपुडा भागातील रानभाज्या व देशी धान्य महोत्सवाचे आयोजन दरवर्षी ऑगस्टमध्ये फैजपूर येथे करण्यात येते. यात देशी तूर, देशी पांढरा मका, लाल ज्वारी, गावरान बाजरी, मूग-उडीद,अंबाडी, बांबू, तरोटा, कुर्डू, फांग, सुरण, आंबट चुका, करटुले आदींची विक्री केली जात आहे. ही व्यंजने चाखण्याची व्यवस्थाही केली जाते. महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी शेती संस्कृती व परंपरांचे दर्शनही घडते आहे.

फळ शेतीला प्रोत्साहन

अनेक शेतकऱ्यांनी आंबा, मोसंबी लागवड सुरू केली आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांनाही पसंती दिली आहे. उन्हाळा वगळता अन्य काळात भाजीपाला लागवड करण्यात येत आहे. यात चवदार व सातपुडा पर्वत क्षेत्रात प्रसिद्ध मिरची लागवडीवर भर असून मध्य प्रदेशात या मिरचीला चांगलीमागणी आहे. गारबर्डी, पिपरखुट, गारखेडा व अन्य भागात चांगले मिरची उत्पादक तयार झाले आहेत.

प्रकल्पाची फलश्रुती (ठळक बाबी)

शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय वा एकात्मिक शेती केल्याचे लाभ शेतकऱ्यांना दिसून आले. जमीन आरोग्य सुधारण्यास बळ मिळाले. शेतीमालाच्या गुणवत्तेमुळे बाजारात त्यास उठाव मिळू लागला. पीक संरक्षणावरील वा एकूण उत्पादन खर्च ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाला.

परंपरा जतन करण्यासह बियाणे संवर्धन होत आहे. मोह, अंबाडी आदींच्या मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण मिळाल्याने महिला शेतकऱ्यांना प्रक्रियेसाठी प्रोत्साहन मिळाले.

रोपवाटिका निर्मिती व त्यातून वांगी, मिरची आदींची रोपे घरीच तयार करण्याला चालना मिळाली.

कपाशीचे पूर्वी असलेले एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन आता सात ते आठ क्विंटल तर तुरीचे एकरी दोन ते अडीच क्विंटलपर्यंत असलेले उत्पादन आता ४ ते ५ क्विंटलवर पोहोचले आहे. एकरी पूर्वी ४ ते ५ क्विंटल मिळणारे सोयाबीन उत्पादन आता ७ ते ८ क्विंटलपर्यंत मिळू लागले आहे.

गारखेडा येथील शेतकरी गटाच्या प्रमुख चांदणी बारेला यांचा मूल्यवर्धन व पारंपरिक वाण संवर्धन यासंबंधी जिल्हा प्रशासनाकडून सत्कार झाला. पाल केव्हीकेकडूनही आदिवासी महिला सन्मान उपक्रम राबविला.

शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनमान उंचाविण्यास मदत झाली आहे.

महेश महाजन ९९७०६६१५४६

(प्रमुख, पाल केव्हीके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मका भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत गहू दर

Maharashtra Election 2024 : पश्चिम विदर्भात अटीतटीच्या लढती

Cotton Crop : अपेक्षाभंग झाल्याने उखडून टाकली कपाशी

Maharashtra Hawaman Andaj : राज्यात थंडी वाढणार; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात मोठी घट 

Farmers in Konkan : कोकणातील शेतकऱ्यांची रब्बीची लगबग सुरू; भातशेती कामे अंतीम टप्प्यात

SCROLL FOR NEXT