Agriculture Agrowon
यशोगाथा

Agriculture Success Story : प्रयोगशीलता जपत शेतीतून साधली प्रगती

Article by Rajesh Kalambate : शिक्षणाचे पाठबळ नव्हते. वाट्याला जमीन देखील केवळ चार गुंठे आली. अशा प्रतिकूलतेतही कोतळूक ( जि. रत्नागिरी) येथील लक्ष्मण कुंभार यांनी शेतीची आवड जपली. शेती खरेदी करून प्रयत्न व नियोजनबद्ध अशी फळबाग व भाजीपाला पिकांची विविधता ठेवली.

राजेश कळंबटे

Success Story of Farmer : कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यालाही निसर्गाचं भरभरून लेणं लाभलं आहे. याच रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक (ता. गुहागर) येथील लक्ष्मण सखाराम कुंभार पूर्वी घरे बांधण्याची कामे करत होते. गावात असलेल्या पारंपरिक भातशेतीतून वर्षाला मिळणारे उत्पादन घरापुरते उपयोगी ठरायचे.

सुमारे चौदा वर्षे घर बांधणी व्यवसायात कुंभार कार्यरत होते. त्यानंतर एकत्रित शेतीची वाटणी झाली. पाच भावांमध्ये प्रत्येकी केवळ चार गुंठे जमीन आली. शेती करण्याची आवड कुंभार यांना पूर्वीपासून होतीच. त्यामुळे वाटणीस आलेली शेती चांगल्या प्रकारे करण्याबरोबरच त्यात वाढ करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. सन १९९५ मध्ये स्वतंत्र जागा घेतली. त्यावेळी शेतजमिनींचे दरही कमी होते.

घरातील सर्व उत्पन्नाचे आर्थिक नियोजन करून ३० एकर जागा कुंभार यांनी विकत घेतली.
शिक्षण कमी झाले असले तरी शेतीमधून आपण विकास साधू शकतो हा त्यांना विश्‍वास होता. त्यामुळे फळपिके, भाजीपाला अशी व्यावसायिक पीक पद्धती त्यांनी निवडली.

व्यावसायिक पीक पद्धती

कुंभार यांनी नारळाच्या ६५ तर पोफळीच्या (सुपारी) सुमारे ३०० झाडांची लागवड केली. त्यातून उत्पादन सुरु होण्यास किमान पाच वर्षे गेली. सन २००० मध्ये दोन एकरांत कलिंगडाचे पीक
घेतल.

त्यातून सुमारे १६ टन उत्पादन मिळवले. हळूहळू त्यात वाढ करीत हे क्षेत्र चार एकरांपर्यंत पोचवले. गेल्यावर्षी २७ टन कलिंगडाचे उत्पादन आणि २० ते ३० रुपये प्रति किलो दर त्यांनी
मिळवला.

पॉली मल्चिंग, ठिबक सिंचन या सुविधा केल्या आहेतच. शिवाय रोपे स्वतः तयार करण्यावर भर दिला आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये कलिंगडासह भाजीपाला पिकांमध्ये फळमाशीचा त्रास जाणवत आहे. तो रोखण्यासाठी सापळ्यांचा वापर केला आहे.

विक्री यंत्रणा

गुहागर हे पर्यटन स्थळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपती पुळे पर्यटनस्थळावरुन दरवर्षी लाखो पर्यटक राई-भातगाव मार्गे कोतळूकवरून गुहागरला जातात. ही संधी ओळखून कुंभार यांनी कोतळुक येथे कलिंगड विक्रीचा स्टॉल सुरु केला आहे.

हे पर्यटक तसेच गावातील लोकही थेट खरेदी करतात. काही माल जवळच असलेल्या शुंगारतळी येथील बाजारपेठेमध्येही विकला जातो.

मागील वर्षी ४० टन कलिंगडाची विक्री करणे व त्यातून काही लाख रुपये उत्पन्न मिळवणे
करणे कुंभार यांना शक्य झाले. नोव्हेंबर ते मे या कालावधीत सुमारे तीन टप्प्यात त्यांची लागवड
असल्याने दरांची जोखीम कमी करणे त्यांना शक्य झाले आहे.

भाजीपाला पिकांची जोड

दसरा सण आटोपला की वेध लागतात ते रब्बी हंगामाचे. यावेळी बाजारपेठेतील मागणी व संधी पाहून कुंभार लाल माठ, हिरवा माठ, मुळा आदी पालेभाज्यांची लागवड करतात. फळभाज्यांमध्ये थोडे थोडे क्षेत्र निवडून ते वांगे सुमारे तीन टनांपर्यंत तर मिरचीचे ५०० किलोपर्यंत उत्पादन घेतात.

केवळ एक दोन भाज्यांवर विसंबून न राहाता कोबी, कुळीथ, तोंडली, कारली, काकडी अशी विविधताही ठेवत असल्याने ग्राहकांच्या विविध भाज्यांची मागणी त्यातून पूर्ण करणे व नफा वाढवणे शक्य होते. सर्वसाधारण वर्षाला या पीकपध्दतीतून सुमारे अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता पन्नास ते साठ टक्क्याहून अधिक नफा हाती लागतो.

फळ बागायती झाली उत्पन्नाचे साधन

कमी कालावधीच्या पिकांबरोबर दीर्घ कालावधीच्या पिकांमध्येही चांगली गुंतवणूक केल्याने त्याचे फळ कुंभार यांना मिळू लागले आहे. नारळाच्या सुमारे ६५ तर सुपारीची सुमारे ४०० झाडे
आता १५ ते २० वर्षे वयाची झाली आहेत.

वर्षाला उत्पानदक्षम झाडांमधून पाचहजारांपर्यंत नारळ तर दीडशे किलोच्या आसपास सुपारी मिळते. नारळाला प्रति नग २० ते २५ रुपये तर सुपारीला ४८० रुपये प्रति किलो दर मिळतो. नारळाला माकडांचा मोठा उपद्रव जाणवतो.

त्यांच्यापासून झाडांचा बचाव करण्यासाठी झाडांभोवती मच्छीमारीची जाळी लावली आहे. उत्पन्नवाढीसाठी हापूस आंब्याच्या तीस तर काजूच्या ४५० झाडांचाही आधार आहे. सरासरी पाचशे ते ७०० किलो काजू बी वर्षाला मिळते. त्याची १३० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते.

प्रयोगशीलता जपली

कुंभार यांनी कृषी विभागाच्या सहकार्याने चारसूत्री पध्दतीचा वापर करून भातशेती केली आहे.
त्यातून त्यांनी एकरी २२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवले आहे. चारसूत्री पध्दतीच्या भाताची प्रात्यक्षिकेही त्यांच्या शेतात घेण्यात आली आहेत.

‘आत्मा’ अंतर्गत भाजीपाला लागवड प्रात्यक्षिके देखील त्यांच्याकडे घेतली आहेत. समृध्द ग्राम योजनेमधून कोकम,ऑस्ट्रेलिया सागाची सुमारे तीन हजार रोपे कुंभार यांनी तयार केली. त्यातील १५ हजार रोपे ग्रामपंचायतीने घेतली. उर्वरित रोपांची विक्री झाली. दापोली येथील नवभारत छात्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने (२०१८) कुंभार यांचा सन्मान करण्यात आला आहे.

गावातील सात ते आठ तरुणांसाठी कुंभार कलिंगड शेतीतील मार्गदर्शक ठरले आहेत. कुंभार यांचे आज ६५ वर्षे वय असले तरी युवकांच्या उमेदीने व उत्साहाने ते शेतीची धुरा यशस्वी सांभाळत आहेत. त्यांना पत्नी लक्ष्मी यांची शेतीत मोठी मदत होते. शेतीतील उत्पन्नातूनच या दांपत्याने आपल्या सर्व मुलांना चांगले शिक्षण देत आयुष्यात स्थिरसावर होण्यासाठी मदत केली. सर्वात धाकटा मुलगा प्रवीण कृषी पदवीधर आहे.

शेतीची सुरवातीपासून आवड होती. त्यामुळे गावातच शेती घेऊन २८ वर्षांपासून व्यावसायिक शेती करतो आहे. त्यातूनच घरची प्रगती साधली आहे. शेतीत गावातील अधिकाधिक तरुण यावेत असे मला वाटते. त्यासाठी त्यांना मोफत मार्गदर्शन करण्याची माझी तयारी आहे.
लक्ष्मण कुंभार- ७५८८७८५६४०, ९४२१९६९८१२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT