Agriculture Success Story Agrowon
यशोगाथा

Grape Farming : द्राक्षशेतीला ठरला पोल्ट्री व्यवसाय आधार

Poultry Farming : खैरेवाडी (ता.माढा, जि. सोलापूर) येथील बंडू सोनवणे यांनी द्राक्ष, ऊस व पेरू या नगदी पीक पद्धतीला देशी कोंबडीपालनाची जोड दिली आहे. त्यातून उत्पन्नस्त्रोत व आर्थिक प्रगती साधण्याबरोबर शेतीला उत्तम दर्जाचे पोल्ट्रीखतही उपलब्ध केले आहे.

सुदर्शन सुतार

Agriculture Success Story : सोलापूर जिल्ह्यात अनगर ते माढा महामार्गावर पाचमैल येथून दोन-अडीच किलोमीटरवर खैरेवाडी (ता.माढा) हे छोटं गाव आहे. सीना नदीच्या पट्ट्यात गाव येत असल्याने ऊस, द्राक्ष, भाजीपाला,केळी आदी नगदी पिकांची बागायती शेती करण्याला येथील शेतकऱ्यांना वाव मिळाला आहे. गावात बंडू किसन सोनवणे यांची १० एकर शेती आहे. त्यात चार एकरांत द्राक्षे, तीन एक पेरू व दोन एकरांत ऊस आहे.

आई-वडील, पत्नी, लहान भाऊ शंकर, भावजय व मुले असे सोनवणे यांचे १२ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. सर्व सदस्य शेतीत राबतात. वडील किसन पूर्वी घरची शेती करण्यासह मिळेल तेथे मजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवत. एखाद्या कृषी पदवीधरालाही हेवा वाटेल अशी शेती आणि त्यातील प्रयोग कुटुंबाने केले. त्यामुळेच या भागातील प्रगतशील कुटुंब म्हणून त्यांना आज लौकिक प्राप्त करता आला आहे.

अखेर शेतीच्याच विकासाकडे लक्ष

साधारण दहावीतूनच बंडू यांनी शाळा सोडली. मोडनिंब येथे बांधकाम ठेकेदार असलेले मामा सुभाष सुर्वे यांच्याकडे ते कामावर रुजू झाले. तेथे बांधकाम व्यवसायातील बारकावे जाणले. व्यवसायात चांगले कौशल्य मिळवले. दोन वर्षानंतर स्वतंत्रपणे या व्यवसायात पाय ठेवले. त्यात चांगले यश मिळाले.

त्यांतून उत्साह वाढला. पुढे व्यवसायातील मजुरांची समस्या, साहित्याचे वाढते दर व तांत्रिक समस्यांमुळे व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेना. अखेर घरच्या शेतीचाच भरीव विकास करायचा असे त्यांनी ठरवले. त्यानुसार २०१२ च्या दरम्यान सीना नदीवरून पाइपलाइन करुण पाण्याची शाश्‍वती तयार केली. द्राक्षशेतीला सुरवात केली. पहिल्याच हंगामात चांगले यश मिळाले. आत्मविश्‍वास दुणावला. त्यानंतर मग बंडू यांनी मागे वळून पाहिले नाही.

बेदाणा शेड व कोंबडीपालन

बंडू द्राक्षशेतीतून बेदाणा निर्मिती करतात. त्यांच्याकडे पूर्वीपासूनच १२५ बाय ३० फूट बेदाणे शेड होते. परंतु बेदाणा हंगाम संपल्यानंतर वर्षातील अन्य महिने शेड रिकामेच असायचे. अशा काळात शेडचा पुरेपूर विनियोग व्हावा यादृष्टीने त्यात काय करता येईल याचा विचार सुरू झाला. त्यातून मग कोंबडीपालनाची कल्पना पुढे आली.

अखेर शेडमध्ये थोडे बदल केले. आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करत कमी गुंतवणुकीमध्ये २०१८ मध्ये देशी कोंबडीपालनाला सुरवात केली. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत बेदाणा आणि एप्रिल ते डिसेंबरपर्यंत पोल्ट्री असे व्यवसायाचे स्वरूप ठेवले.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

कोंबडीपालनाच्या वर्षातून तीन बॅचेस घेतल्या जातात. प्रति बॅचमध्ये सुमारे सातहजार कोंबड्या असतात. संकरीकरणातून तयार झालेली देशी कोंबडीचे हे सुधारित ‘ब्रीड’ आहे. या कोंबड्यांना बाजारात चांगला उठाव मिळतो. अंडी उत्पादनापेक्षाही मांस उत्पादनासाठी ती अधिक पाळली जाते.

प्रत्येक बॅच सुरू करताना एक दिवसाचे पिल्लू आणून संगोपन सुरू केले जाते. आज व्यवसायातील सहा वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. त्यामुळे व्यवस्थापनातील बाबी व बाजारातील चढ-उतार चांगलेच माहीत झाले आहेत. त्यामुळे व्यवसाय किफायतशीर करण्याचा अधिकाधिक प्रयत्न बंडू करतात. प्रत्येक बॅच सुरू करताना एक दिवसाचे पिल्लू आणून संगोपन सुरू केले जाते.

थेट जागेवर होते विक्री

बंडू यांचे व्यापाऱ्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, हैदराबाद येथून व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. साधारण ७० दिवसांत कोंबडी विक्रीयोग्य होते. विक्रीवेळी प्रति कोंबडीचे वजन सुमारे १३०० ग्रॅम किंवा त्यापुढे असते. अलीकडील काही वर्षांचा आढावा घेतल्यास प्रति किलो १६० रुपये दर मिळाला आहे. तर कमाल दर २०० रुपयांपर्यंत मिळाला आहे. दरवर्षी बेदाण्याचा हंगाम पार पडला की पुढे कोंबडीपालनाची तयारी सुरू होते. बंडू सांगतात की बेदाणा हंगाम सुरू होण्यापूर्वी व तो संपल्यानंतर शेडची स्वच्छता, निर्जंतुकीकरण या बाबी काटेकोरपणे केल्या जातात.

प्रत्येक बॅचसाठी पक्षी खरेदी करणे आणि व्यवस्थापन हे महत्त्वाचे काम असून त्याचे वेळापत्रक तयार केलेले असते. पिल्ले खरेदी, पशुखाद्य, अन्य व्यवस्थापन आणि त्या-त्या हंगामात मिळणारा दर,त्यातील चढ-उतार असा सर्व खर्च लक्षात घेता वर्षभरात काही लाख रुपयांचे उत्पन्न हाती पडते. शिवाय वर्षाकाठी एकहजारांपर्यंत पोती कोबडीखत उपलब्ध होते. त्याचा वापर घरच्या शेतीसाठी होतो. तसेच उर्वरित खतविक्रीतून चांगली कमाई देखील होते.

आर्थिक प्रगती झाली

बंडू सांगतात की पूर्वी पाच एकरच शेती होती. शेती व पोल्ट्री व्यवसायातून पाच एकर शेती विकत घेणे शक्य झाले. नदीवरून चार किलोमीटरवरून पाइपलाइन करण्यासाठी भांडवल तयार केले. आता दोन भावांचे दोन बंगले बांधण्याचे काम सुरू आहे. शिवाय कुटुंबाचा संपूर्ण चरितार्थ शेतीतील उत्पन्नातूनच होतो. असा प्रकारे कौटुंबिक व आर्थिक स्थैर्यही प्राप्त केले आहे.

बंडू सोनवणे ९९७०९३१३९९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Panchayat Administration : लोकाभिमुख असावे ग्रामपंचायतीचे नियोजन...

Medicinal Plants : औषधी वनस्पती विकासातील खोडे काढा

Kolhapur Rain Forecast : कोल्हापुरात जोरदार पाऊस; भात, भुईमूग पिकांचे नुकसान, दोन दिवस पावसाची शक्यता

Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Warehouse Construction : गोदाम उभारणीमध्ये वजन काटा महत्त्वाचा...

SCROLL FOR NEXT