Poultry Care : कोंबड्यांची प्रत्येक हंगामामध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य बदल करावा लागतो. आपल्याकडे ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांत तापमान कमी असते. हिवाळ्यात कोंबड्यांची थंडीच्या कडाक्याने (कोल्ड स्ट्रोक) मरतूक होते. जर १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि २८ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असेल तर कोंबड्यांवर परिणाम होतो.
कोंबड्याच्या वाढीसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस तापमान चांगले असते. परंतु थंडीमध्ये काही भागातील तापमान २१ अंश सेल्सिअसपेक्षा खूप कमी होते, अशावेळी कोंबड्यांना शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जादा ऊर्जेची गरज असते. हिवाळ्यामध्ये जर तापमान खूपच कमी झाले तर कोंबड्या थंडीच्या कडाक्याने मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे हिवाळ्यात कोंबड्यांची काळजी घ्यावी लागते.
परिणाम करणारे घटक
शेडमधील अनियंत्रित हवामान.
ब्रूडिंग व्यवस्थापनातील त्रुटी.
शेडच्या पडदे व्यवस्थापनात त्रुटी.
शेडमध्ये पुरेशी हवा खेळती न राहणे.
कमी जागेमध्ये जास्त कोंबड्या ठेवणे.
पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये त्रुटी.
कोंबड्यांना खाद्य पुरवठा कमी होणे.
लिटरचे अयोग्य व्यवस्थापन.
तापमान व्यवस्थापन
शेडमधील नियंत्रित तापमान : १८ ते २४ अंश सेल्सिअस.
शेडमधील आर्द्रता : ५० ते ६० टक्के
शेडमधील अमोनियाचे प्रमाण : २५ पीपीएम पेक्षा कमी.
पिण्याच्या पाण्याचा सामू : ६.८ ते ७.५
पिण्याच्या पाण्याचा हार्डनेस : ६० ते १८० पीपीएम.
हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण : २१ टक्के
शेडमधील नियोजन
कोंबड्यांचे अती थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या लांबीच्या बाजूने असलेल्या जाळीस स्वच्छ व कोरडे पडदे लावावेत. पडद्यांची उघडझाप सहज करता यावी आणि पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत. दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत.
शेडमध्ये योग्य वायुवीजन व खेळती हवा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी ज्या वेळेस शक्य आहे, अशा वेळेस पडद्यांची उघड-झाप वरून खाली करावी. तसे केल्यास कार्बन डायऑक्साइडयुक्त दूषित हवा पटकन बाहेर फेकली जाते. अशी दूषित हवा बाहेर न टाकल्यास आणि कोंबड्यांना ऑक्सिजनयुक्त (स्वच्छ) हवा उपलब्ध न झाल्यास त्यांना हायपोक्षीया (ऑक्सिजनची कमतरता) होतो. जलोदर सारखे चयापचयाचे आजार होतात, मरतूक वाढते.
कोंबड्या शेडवर आल्यानंतर साधारण तिसऱ्या आठवड्यापासून जलोदरचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. शेडला लावलेल्या पडद्यांचे उघडझाप करण्याचे नियोजन योग्य न केल्यास, शेडमधील तयार होणारा अमोनिया बाहेर फेकला जात नाही, त्यामुळे शेडमधील अमोनियाचे प्रमाण वाढून कोंबड्यांना श्वसन संस्थेचे आजार होतात, डोळ्यांना त्रास होतो.
यामुळे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होऊन वजनात घट होते, औषधांचा खर्च वाढतो. म्हणून हिवाळ्यामध्ये शेडला लावलेल्या पडद्यांचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. शेडची रचना ही पूर्व-पश्चिम असावी. रुंदी ३० फुटांपेक्षा जास्त नसावी. शेडची रुंदी जास्त असल्यास शेडमधील हवा खेळती राहणार नाही.
खाद्यामधील बदल
हिवाळ्यात कोंबड्यांच्या खाद्यात योग्य बदल करावेत. हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खातात. यामुळे खाद्यावरील खर्च जास्त होतो, ऊर्जा तयार करण्यासाठी न लागणारी पोषणतत्त्वे वाया जातात.
खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी आणि अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जायुक्त खाद्य पदार्थ जसे तेल, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे खाद्यातील प्रमाण वाढवावे. इतर पोषणतत्त्वांचे प्रमाण तितकेच ठेवावे. आहारात ऊर्जावर्धक घटकांचे प्रमाण वाढवावे (१०० किलो कॅलरीज प्रति किलो खाद्य) आणि प्रथिनांचे प्रमाण १ ते २ टक्के कमी करणे आवश्यक असते.
खाद्यामध्ये अ, क आणि ई या जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढवावे. एक लहान फिडर प्रती ४० पिल्लांना तर एक मोठा फिडर प्रती ३० मोठ्या कोंबड्यांसाठी वापरावा. फिडरची उंची कोंबडीच्या पाठीच्या दोन इंच वर असावी.
ब्रूडिंग व्यवस्थापन
ब्रूडिंग कालावधीत पिल्लांना ब्रुडरच्या साहाय्याने कृत्रिम उष्णता देतो. उन्हाळ्यामध्ये ब्रूडिंग करताना प्रती पिल्लू १ वॅट उष्णता वाढवून ती हिवाळ्यामध्ये २ वॅट पर्यंत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी ब्रूडिंगचे योग्य नियोजन करावे.
ब्रूडिंग करताना शेडच्या दोन्ही बाजूस स्वच्छ धुतलेले कोरडे पडदे लावणे आवश्यक आहे. ते पडदे वर आणि खाली करण्यासाठी दोऱ्यांची सोय पद्धतशीरपणे केलेली असावी. मुळातच कोंबडीच्या शरीराचे तापमान जास्त ४१.७ अंश सेल्सिअस असल्यामुळे कमी तापमानाच्या वातावरणात पिल्ले वाहतूक केल्यामुळे किंवा ब्रूडिंग करण्यास उशीर झाल्यामुळे, त्यांच्यामध्ये अशक्तपणा येऊ शकतो.
पहिल्या आठवड्यात मरतुकीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. म्हणून पिल्ले फर्मवर येण्यापूर्वीच ब्रूडिंगची तयारी झालेली असावी, ब्रुडर चालू करून ठेवलेले असावेत.
ब्रूडिंग करताना चिक गार्डचा वापर केला जातो. त्याची उंची कमीत कमी ३० ते ३५ सेंमी असावी. चिक गार्डच्या बरोबर मध्यभागी कमीत कमी एक फुटावर सुरुवातीला ब्रुडर टांगावा. आपल्याकडे लोड शेडिंगचा अडथळा असल्यास बुखारी ब्रुडर/ गॅस ब्रुडर/जनरेटरची सोय असावी. वातावरणातील तापमानानुसार ब्रूडिंगचा कालावधी कमी जास्त करावा.
पिल्लांच्या हालचालीवरून तापमानाची कल्पना
अ) तापमान कमी असल्यास पिल्ले ब्रुडरखाली जास्त प्रमाणात घोळका करतात.
ब) तापमान जास्त झाल्यास पिल्ले ब्रुडरपासून लांब जातात. चिकगार्डजवळ जमा होतात. खाद्य खाणे, पाणी पिणे सावकाश होते. विशिष्ट प्रकारचा काहीतरी बिनसल्यासारखा आवाज काढतात.
क) ब्रुडरखालील तापमान योग्य असल्यास पिल्ले सर्वत्र सारख्या प्रमाणात विखुरलेली दिसतात. तसेच पिल्लांची हालचाल, खाद्य खाणे, पाणी पिणे हे पहिल्या दोन स्थितीपेक्षा विशेष चांगले दिसून येते.
ब्रुडींग कालावधीत महत्त्वाच्या गोष्टी
खाद्य, पाण्याची भांडी गाडीच्या चाकाच्या आरीप्रमाणे ब्रुडरखाली ठेवावीत.
पिल्लांना योग्य उष्णता मिळते का ते पाहावे. त्याप्रमाणे ब्रूडरची उंचीवर खाली करावी.
पहिल्या २४ तासात पिल्लांचे अन्न साठवण्याची पिशवी (क्रॉप) भरल्याची खात्री करावी.
वयोमानानुसार खाद्य, पाण्याची भांड्यांची उंची वाढवावी.
कोंबड्यांना योग्य वायुवीजन मिळत असल्याची खात्री करावी.
नियमितपणे पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावीत.
नियमितपणे पाण्यामध्ये सॅनिटायझर वापरावे.
कोंबड्यांना लागणारी जागा त्यांच्या वाढीनुसार, वाढवून द्यावी.
शेडमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कोंबड्यांची गर्दी करू नये.योग्य जागा ठेवावी.
पिल्लांना खाद्य विभागून द्यावे.
लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे पाळावा.
ब्रूडिंगचा कालावधी योग्य ठेवावा. त्यामुळे पिल्लांची योग्य वाढ होते.
- डॉ. विजयसिंह लोणकर, ७८७५५७०३९२ (प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.