उस्मानाबाद-बीड महामार्गावर सरमकुंडीपासून (कुंथलगिरी) आठ-दहा किलोमीटरवर गिरवली गाव आहे. येथे कृष्णा सातपुते आणि डॉ. संभाजी चव्हाण यांनी संयुक्तपणे उभारलेला दुग्धप्रक्रिया व्यवसाय (Dairy Business) पाहण्यास मिळतो.
सुमारे पंधरा वर्षांपासून दोघांनी आपली घनिष्ठ मैत्री जपली आहे. सातपुते यांनी ‘डेअरी’ (Dairy Diploma) विषयातील पदविका घेतली आहे. ‘एलएसएस’ अशी पदवी त्यांच्याकडे असून, या भागात ते पशुवैद्यकीय सेवा (Veterinary Service) पुरवतात. डॉ. चव्हाण ‘बीएचएमएस’ असून, याच परिसरात ते वैद्यकीय सेवा पुरवतात. त्यांचे गाव गिरवलीपासून सहा किलोमीटरवर आहे.
प्रशिक्षण ठरले फायद्याचे
दोघेही मित्र आपापल्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे स्थिर आहेत. जोडीला काहीतरी नवा व्यवसाय करण्याचे त्यांच्या मनात होते. या भागात दुभत्या जनावरांचे संगोपन चांगल्या प्रमाणात होते. त्यामुळे पारंपरिक खवा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. त्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सन २०१५ च्या सुमारास पुणे, कोल्हापूर, सोलापूर भागांतील छोट्या- मोठ्या व्यवसायिकांचे प्रकल्प पाहिले.
शास्त्रशुद्ध माहिती, बारकावे जाणून घेण्यासाठी पुणे येथील ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एसआयएलसी’ येथे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यातून खवा व अन्य उत्पादनांच्या उद्योगाची क्षमता आली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून आत्मविश्वास मिळाला. नव्हे, हाच व्यवसायासाठीचा ‘टर्निंग पॅाइंट’ ठरला. २०१८ मध्ये खऱ्या अर्थाने व्यवसायाला सुरुवात झाली. जोखीम, धाडस, चिकाटी, व्यावसायिक वृत्ती व कष्टांच्या जोरावर साडेचार वर्षांनंतर आज त्यात ओळख तयार करण्यात दोघा मित्रांना यश आले आहे.
...अशी होते प्रक्रिया
-सकाळी सहा वाजता दूध संकलनासाठी (गायीचे दूध) वाहने परिसरातील गावात पाठवण्यात येतात.
-सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान संकलित दूध निर्मिती प्रकल्पात आणले जाते.
-दुधाचे मोजमाप व बल्क मिल्क कूलरमध्ये ठेवण्यात येते.
-चार अंश सेल्सियसला ते थंड केले जाते.
-त्यानंतर पाइपलाइनद्वारे स्टीम बॉयलरच्या कढईमध्ये खवा निर्मितीसाठी पाठवले जाते.
-स्वयंचलित यंत्राधारे दूध गरम करणाऱ्या दहा कढया. त्यात दूध घेऊन प्रति मिनिट एक लिटर या वेगाने घोटवलेले जाते. प्रति कढई प्रति ४० मिनिटाला ४० लिटर दूध घोटून खवा तयार केला जातो.
-त्यानंतर बॉक्स वा पॅकिंगमध्ये ठेवून उणे १७ अंश सेल्सियसमध्ये ‘कोल्ड रूम’मध्ये
ठेवले जाते. असा प्रकारे ते तीन महिने टिकू शकते. मात्र तेवढे ‘स्टोअर’ करण्याची गरज भासत नाही.
-फॅट व एमएनएफच्या प्रमाणानुसार पाच लिटर दुधापासून एक किलो खवा तयार होतो.
उत्पादने निर्मिती ः
-दररोज ३५० ते ४०० किलोपर्यंत खवा, तर ६०० लिटरपर्यंत लस्सी. (हंगामात)
-महिन्याला १०० किलोपर्यंत तूप व २५० ते ३०० किलो पनीर
-उत्पादनांचा ‘ओएसीस’ ब्रॅण्ड
-खव्याचे बॉक्स व तुपाचे बरणी व पाऊच पॅकिंग. सुट्या पद्धतीनेही खवा विक्री. लस्सीचे आकर्षक कप.
-सातपुते आणि डॉ. चव्हाण यांच्याकडे स्वतंत्र जबाबदाऱ्या आहेतच. शिवाय
सातपुते यांची पत्नी सौ. स्नेहा दूध संकलन विभाग तर चव्हाण यांची पत्नी सौ. तेजश्री निर्मिती विभागाचे कामकाज पाहतात.
-बहुतांशी स्वयंचलित यंत्रांचा वापर असून स्टीम बॉयलर आधारित खवा निर्मिती प्रकल्प आमच्या भागात आम्हीच प्रथम सुरू केल्याचे सातपुते सांगतात. दूध वाहतूक, संकलन, निर्मिती आणि ‘मार्केटिंग’ मिळून सुमारे तेरा जणांचा कर्मचारी वर्ग आहे. त्यातून स्थानिक रोजगार तयार झाला आहे.
-दर दहा दिवसांमागे सुमारे आठ ते नऊ लाख, तर महिन्याला सुमारे २५ लाखांहून अधिक उलाढालीपर्यंत मजल मारली आहे.
गुणवत्तेतून मार्केट
सातपुते म्हणाले, की स्वच्छ आणि दर्जेदार दुधाचा आम्ही वापर करतो. ‘एनएबीएल’ प्रयोगशाळांमधून खवा व तुपातील घटक तपासले आहेत. निर्यातीसाठीही ते पात्र आहेत. ‘फूड सेफ्टी’ विषयातील संस्थेचा परवानाही घेतला आहे.
ही गुणवत्ता तसेच आकर्षक, देखणे पॅकेजिंग यामुळे मार्केटमध्ये विश्वासार्हता तयार होण्यास मदत मिळाली अक्कलकोट, सोलापूर, पुणे, कल्याण, संगमनेर आदी शहरांमधील स्वीट मार्ट व्यावसायिकांकडून खव्याला सर्वाधिक मागणी आहे. खव्याची ‘एमआरपी’ २९० रुपये, तर तुपाची ५१० रुपये प्रति किलो आहे. होलसेल दर कमी आहेत. पनीर प्रति किलोला ३०० रुपये, तर लस्सी १५ रुपये प्रति कप दर आहेत.
पाच ठिकाणी संकलन केंद्रे
गिरवली, पखरुड, ज्योतिबाची वाडी, घाटपिंपरी, सोनेवाडी अशा पाच ठिकाणी दूध संकलन केंद्रे आहेत. सुरुवातीला १०० लिटर असलेले संकलन आज २५०० ते तीन हजार लिटरपर्यंत पोहोचले आहे. अडीचशेपर्यंत शेतकऱ्यांचे त्यासाठी नेटवर्क आहे. स्पर्धात्मक पद्धतीने अन्य डेअरीच्या तुलनेत एक-दोन रुपये दर जादा देण्यात येतो. सध्या तो प्रति लिटर ३६ रुपये आहे.
संपर्क ः कृष्णा सातपुते, ९४२०३१०६२५
डॉ. संभाजी चव्हाण- ९४२१०५१६७१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.