Rural Story: सह्याद्रीतील माची, गाव आणि शेती हेच शंकरचं खरं विश्व. मुलांना प्रगतीच्या महामार्गावर आणून शंकर पुन्हा सह्याद्रीच्या रांगांत परतला. जंगलातील डोंगरवाटेने हिरव्या शेतीकडे जात काळ्या मातीत कष्टाचे हात भरवून घेतले. शंकरला रखमाबाईची चांगली साथ मिळाली आहे. गावशिवार आधुनिक शेतीनं सजवण्याचं स्वप्न त्याने गावकऱ्यांच्या मनात पेरलं आहे..१९७४ मधील हिवाळ्याची एक सकाळ... धुक्यात लपटलेले जंगल पार करीत सूर्याची पहिली किरणं कमळगडाकडून किरोंडे माचीवर पोहोचली. पिवळ्या उन्हाने शंकरची झोपडी उजळून टाकली. थंडीमुळे हौसाकाकीच्या पदराखाली रात्रभर कोंबडीच्या पिलासारखा बिलगून पडलेला शंकर जागा झाला. तो कोवळ्या उन्हात काकीची पावलं शोधू लागला. काकी आता माचीवर कोणत्या दिशेला गेली याचा माग काढून, तो नेहमीसारखा जंगलाकडे जाणार होता. माचीखालच्या किरोंडे (जि. सातारा) गावातील शेतकरी तुकाराम ढवळे यांच्या चार मुलांपैकी शंकर हा एक स्वप्न साकारणारा प्रवासी....Maharashtra Rural Poverty: महाराष्ट्रात ग्रामीण गरिबी दिवसेंदिवस का वाढू लागली?.ऐतिहासिक जावळी खोऱ्यातील धोम धरणाकाठी घनदाट अरण्यात वसलेला कणखर कमळगड. या वनदुर्गाची एक विशाल डोंगररांग दाट जंगलाचे पठार अंगाखांद्यावर खेळवत पश्चचिमेकडे जाते आणि पुढे सह्याद्रीच्या मुख्य पर्वतधारेला जाऊन मिळते. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील कमळगडाच्या डोंगरधारेत किरोंडे माची वसलेली आहे. शिवरायांच्या एकनिष्ठ मावळ्यांनी स्वराज्य रक्षणासाठी कधीकाळी या माचीवरील जंगलात वस्ती केली होती. तेथील मावळ्यांची वंशावळ तीन शतकानंतर देखील या माचीवर टिकून आहे. त्यातील एक बहादूर शेतकरी मावळा म्हणजे शंकर. ही कहाणी त्याच्या जिद्दीची, कष्टाची, संघर्षमय प्रवासाची आहे..माचीवरील जीवनदऱ्याखोऱ्यातील शेतीत तेव्हा काहीच पिकत नसायचे. कुटुंबाची उपासमार नको म्हणून कष्टकरी बाप तुकाराम ढवळे यांनी शंकरला माचीवर टाकले आणि गाव सोडले. ते मुंबईत हमाल बनले. यामुळे वडिलांच्या प्रेमाला शंकर पारखा झाला. सुदैवाने आई मात्र मुंबईला गेली नाही. ती चिवटपणे डोंगरात शेती करीत शंकरची काळजी घेऊ लागली. आई रखमाबाई, अर्जुनकाका आणि हौसाकाकीसोबत शंकर माचीवरच्या जगात रमला..Maharashtra Rural Poverty : उत्तर प्रदेश, बिहारपेक्षा ग्रामीण महाराष्ट्र अधिक मागास.कष्टकरी आईकडून शेती, काकीने गुराढोरांत रमण्याचे; तर कीर्तनकार काकाकडून वारकरी जीवनशैलीचे धडे घेत शंकर मोठा झाला. दिवसभर माचीवरच्या रानात, गुराढोरांमागे हुंदडणारा शंकर पाच वर्षांचा झाला. आता तो माचीखालच्या गावात शाळेत जाऊ लागला. चौथीपर्यंत केवळ शिकण्यापुरता शंकर माचीखाली उतरत असे. एरवी माची हेच त्याचे विश्व. .इकडे मुंबईत हमाल बनलेला शंकरचा बाप मुलाच्या नशिबी हमाली नको म्हणून पैसे साचवत होता. त्याने मग शंकरला पाचवीत थेट वाई-पाचगणीच्या शाळेत दाखल केले. तेथील श्रीमंती शैक्षणिक वातावरण जंगलपुत्र शंकरचे डोळे दिपवून टाकत होते. माची, जंगल, गुरंढोरं असलेलं जग तुटलं होतं. शंकरची घुसमट वाढत गेली. त्याला माची आणि आईवडिलांची सारखी आठवण होई. अखेर एक दिवस संयम सुटला अन् पिंजऱ्यातून पाखरु उडाले..Rural Maharashtra : ग्रामीण महाराष्ट्र बिहारपेक्षा जास्त मागास.शंकर पाचगणीतून चक्क पळाला आणि थेट माचीवर पोहोचला. माचीवर अचानक शंकरला पाहून आई चकित झाली. “आई.. मला पाचगणीत नाही शिकायचं. मला माची आवडते. तू आवडते. मला बाबांची आठवण येते. आता मी कधीच शिकणार नाही. मी कामासाठी मुंबईला बाबाकडे जाईल.” एका दमात शंकर सारं काही बोलून गेला. आई हबकली. ती म्हणाली, “बाळा, अशी जिद्द धरू नको. तुला माचीवरची गुरंढोरं आवडतात ना? .मग त्यांच्यासंगे इथेच राहा. पण मुंबईला बाबाकडे जाऊ नको.” शाळेची नाळ कायमची तोडून माचीवर परतलेला शंकर समजदार झाला होता. त्याला आईचे हाल बघवत नव्हते. बापासारखे मोठे व्हावे, पैसे कमवून आईवडिलांना मदत करावी, अशी स्वप्नं त्याला पडू लागली. मात्र बाप कोणत्या स्थितीत मुंबईत जगतोय याविषयी तो अजाण होता. अखेर जिद्दी शंकरने गाव सोडण्याचा निर्णय घेतला..Infrastructure in Rural Maharashtra : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?.मुंबईकडे निघालेल्या गावच्या माणसाबरोबर एकटा शंकर चक्क मुंबईच्या मायानगरीत अवतरला. त्याला पाहून बापालाही धक्का बसला. “बाबा, मी तुझ्याबरोबरच इथं राहीन. मी पडेल ते काम करेल. मिळालेला पैसा तुला आणि आईला देईल.” शंकरचा हा भोळा निर्धार पाहून बापाच्या डोळ्यात पाणी तरळले. शंकरचे पलायन बापाने मान्य केले आणि त्याला मुंबईत आपल्याजवळ ठेवले. शंकरच्या संघर्ष कहाणीला खरी सुरुवात इथूनच झाली..मुंबईतील जगण्याचा संघर्षमाचीवर गाईगुरांना हुसकणारे, रानावनात फळे तोडणारे, कडेकपारी चढणारे शंकरचे हात आता किराणा दुकानात पुड्या बांधण्यात गुंतले. तो चार रुपये रोजाने १२ ते १४ तास राबू लागला. थकलेला शंकर रात्री हमाल बापाच्या श्रमिक कुशीत झोपायचा. हमाली करून फोड आलेले बापाचे हात शंकरला ऊब द्यायचे. मुंबईत दुकानाच्या एका रिकाम्या गाळ्यात सारे हमाल दाटीवाटीने झोपायचे. त्यात हे दोघे कष्टकरी बापलेक असायचे. .Micro Finance in Rural Maharashtra : ग्रामीण भागातील नवीन सावकारी सापळा काय आहे? जाणून घ्या मायक्रो फायनान्सची बाराखडी.बापाला मात्र शंकरचे हाल पाहावेना. डोळ्यात पाणी आणत या आठवणींना उजाळा देत शंकर ढवळे म्हणाले, “हमाल वडील केवळ माझ्यासाठी मुंबईत निवारा शोधू लागले. त्यांनी लवकरच चेंबूरच्या चाळीत पत्र्याची एक खोली घेतली. त्यामुळे मी चेंबूरमध्ये आलो आणि तेथे एका मोठ्या किराणा दुकानात कामाला लागलो. मला पहिला पगार ३५० रुपये मिळाला. अत्यानंद झाला. पगाराच्या नोटा मी बापाच्या पायाजवळ ठेवल्या..तेथूनच आई, काका-काकी आणि माझ्या आवडत्या माचीला दंडवत घातला. मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही. अंग मोडणारं काम करूनही पगार कमीच मिळत होता. उपासमार होत असायची; पण गावाकडे परतणे शक्य नव्हते. तुफान पावसामुळे डोंगरातील शेतीत भात सोडून काहीच पिकत नव्हते. त्यामुळे मी मुंबईतच राहण्याचे पक्के केले. जगण्यासाठी अजून पैसे मिळावेत म्हणून मग रिक्षा चालवू लागलो.”.मूळचा शेतकरीपुत्र शंकर आता किराणा कामगार आणि रिक्षाचालकही झाला. मुलगा कमवू लागताच आईवडिलांनी शंकरचं लग्न ठरवलं. माचीखालच्या किरोंडे गावासमोरच कमळगडच्या डोंगराला खेटून असलेल्या कोंढावळे गावात सोयरिक जमली. तेथील शेतकरी लक्ष्मण रामजी कोंढाळकर यांची कष्टाळू कन्या रखमाबाई आता शंकरची जीवनसखी झाली. शंकरराव सांगतात, “लग्नात आवडीनिवडीचा प्रश्नच नव्हता..आईवडील शोधतील त्या मुलीच्या गळ्यात माळ टाकायचं मी ठरवलं होतं. रखमा घरात आली आणि तिने आमच्या एकत्र कुटुंबाची मोट अजून मजबूत केली. रखमा माझ्यासोबत मुंबईला आली नाही. तिने माझ्या आईसोबत गावाकडेच शेतीत राबवण्याचा निर्णय घेतला. तिच्यासंगे शेती करण्याचा मलाही खूप मोह होई. पण, मी मुंबईत आणि रखमा गावाकडे राबत होती. संसार वाढू लागला तसा पुन्हा पैसा कमी पडू लागला. त्यामुळे मी किराणा दुकानाची नोकरी कायमची सोडली. मी फक्त रिक्षा चालवू लागलो.” (संपूर्ण लेख वाचा २०२५ च्या अॅग्रोवन दिवाळी अंकात)अंक खरेदीसाठी लिंक- https://shorturl.at/TJmdc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.