Horticulture Crop
Horticulture Crop Agrowon
यशोगाथा

Sangli News: माळरान, पडीक जमिनीवर बागवानी पिकांचा ‘पॅटर्न’

श्‍यामराव गावडे 

Sangli News : सांगली जिल्ह्यातील शिराळा हा डोंगराळ व दुर्गम तालुका आहे. त्यामुळे शेतीत प्रयोग करताना अनेक वेळा शेतकऱ्यांना मर्यादा येतात. तालुक्यातील धसवाडी येथील आनंदराव रामचंद्र धस हे प्रयत्नवादी व प्रयोगशील शेतकरी आहेत.

सन १९७७-७८ चे पदवीधर असणारे धस यांनी कोल्हापूर येथे पदवीचे शिक्षण घेतले. ‘पीएसआय’ परीक्षेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पण यश आले नाही. शेतीतच प्रयोग (Agriculture Experiment) करून त्यात प्रगती करायचे ठरवले. वडिलोपार्जित दीड एकरात ते राबू लागले.

व्यवसायाचा अनुभव

एका पाणी योजनेचा कालवा धस यांच्या शेतातून जाणार होता. जागा पाहणीसाठी आलेल्या ठेकेदाराने हे काम तुम्ही करू शकाल का असे विचारले. मजूर व घरातील सदस्यांच्या मनुष्यबळावर कालव्याची खुदाई धस यांनी करून दाखवली. त्यात तीन हजार रुपयांचा नफा झाला.

मग हा व्यवसाय करावा असे ठरवले. बघता बघता सुमारे १५ ते १६ वर्षे त्यात अनुभव तयार झाला. त्यातून दोन पैसे शिल्लक राहिले. दरम्यान, गावाशेजारी पाच एकर माळरान जमीन खरेदी केली. त्यात कुसळदेखील उगवत नव्हते. अनेकांनी त्यांना वेड्यात काढले.

पीक पद्धती

पिकांची निवड : धस सांगतात, की कलिंगडाचे एकाचवेळी जास्त उत्पादन मिळते. व्यापारीही जागेवर येऊन माल घेतात. उन्हाळ्यात या पिकाला मागणी असते. हे लक्षात घेऊन जानेवारीत त्याची लागवड होते.

दीड एकरांत सुमारे १५ डंपिंग शेणखत विस्कटले जाते. साडेचार फुटाचे गादीवाफे (बेड) तयार केले जातात. ठिबकसह ‘मल्चिंग पेपर’चा वापर होतो.

विक्रीची पद्धत : काढणीवेळी पिकाचे तसेच कलिंगडाच्या रसरशीत लालचुटूक फोडींची छायाचित्रे, व्हिडिओ तयार करून व्यापाऱ्यांना मोबाईलद्वारे पाठवले जातात. व्यापारी प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन पाहणी करतात.

उन्हाळा नुकताच सुरू झालेला असतो. कलिंगडाची आवक तशी कमी असते. अशावेळी किलोला सरासरी बारा रुपयांपर्यंत तर सरासरी ८ रुपयांपर्यंत दर मिळतो. एकरी २५ टन ते त्यापुढेही उत्पादन मिळते.

कारली : कलिंगडाची काढणी झाल्यानंतर तोच बेड व मल्चिंग पेपरवर कारली व दोडका (निम्मे निम्मे क्षेत्र) यांची लागवड होते. दोन्ही पिकांची तोडणी अन्य पिकांच्या तुलनेत सुकर असते. बाजारात मागणीही चांगली असते.

त्यामुळे ही पिके सोयीची असतात असे धस सांगतात. दोन्ही पिकांचे मिळून १० टनांच्या पुढे उत्पादन मिळते. कोल्हापूर व कराड या जवळच्या गावांमध्ये चांगली बाजारपेठ असल्याचा फायदा मिळतो. किलोला १५ रुपयांपासून ते ३०, ३५ व काही वेळा ४५ रुपयांपर्यंतही दर मिळतो.

कोबी : ही पिके निघाल्यानंतर त्या ‘बेड’वर ऑगस्टमध्ये कोबी लावण्यात येतो. मल्चिंग पेपर आधीचाच असतो. फक्त अंतरानुसार नवी छिद्रे तयार केला जातात. गड्डा जास्त मोठा होऊ नये याची काळजी घेतली जाते.

धस सांगतात, की हा कोबी तसा बिगरहंगामी असतो. पावसाळ्यात त्याचे व्यवस्थापन करणे ही कसरत असते. कारण किडी-रोगांचा प्रादुर्भाव सुरू असतो.

दररोज बारकाईने निरीक्षण व काळजी घ्यावी लागते. परिणामी, बाजारात या हंगामात किलोला १५ रुपयांपर्यंत दर मिळतो. चारही पिकांचा विचार करता वर्षाला काही लाख रुपयांचा नफा हाती येतो.

हंगामी झेंडू व बांधावरील आंबा

दसरा- दिवाळीसाठी झेंडूची लागवड होते. परिसरातील हंगामी व्यापाऱ्यांना ही फुले उपलब्ध होतात. जागेवरच उत्पन्न मिळते. बांधावर हापूस आंब्याची झाडे लावली आहेत. पाहुणे-रावळ्यांना फळे देऊन विक्रीतून आधारयुक्त उत्पन्न हाती पडते.

विकसित झाले बागवानी शेती पद्धती

लोकांच्या टिकेला न जुमानता धस यांनी जिद्दीने माळरानाचे नंदनवन करण्यास सुरुवात केली. ‘जेसीबी’ यंत्राद्वारे खोदाई, सपाटीकरण केले. दगड- धोंडे वेचून माळरान पिकाऊ बनवले. हंगामी तसेच झेंडू, वांगी अशी पिके घेऊ लागले. जुनी विहीर होती. त्याचा गाळ काढून ते पाणी वापरू लागले.

पुढे २०१३ मध्ये या भागाला पाणी योजनेचा लाभ झाला. मग ऊस शेती करू लागले. परंतु भाजीपाला शेतीची आवड कायम होती. त्यातूनच बाजारात कोणत्या प्रकारचा भाजीपाला कोणत्या हंगामात चालतो, दर कसे राहतात याचा अभ्यास केला.

त्यातूनच दीड एकरांत एका वर्षात चार पिके घेण्याची पद्धत सुरू केली. चोख व्यवस्थापन व सातत्य यातून ती आज यशस्वी झाली आहे.

ठळक बाबी

जमीन माळरानाची व निचरा होणारी. पूर्वी खडकाळ व नापिक होती. मात्र परिश्रमातून ती विकसित केली.

बाहेरून रोपे खरेदी करण्यापेक्षा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी रोपवाटिकेद्वारे स्वतः रोपे तयार करतात. त्याचे तंत्र आत्मसात केले आहे.

रासायनिक- सेंद्रिय असे संतुलित पद्धतीने व्यवस्थापन. जिवामृत, दशपर्णी अर्कनिर्मिती, कामगंध व चिकट सापळे यांचा वापर.

धस यांच्या दोन मुलांपैकी वैभव स्थापत्य शाखेतील पदवीधर. तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. तर सागर बीकॉम. दोघांचीही वडिलांना मदत. पत्नी सौ शोभा यांचीही साथ तेवढीच महत्त्वाचा आहे.

आनंदराव धस ९०९६९९४३९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Season : खरिपासाठी ‘महाबीज’चे साडेतीन लाख क्विंटल बियाणे

Onion Rate : आळेफाटा बाजारात कांद्याचा दर २१० रुपये प्रतिदहा किलो

Online Satbara : ‘सर्व्हर डाउन’मुळे सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना मनस्ताप

Seed Policy : बियाणे कंपन्यांच्या धोरणामुळे कृषी व्यावसायिक त्रस्त

Leopard Terror : आठ दिवसांत सहा बिबटे जेरबंद

SCROLL FOR NEXT