Horticulture : फलोत्पादनासह जपला एकात्मिक शेतीचा पॅटर्न

सुकळी जहागीर (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथे सहा भावांच्या सामूहिक बळावर ७० एकर शेतीचे व्यवस्थापन करण्यावर वानखेडे कुटुंबीयांनी भर दिला आहे. ३८ जणांच्या या कुटुंबातील १२ जणांकडे दररोज शेती व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. परिणामी, मजुरांवरील अवलंबिता आणि खर्च नियंत्रणात आला. शेती उत्पन्नातील ५० टक्‍के रक्‍कम दरवर्षी दीर्घ मुदतीसाठी गुंतवली जाते. हंगामी पिकांच्या बरोबरीने फळबाग, रेशीम शेती, पशुपालनाची जोड असा एकात्मिक शेतीचा पॅटर्न वानखेडे कुटुंबाने राबविला आहे.
Horticulture
HorticultureAgrowon

गेल्या ३० वर्षांपासून सुकळी जहागीर (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील वानखेडे कुटुंबाने शेती आणि पूरक उद्योगाला वेगळी दिशा दिली आहे. सहा भावांच्या या कुटुंबाने हंगामी पिके, चिकू, आंबा फळबागेतून (Mango Orchard) त्यांनी शेतीमध्ये प्रगती साधली आहे. कोणत्याही पीककर्जाची (Crop Loan) उचल न करता शेतीचे व्यवस्थापनावर या कुटुंबीयाने भर दिला आहे. शेतीमालाची विक्री जिल्ह्यांतर्गत बाजारपेठेत होते. बाजारपेठेत दर पाहून विक्रीबाबतचा निर्णय घेतला जातो. हिंगोली, वसमत या भागात हळदीचे विक्री केली जाते.

सोयाबीन विक्री मानोरा (वाशीम), हदगाव (नांदेड) तर हरभरादेखील याच पॅटर्ननुसार दर असलेल्या बाजारपेठेत विकण्यात येतो. कुटुंबातील व्यक्‍ती शेतीमाल विक्रीसाठी जातो. विक्रीनंतर वर्षाचे उत्पन्न हाती आल्यानंतर त्यातील ५० टक्‍के रक्‍कम मुदत ठेवमध्ये गुंतवली जाते. उर्वरित ५० टक्‍के रकमेतून वार्षिक खर्चाचे नियोजन करायचे. या पॅटर्ननुसार आतापर्यंत सुमारे ३० वेळा रक्‍कम एफडी (फिक्‍स्ड डिपॉझिट) ठेवण्यात आली. त्यावरील व्याज मिळाले आणि काही वेळा एफडी मोडून त्यातील रकमेचा विनियोग शेती खरेदीसाठी करण्यात आला. त्यामुळे सुरुवातीला केवळ ३० एकर वडिलोपार्जित असलेले शेती क्षेत्र ७० एकरांवर पोहोचले आहे. या पैशाचा उपयोग वाहन तसेच इतर संसाधनाच्या खरेदीसाठी केला जातो. त्यामुळेच गेल्या ३० वर्षांत एकदाही कर्ज काढण्याची गरजच भासली नाही, असे अशोक वानखेडे सांगतात.

Horticulture
Horticulture Management : शास्त्रोक्त व्यवस्थापनातून फळगळ आणली नियंत्रणात

चिकू, आंबा फळबाग

वानखेडे कुटुंबाने १९९० मध्ये एक एकरावर रोजगार हमी योजनेतून १०० टक्‍के अनुदानावर ३० फूट बाय ३० फूट अंतरावर चिकू कलमांची लागवड केली आहे. लागवडीसाठी त्यांनी क्रिकेट बॉल आणि कालीपत्ती या जातींची निवड केली. लागवडीनंतर सहाव्या वर्षीपासून फळे मिळण्यास सुरुवात झाली. दहाव्या वर्षीपासून व्यावसायिकदृष्ट्या फळांचे चांगले उत्पादन सुरू झाले. सुरुवातीची तीन वर्ष कलमे लहान असल्याने सोयाबीनचे आंतरपीक घेण्यात आले. कलमे उंच असल्यास पाऊस, वादळी वाऱ्यामुळे फळांचे नुकसान होण्यासोबतच कोलमडण्याची भीती राहते.

Horticulture
Horticulture Scheme : जुन्या फळबाग पुनरुज्जीवनासाठी योजना

त्यामुळे कलमांची उंची वाढविण्याऐवजी कॅनॉपी विस्तारावर भर दिला आहे. त्याकरिता सुरुवातीच्या काळात कलमांची शिफारशीनुसार छाटणी केली आहे. पहिला बहर सप्टेंबर महिन्यात फुलधारणा होत मार्च महिन्यात फळ तोडणीस येतो. दुसरा बहर एप्रिल महिन्यात फुलधारणा होते आणि ऑक्‍टोबर महिन्यात फळ तोडणीस येतात. शिफारशीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खतांच्या वापरावर त्यांचा भर आहे. सध्या एका बहरात ५० कलमांपासून ३० ते ३२ क्‍विंटल फळांचे उत्पादन मिळते. बागेमध्येच व्यापाऱ्यांना चिकू विक्री केली जाते. सरासरी १८०० ते १९०० रुपये क्‍विंटलप्रमाणे दर मिळतो, असे वानखेडे सांगतात.

एक हेक्‍टर क्षेत्रावर १९९४ मध्ये वानखेडे कुटुंबाने दशहरी, रत्ना, केसर, सिंधू या आंबा कलमांची लागवड केली. या कलमांना देखील शिफारशीनुसार रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा योग्य प्रमाणात वापर केला जातो. सध्या या बागेतून ७० क्‍विंटल फळांचे उत्पादन मिळते. बाजारपेठेतील दर लक्षात घेऊन बागेमध्ये व्यापाऱ्यांना आंब्याची विक्री होते. बाजारपेठेच्या ४० टक्‍के दरानुसार फळांची विक्री होते. गावरान आंबा जातींची त्यांनी लागवड केली आहे.

एकात्मिक पीक पद्धतीचा पॅटर्न

फळ पिकांच्या जोडीला उपलब्ध क्षेत्रानुसार विविध हंगामी पिकांच्या लागवडीवर वानखेडे कुटुंबीयांचा भर आहे. दरवर्षी २९ एकरांवर सोयाबीन लागवड असते. एकरी ८ ते ९ क्‍विंटल उत्पादन मिळते. दरवर्षी चार एकरांवर हळद लागवड असते. एकरी २६ ते २७ क्‍विंटल वाळविलेल्या हळदीचा उतारा मिळतो. सहा एकरांवर ऊस लागवड असते. एकरी ६० ते ६५ टन उत्पादन मिळते. ज्वारी, गहू, तूर, उडीद, मूग, उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल, जवस, कांदा, लसूण या पिकांची लागवड केली जाते. योग्य नियोजनातून वानखेडे यांनी एकात्मिक पिकांचा पॅटर्न त्यांनी रुजविला आहे.

पूरक उद्योगांची जोड

वानखेडे यांच्याकडे सहा जर्सी गाई असून, दररोज ४५ लिटर दूध संकलन होते. यातील पाच लिटर दूध घरच्यापुरते ठेवून उर्वरित दुधाची विक्री होते. गाईच्या दुधाला सरासरी ३७ ते ४० रुपयांचा दर मिळतो. खासगी कंपनीला दुधाची विक्री केली जाते. वानखेडे यांनी चार वर्षांपूर्वी एक एकरावर तुती लागवड केली. वर्षभरात रेशीम कीटकांच्या तीन बॅच होतात. एका बॅचच्या माध्यमातून दीड क्‍विंटल कोष उत्पादन होते. जालना बाजारपेठेत कोषांची विक्री केली जाते. गेल्या वर्षी त्यांना प्रति क्विंटल ६० हजार रुपये दर मिळाला होता.

सामूहिक कुटुंबाद्वारे व्यवस्थापन

सहा जणांचे वानखेडे कुटुंब आहे. या सर्व बंधूंनी शेती व्यवस्थापनात आपापली जबाबदारी सांभाळली आहे. भावांमध्ये शेती व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार, पूरक उद्योग आणि शेतीमाल विक्री अशी जबाबदारीची वाटणी झालेली आहे. वानखेडे यांच्या कुटुंबात ३८ जण सदस्य आहे. आजही एकाच चुलीवर स्वयंपाक होतो. त्यामुळे खर्चही वाचतो. शेती मशागतीसाठी दोन ट्रॅक्‍टर आहेत. शेतीमध्ये दररोज कुटुंबातील १२ सदस्य राबतात. त्यामुळे मजुरांची फारशी गरजच भासत नाही. परिणामी, मजुरांवर होणारा मोठा खर्च वाचविण्यात ते यशस्वी झाले आहेत.

अशोक वानखेडे ९४०३४९३१००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com