Pasaydan Farmer Producer Company Agrowon
यशोगाथा

Crop Seed Production : मक्तापूरच्या ‘पसायदान’ची बीजोत्पादनात भरारी

Agriculture Success Story : मक्तापूर (ता. नेवासा) येथील शेतकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘पसायदान’ शेतकरी उत्पादक कंपनीने पीक बीजोत्पादनात भरारी घेतली आहे. या भागात मागणी असलेल्या सोयाबीन, हरभरा, कांदा पिकांचे कंपनीचे सभासद शेतकरी बीजोत्पादन घेतात

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Pasaydan Farmer Producer Company : नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील ज्येष्ठ नेते व प्रगतिशील शेतकरी रावसाहेब कांगुणे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘पसायदान’ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना केली. कंपनीमध्ये भाऊसाहेब कांगुणे, दत्तात्रय कांगुणे, अमोल कासुळे, अनिकेत कांगुणे, सौरभ कांगुणे, सुषमा कासुळे, शारदा कांगुणे, नीता कांगुणे, आशा कांगुणे हे संचालक असून कानिफनाथ कुटे हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

मक्तापूर, पिचडगाव, मसले, खुपटी, टाकळीभान, खानापूर, जळके, मुकिंदपूर, भानसहिवरा, हंडी निमगाव आदी भागात सोयाबीन, हरभरा, गहू, मका, कांदा आदी पिके घेतली जातात. पेरणीच्या काळात सातत्याने बियाण्यांचा तुटवडा भासतो. हे ओळखून बीजोत्पादन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुरुवातीला प्रत्येक संचालकांनी प्रत्येकी एक लाखाची गुंतवणूक करून खेळते भांडवल उभे केले आणि बीजोत्पादन सुरू केले. सुरुवातीला शंभरावर सभासद होते, आता बीजोत्पादनाच्या माध्यमातून सातशेपेक्षा अधिक शेतकरी जोडले गेले आहेत.

सहाशे एकरांवर बीजोत्पादन

पसायदान शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकरी जोडण्याचे काम सुरू असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या बियाण्यांपासून शेतकरी बियाणे तयार करतात. जिल्हा बीज प्रमाणीकरण विभागाकडून बियाणे प्रमाणित करून त्याची मागणीनुसार विक्री केली जाते.

मक्तापूर आणि आठ ते दहा गावांतील सभासदांसह अन्य मिळून सुमारे सातशेपेक्षा अधिक शेतकरी बीजोत्पादन करत आहेत. पहिल्या वर्षी साधारण अडीचशे एकरावर गहू, सोयाबीन, कांदा, हरभऱ्याचे बीजोत्पादन घेतले. यातून पहिल्या वर्षी साधारण अडीच कोटींची उलाढाल झाली. गव्हाचे ३०० एकरांवर, सोयाबीनचे ५० एकरांवर, हभऱ्याचे १०० एकरांवर, तुरीचे १०० एकरांवर बीजोत्पादन घेतले.

मूग, उडीद, मक्याच्या बियाण्यांचेही बीजोत्पादन घेतले आहे. बीजोत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहेच, शिवाय कंपनीची उलाढालही दुसऱ्या वर्षी ५ कोटींपेक्षा अधिकची झाली.

कांगुणे यांच्या शेतीतील प्रयोग

‘पसायदान’ शेतकरी उत्पादक कंपनीचे संस्थापक रावसाहेब कांगुणे पंचायत समितीचे माजी सभापती आणि प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांचे तीन भावांचे एकत्रित कुटुंब असून वडिलोपार्जित १०० एकर शेती आहे.

ऊस पिकाला ते आधी प्राधान्य द्यायचे, मात्र सध्या त्यांनी उसाचे क्षेत्र कमी केले आहे. शेतकरी कंपनी सुरू केल्यानंतर बीजोत्पादनास सुरुवात केल्यापासून त्यांनी स्वतः साधारण पन्नास एकरांवर सोयाबीन, तूर, गहू यांसारखी पिके आणि बीजोत्पादन घेत आहेत.

बीजोत्पादन घेताना वेगवेगळे प्रयोग करत उत्पादन वाढीसाठी त्यांचा प्रयत्न असतो. गेल्या वर्षी ठिबक सिंचन व लागवड पद्धतीत बदल करत, साडेचार फुटी सरीवर बीजोत्पादनासाठी कांदा लागवड केली. साधारण पाच एकरांतून १६०० किलो कांदा बियाणे उत्पादित केले.

तुरीची सहा फुटांवर, सोयाबीनची अठरा इंचांवर लागवड करत एकरी १६ क्विंटल उत्पादन घेतले. कंपनीचे सभासद भेंडा येथील संभाजी तागड यांनी यंदा तुरीचा सलग तिसरा खोडवा पीक घेतले आहे.

रावसाहेब कांगुणे यांच्या प्रयत्नांतून कंपनीतील १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी बीजोत्पादन करताना लागवड पद्धतीत बदल करत सरी पद्धत, टोकण पद्धत, दोन ओळींतील अंतरात बदल अशा प्रयोगातून उत्पादनात १० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

साठवणुकीसाठी गोदाम

‘पसायदान’ कंपनीने बीजोत्पादनाला प्राधान्य देताना उत्पादित बियाण्यांची अधिक काळजी घेण्यावर भर दिला आहे. बियाणे खरेदीनंतर सुरक्षित साठवणुकीसाठी सुमारे ४५ लाख रुपये खर्च करून ४५० टन साठवण क्षमतेचे गोदाम बांधले आहे. त्यासाठी बॅंकेकडून कर्ज ७० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले आहे. शिवाय कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून अनुदान मिळाले आहे. सध्या कंपनीकडे हरभरा व अन्य सुमारे २०० क्विंटलपेक्षा अधिक प्रमाणीकरण केलेले बियाणे उपलब्ध आहे.

रोजगाराची उपलब्धता

यंदा ४५० हेक्टर क्षेत्रावर खरिपात सोयाबीन, मका, तुरीसह अन्य पिकांचे बीजोत्पादन केले जात आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले बियाणे पॅकिंग व अन्य कामे वर्षभर सुरू असतात. या कामांसाठी दररोज १२ ते १५ मजुरांना कंपनीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. गरजेच्या वेळी अधिक मजूर घेतले जातात.

पसायदानची वैशिष्ट्ये

खरीप, रब्बीत शेतकऱ्यांना वेळेत आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न.

पेरणीनंतर बियाणे प्रमाणीकरण नियमानुसार सातत्याने पाहणी, मार्गदर्शन. त्यामुळे दर्जेदार बियाणे उपलब्ध, उत्पादनात वाढ.

बांधावर खरेदी करताना गरजवंत शेतकऱ्यांच्या बांधावर तातडीने खरेदी करून थेट बॅंक खात्यावर पैसे जमा.

सभासदांना गरजेनुसार वेळोवेळी आवश्यक मदत.

बीजोत्पादन करताना सोयाबीनचे एकरी १० ते १२ क्विंटल, हरभऱ्याचे एकरी १४ क्विंटलपर्यंत, तुरीचे एकरी १२ ते १३ क्विंटलपर्यंत अधिक उत्पादन.

अधिक बीजोत्पादन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा विशेष सत्कार.

विक्रीसाठी बियाणे पाकिटे पॅकिंग करताना ते स्वच्छ करण्यासाठी

बीजोत्पादन केलेले बियाणे स्वच्छ करण्यापासून पॅकिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची उभारणी.

पीक प्रात्यक्षिक व अन्य बाबींच्या मार्गदर्शनासाठी सातत्याने कार्यशाळेचे आयोजन.

अत्याधुनिक यंत्रणेची उभारणी

शेतकऱ्यांकडून बीजोत्पादन केलेले बियाणे खरेदी केल्यावर पॅकिंग, ग्रेडिंगसह अन्य कामांसाठी कंपनीने ग्रेडर, मॅग्नेटिक स्टोनर, ग्रॅव्हिटी स्टोअरेज टॅंक, पॅकिंग मशीन, दोन वजनकाटे यासह अन्य स्वयंचलित अत्याधुनिक यंत्रणा उभारलेली आहे. त्यासाठी सरकारी अनुदानासह सुमारे एक कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. बियाण्यांतील काडीकचरा, माती व अन्य स्वच्छतेच्या कामांसह थेट पॅकिंगपर्यंत यंत्रणा स्वयंचलित काम करते. कृषी विभागाच्या मदतीने बीजप्रक्रिया संचही कंपनीने बसविला आहे. त्या माध्यमातून बीजप्रक्रिया करूनच बियाणाची विक्री केली जाते. त्यामुळे बियाण्यांची उगवणक्षमतेत पाच टक्क्यांपर्यंत अधिक वाढ होत असल्याचे कंपनीद्वारे सांगण्यात आले.

बांधावर खरेदी; दहा टक्के अधिक रक्कम

शेतकऱ्यांनी बियाणे प्रमाणीकरणाच्या नियमानुसार उत्पादित केलेले धान्य (बियाणे) ‘पसायदान’कडून बाजार दरापेक्षा दहा टक्के अधिक दराने खरेदी केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटलमागे अधिक आर्थिक फायदा होतो.

थेट बांधावरून खरेदीवर भर दिला जातो. त्यामुळे वाहतूक, हमाली व अन्य खर्चात बचत होते.

बीजोत्पादनातून वर्षाला सुमारे सातशेच्या आसपास शेतकऱ्यांच्या बीजोत्पादनातून सुमारे तीस ते चाळीस लाखांपेक्षा अधिक रकमेचा फायदा होत आहे. गेल्या वर्षी सुमारे २० एकरांमधून पाच टन कांदा बियाणे उत्पादन घेतले. त्याची ५०० रुपये किलोनुसार शेतकऱ्यांकडून खरेदी केली.

- रावसाहेब कांगुणे ९८५०२१८९८५,

- भाऊसाहेब कांगुणे ९८५०३३६९०१,

- कानिफनाथ कुटे ८७६६८०४०५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT