Agriculture Success Story : मिश्रपीक, दुग्धव्यवसायातून मिनाक्षीताईंची यशाला गवसणी

Sugarcane Farming and Dairy Business : कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे (ता. करवीर) येथील सौ. मिनाक्षी अजित नेंदुर्गे या अल्पभूधारक शेतकरी. त्यांनी ऊसासह मिश्र आंतरपिके घेत शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे.
Minakshi Ajit Nendurge and Farm
Minakshi Ajit Nendurge and FarmAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : सांगवडे (ता. करवीर) हे नृसिंह देवस्थानासाठी प्रसिद्ध गाव. या गावात सौ. मिनाक्षी अजित नेंदुर्गे राहतात. शेती कामात खमक्‍या असणाऱ्या मिनाक्षीताईंनी साडेतीन एकर क्षेत्रामध्ये पती अजित यांच्या सहकार्याने बहुपीक पद्धतीतून शेती फुलविली आहे. केवळ एकाच पिकाचे उत्पादन न घेता, टप्प्याटप्प्याने ऊस, सोयाबीनसह कडधान्ये उत्पादन घेण्यावर त्यांचा भर असतो. पतीच्या खांद्याला खांदा लावून दिवसभर शेतीकामांमध्ये राबत शेतीतील बारकावे त्यांनी समजावून घेतले आहेत. त्यामुळेच शेतीतले वैविध्य टिकवून आहेत.

१९९८ मध्ये मिनाक्षीताईंचा विवाह झाला. त्यावेळी शेतामध्ये भात, ज्वारी, भुईमुग, गहू, ऊस या पिकांची लागवड होती. मात्र योग्य नियोजनाअभावी चांगले उत्पन्न मिळत नव्हते. याच दरम्यान शेती परवडत नसल्याने पशुपालन करण्याचे ठरविले. त्यासाठी कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून चारा व्यवस्थापन व वासरु संगोपनाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली. सोबतच पीक पद्धतीत बदल करत नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यास सुरुवात केली.

कल्पकतेने सोयाबीन लागवड

ऊस लागवडीपूर्वी सोयाबीन, भुईमूग व कडधान्यांची लागवड केली जाते. सोयाबीन लागवड ही केवळ विक्रीसाठी केली जात असली, तरी शेंग व कडधान्य यांचे प्रामुख्‍याने घरगुती वापरासाठी उत्पादन घेतले जाते. साधारणतः अकरा सरी सोयाबीन, दोन सरी कडधान्य या पद्धतीने लागवडीचे नियोजन केले जाते. ही सर्व पिके उसाच्या मोठ्या भरणीपर्यंत निघतात.

आतापर्यंत सोयाबीनचे एकरी १६ क्विंटल, तर भुईमुगाचे एकरी दोन क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे. याशिवाय मूग व उडीद ही कडधान्‍ये पिके देखील घेतली जातात. उसाचे उत्पादन एकरी पन्नास टनांपर्यंत उत्पादन मिळते. अगदी एक-दोन सरीमध्‍येही कडधान्य पिके घेतली जातात. घरगुती वापरासाठी कडधान्ये शेतातच पिकवण्यावर अधिक भर दिल्यामुळे त्यावरील अतिरिक्त घरगुती खर्च कमी झाला आहे. याचा मोठा आधार संसाराला मिळत असल्याचे मिनाक्षीताई सांगतात.

खपली गहू, हरभऱ्यातून उत्‍पादनवाढ

आडसाली ऊस तुटल्‍यानंतर शेत रब्बीसाठी तयार केले जाते. यामध्ये खपली गहू, हरभरा लागवड केली जाते.

साधारणतः मार्च-एप्रिलपर्यंत रब्बीची काढणी पूर्ण होते. त्यानंतर मे महिन्‍यापर्यंत शेत उन्हामध्ये तापू दिले जाते. मे महिन्याच्या शेवटी एकरी सहा ट्रॉली शेणखत मिसळून नंतर सऱ्या सोडून शेत पुन्हा ऊस लागवडीसाठी तयार केले जाते.

Minakshi Ajit Nendurge and Farm
Sugarcane Farming : आडसाली उसासाठी ठिबकद्वारे अन्नद्रव्यांचा वापर

शेती निर्णयात महत्त्वाची भूमिका

शेतामध्ये हंगामनिहाय कोणती पीक पद्धती घ्यायची याविषयी मिनाक्षीताई पती अजित यांच्यासोबत कायम चर्चा करतात. पाऊस, हवामान, बाजारातील स्‍थिती यानुसार पिकांची निवड केली जाते. काही वेळा कोणते पीक घ्यायचे यावरुन नेंदुर्गे दांम्पत्‍यांत मतभेद होतात. पण प्रत्येक पीक घेण्याच्या निर्णयात मिनाक्षीताई आग्रही असतात. शेतीत वैविध्यता जपणाऱ्या मिनाक्षीताईंनी इंद्रायणीसारख्या भाताचा प्रयोग केला आहे.

घरगुती वापरापुरती भात लागवड न करता त्याची विक्रीही केली. तांदूळ महोत्सवात स्वतः ६० रुपये किलो दराने तांदूळ विक्री केली. गेल्या वर्षी काकडी लागवडीतून सुमारे १३ टन उत्पादन घेत दोन लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. याशिवाय त्‍यांच्याकडे पाच एचएफ गाई आहेत. गाईंच्या संगोपनातून दररोज २२ ते २५ लिटर दूध उत्पादन मिळते. याची स्थानिक दूध संस्‍थेला विक्री होते. दूध उत्पन्नातून सर्व घरखर्च चालतो.

Minakshi Ajit Nendurge and Farm
Dairy Business : पुन्हा जागविली नवी उमेद

कृषी विभागाशी संपर्कात

मिनाक्षीताई शेती क्षेत्रातील अनेक संस्था, तज्‍ज्ञ तसेच कृषी विभागासोबत सातत्‍याने संपर्कात असतात. कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक गीता कांबळे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सॅम लुद्रीक यांच्यासह विविध अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच शेतीमध्ये आमुलाग्र बदल केले आहेत. तसेच विविध प्रगतीशील शेतकऱ्यांसोबत सातत्‍याने संवाद असतो.

शेतीकामांमध्ये अग्रेसर

मिनाक्षीताई स्वतः शेतीमध्ये राबतात. सकाळी लवकर घरातील सर्व कामे आवरून त्या शेतावर जाण्याला प्राधान्य देतात. घरकाम, जनावरे व शेतकामे असे सूत्र त्‍यांनी ठेवले आहे. सर्व कामांची विभागणी करून दैनंदिन नियोजन त्यांनी केले आहे. पती अजित यांच्यासह ऋषभ आणि वर्धमान या दोन्ही मुलांची मोलाची साथ त्यांना मिळते. ऋषभ हा इलेक्ट्रीशियन, तर वर्धमान हा पशुवैद्यकीय व्यवसायात आहे. या सर्वांचे शेतीकामांच्या नियोजनामध्ये चांगले सहकार्य मिळाले आहे, असे मिनाक्षीताई सांगतात.

मिश्रपीक पद्धतीवर भर

मिनाक्षी नेंदुर्गे यांनी साडेतीन एकर शेतीचे दोन भाग केले आहेत. आडसाली ऊस लागवडीमध्ये सोयाबीनचे आंतरपीक असते. सोयाबीनबरोबर भुईमूग व कडधान्ये लागवडही केली जाते. मे महिन्यात ऊस घेण्याच्या उद्देशाने चार फुटी सरी सोडतात. पंधरा जून दरम्यान एकसरीआड सोयाबीन आणि भुईमुगाची टोकण केली जाते. ऑगस्टमध्ये आडसाली लावण केली जाते. कांडी पेक्षा रोप लावणीला प्राधान्य दिले जाते. एकरी सहा ते सात हजार रोपे लावली जातात.

रोपांच्या वाढीनुसार रासायनिक खतांचे नियोजन केले जाते. उसाची लागवड होईपर्यत सोयाबीन फुलकळीत येते. सोयाबीनवर निंबोळी अर्काची फवारणी केली जाते. सोयाबीनची काढणी होईपर्यंत ऊस दोन फुटांपर्यंत वाढतो. सोयाबीनची काढणीनंतर उसाला मोठी भरणी केली जाते. त्यावेळी रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. ठिबक सिंचन व पाटपाणी या दोन्ही पद्घतीने सिंचन केले जाते. पुढे ऊस तुटेपर्यंत फारसी मशागत केली जात नाही.

मिनाक्षी नेंदुर्गे, ९११२३१७१७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com