Parbhani Animal Market Agrowon
यशोगाथा

Animal Market : जातिवंत जनावरांसाठी प्रसिद्ध परभणीचा बाजार

Article by Manik Rasve : परभणी येथील खंडोबा बाजार मैदानावर दर गुरुवारी भरणारा जनावरांचा बाजार जातिवंत बैल, म्हशी शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. लाल कंधारी, देवणी गायी, मुऱ्हा, जाफराबादी म्हशी यांच्यासह अन्य जनावरांनाही येथे मोठी मागणी असते.

माणिक रासवे

माणिक रासवे

Animal Market Parbhani : परभणी शहरात महानगरपालिकेच्या अखत्यारित ८ ते १० एकर क्षेत्रात खंडोबा बाजार मैदानावर भरणारा जनावरांचा बाजार जिल्ह्यातील प्रमुख व मोठा आहे. पूर्वी तो मनमाड सिकंदराबाद रेल्वे मार्गावरील पिंगळी बाजार (ता.परभणी) येथे भरायचा.

परंतु तत्कालीन खासदार (कै.)शेषरावजी (भाऊ) देशमुख यांच्या पुढाकारातून ५० वर्षांपूर्वी तो सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित झाला. दर गुरुवारी भरणाऱ्या या बाजारात बुधवारी रात्रीपासून जनावरे दाखल होतात. शेळ्या-मेंढ्यांचा बाजार गुरुवारी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत तर बैलबाजार सायंकाळी वाजेपर्यंत असतो.

लाल कंधारी बैलजोड्यांना मागणी

शेतातील ओढ कामे, दुग्धोत्पादन तसेच जिल्ह्यातील वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता या बाबींमुळे लाल कंधारी या देशी गोवंशाच्या बैलजोडयांना शेतकऱ्यांकडून मागणी आहे. परभणी व गंगाखेड तालुक्यातील गावे तसेच शेजारील लोहा तालुक्यातील (जि. नांदेड) पशुपालक या जातीचे संगोपन प्रामुख्याने करतात.

परभणी तालुक्यातील माळसोन्ना या गावाची लाल कंधारी गोवंशाचे संवर्धन करणारे गाव म्हणून ओळख आहे. लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध हळी हंडरगुळली बाजारातून देवणी जातीचे बैल, गायी तर पंढरपूर, आटपाडी भागातून खिलार बैलजोड्या विक्रीस येतात.

...असे आहेत दर (रुपये)

लाल कंधारी बैलजोडी - सव्वा लाखापासून ते पावणेदोन लाख.

देवणी बैलजोडी - एक लाख ते दीड लाख.

खिलार बैलजोडी - ७० हजार रुपये ते ८५ हजार.

मागील दोन वर्षांपासून काही प्रमाणात धुळे येथून गीर गायी या ठिकाणी येतात. त्यांचे दर ६० हजार रुपयांपासून पुढे आहेत.

आठवडाभर म्हशींचे व्यवहार

सातत्याने दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. परभणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये या व्यवसायाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे म्हशींना व त्यातही मुऱ्हा, जाफराबादी या दुग्धोत्पादनात सरस असलेल्या म्हशींना मोठी मागणी आहे. गावरान, मराठवाडी म्हशींनाही काही प्रमाणात मागणी असते. जनावरांचा बाजार गुरुवारी भरत असला तरी स्थानिक व्यापाऱ्यांनी बाजार मैदानावर म्हशींसाठी निवारे उभारले आहेत.

त्यामुळे आठवडाभर म्हशींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. गाभण तसेच भाकड (पालट्या) म्हशींनाही मागणी राहते. जाफराबादी म्हशी गुजरात राज्यातून तर मुऱ्हा म्हशी धुळे, घोडेगाव, हिरापूर येथून विक्रीसाठी येतात. सध्या मुऱ्हा म्हशीचे दर ८० हजार रुपये ते एक लाख २० हजार रुपयांपर्यंत, तर जाफराबादी म्हशींचे दर एक लाख रुपये ते दोन लाख रुपयांपर्यंत आहेत.

शेळ्यांचा बाजार

बाजारात उस्मानाबादी, गावरान शेळ्या, मेंढ्यांची आवक होते. स्थानिक शेळीपालक येथे विक्रीसाठी येतात. तर मुंबई, पुणे, सातारा, सांगली, पंढरपूर, गोवा आदी ठिकाणांहून पशुपालक, व्यापारी खरेदीसाठी येतात. शेळी-बोकडांच्या पाच हजारांपासून २५ हजारांपर्यंत तर मेंढ्यांच्या सहा हजार रुपयांपर्यंत किमती आहेत, असे व्यापारी मो. शाकेर यांनी सांगितले.

मिळणाऱ्या सुविधा

महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठ्यासाठी विहीर व जनावरांसाठी पाण्याचा हौद आहे.

सन १९७६ मध्ये जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे बाजाराच्या ठिकाणी कृत्रिम रेतन केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते. सध्या केंद्राच्या इमारतीत महापालिकेचे पशुवैद्यकीय केंद्र आहे.

बाजार मैदानाचे वातावरण स्वच्छ ठेवण्यात येते.

शेणाच्या विक्रीतून महापालिकेस उत्पन्न मिळते.

व्यापाऱ्यांकडून बैल, गायी, म्हशी यांच्यासाठी जमानत दाखल्यासाठी १०० रुपये. बिगर जमानत दाखल्यासाठी ५० रुपये शुल्क आकारणी.

वर्षाकाठी साडेचार ते पाच हजार दाखले तयार केले जातात. त्यातून सात लाखांपर्यंत शुल्क जमा होते.

शेळ्यांसाठी पाच रुपये शुल्क.

अनुभव

म्हशींचे व्यापारी संजय रायमले म्हणाले, की आमचा पिढीजात म्हशीचा व्यापार आहे. बाजार मैदानात निवारा उभारला आहे. दररोज सुमारे दोन ते तीन म्हशीची विक्री होते. बाजाराच्या दिवशी ती जास्त होते. येथे खात्रीची, जातिवंत जनावरे मिळतात. गाभण तसेच जाफराबादी म्हशींना अधिक मागणी असते. उन्हाळ्यात मागणी कमी राहते. सध्या आठवड्याला १०० ते १५० म्हशींची आवक आहे.

मिरखेल (ता. परभणी) येथील अनिल देशमुख म्हणाले, की आमचा पूर्वापार बैलांचा व्यापार आहे. लोहा, जांब-जळकोट येथील बाजारातून लाल कंधारी बैलांची खरेदी करतो. परभणी, गंगाखेड, पाथरी येथील बाजारात विक्री करतो. गुढी पाडव्यापासून बैलजोड्यांना मागणी वाढते. वर्षभरात सुमारे ५० बैलजोड्यांची विक्री होते. परिचयाच्या शेतकऱ्यांकडून किमतीपैकी ५ ते १० हजार रुपये रक्कम घेऊन विक्री होते. शेतीकामांसाठी जोडी चांगली निघाल्यास उर्वरित रक्कम २ ते ३ दिवसांत घेतली जाते. अन्यथा, ती बदलून दिली जाते.

संजय रामयले (म्हैस व्यापारी), ९८२२५०१४८६

अनिल देशमुख (बैलांचे व्यापारी), ९०९६२८७६७७

नशीरुद्दीन काझी (मालमत्ता व्यवस्थापक, महानगरपालिका, परभणी) ९४२२८७९८१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

Oilseed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर; सूर्यफूल पेरा रखडला

Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेमागील पायाभूत तंत्रज्ञान

Turmeric Quality: जानेफळ येथे हळद गुणवत्ता सुधार विषयावर प्रशिक्षण

Livestock Shed Management: आधुनिक तंत्रज्ञानातून गोठ्याचे स्मार्ट व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT