Dragon Fruit  Agrowon
यशोगाथा

Dragon Fruit Farming : अभ्यासातून ड्रॅगन फ्रूट पिकात शोधली संधी

गणेश कोरे

Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यातील बोरी बुद्रूक (ता. जुन्नर) येथील शेतकरी मच्छिंद्र चौधरी यांच्याकडे वडिलोपार्जित ६ एकर शेती आहे. त्यात प्रामुख्याने ऊस, भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाई. त्यांचा मुलगा ओंकार हा संगणक अभियंता आहे. कोरोना काळात सगळ्याच कंपन्यांनी घरून काम करण्याची परवानगी दिली. त्या काळात ते घरी आले.

शेतात राहून कार्यालयीन काम करताना शेतीतील कामांमध्ये वडिलांना शक्य तितकी मदत करत असत. इंटरनेटवर काम करताना त्यांना ड्रॅगन फ्रूटविषयी समजले. मग त्यांची लागवडीपासून काढणीपर्यंतची इत्थंभूत माहिती गोळा केली. २०२१ मध्ये सांगोला (जि. सोलापूर) येथील ड्रॅगन फ्रूट शेतीला भेट देऊन मिळालेल्या माहितीची खातरजमा करतानाच बाजारपेठही समजून घेतली.

अशी केली लागवड

सांगोला, इंदापूर येथील आणखीही काही ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट पाहिल्यानंतर विश्वास बसल्यावर ओंकार यांनी २०२१ मध्ये ‘पोल प्लेट सिस्टिम’ नुसार एक एकरवर ड्रॅगन फ्रूट लागवडीचा निर्णय घेतला. जमिनीची मशागत करून, १० बाय ६ फुटाचे बेड तयार केले. त्यात शेणखत, लिंबोळी पेंड, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे मिश्रण मिसळून घेतले. त्यावर ठिबक सिंचनाची सोय केली. आणि ५८० पोल उभारले. एका पोल भोवती चार रोपे यानुसार सुमारे २ हजार ३२० रोपांची लागवड केली.

पाणी, खत व्यवस्थापन

लागवडीनंतर साधारण १४ महिन्यांनी फळधारणा सुरू होते. दर ४ दिवसांनी एकदा ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. वाढीच्या अवस्थेत टप्प्याटप्प्याने जैविक खतांची आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची ठिबक सिंचनाद्वारे मात्रा दिली जाते. आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची आळवणी केली.

असे आहे बहर व्यवस्थापन

एका बहराचे ४५ दिवसांचे चक्र आहे. साधारण ७ बहरात उत्पादन मिळते. यामध्ये १५ मार्च दरम्यान झाडांचे पाणी पूर्ण बंद केले जाते. तर २५ मे रोजी साधारण मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळी येणाऱ्या ढगाळ वातावरणात पाणी पुन्हा सुरू केले जाते. या दिलेल्या ताणामुळे लवकर पालवी फुटून, उत्पादन वेगाने सुरू होते. दरम्यान किमान पाच वेळा हंगाम आणि वातावरणानुसार बुरशीनाशके आणि कीटकनाशकांची फवारणी केली जाते. तर सनबर्न पासून वाचविण्यासाठी सिलिकॉन भुकटीची फवारणी केली जाते.

असे मिळाले उत्पादन

पहिल्या हंगामात साधारण ३ टन उत्पादन मिळाले होते. दुसऱ्या वर्षी ५ टन उत्पादन मिळाले होते. या वर्षी साधारण ७ टन उत्पादन मिळाले आहे. एका झाडाला १५ ते १८ फळे लागत असून, एका फळांचे वजन ४५० ग्रॅम होते. त्याला सरासरी ९० रुपये दराने सहा लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये वार्षिक व्यवस्थापन खर्च, लागवड, खते, कीडनाशके, मजुरी आदि २ लाख रुपये होतो.

वजनानुसार असे मिळतात दर

फळाचे वजन (ग्रॅम) दर (रुपये प्रति किलो)

१०० ७० - ८०

२०० ९० - १००

३००-४०० १०० - ११०

५००-५०० १३० - १४०

७००-८०० १३० - १४०

एका फळाचे सरासरी वजन ३०० ग्रॅम आणि मिळणारा दर सरासरी ८० ते ९० रुपये प्रति किलो.

अतिघन पद्धतीने नवी लागवड

थोड्याशा साशंकतेने एक एकरमध्ये केलेल्या ड्रॅगनफ्रूट लागवडीतून सलग तीन वर्षात बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागल्याने ओंकार यांची आत्मविश्वास वाढला. मग आणखी एक एकरवर अतिघन पद्धतीने ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. या पद्धतीमध्ये पोल प्लेट पद्धत न वापरता ‘व्ही’ आकाराचा मांडव टाकला आहे. यात ५ हजार रोपे बसवली आहेत. त्यामुळे मागील एक एकरापेक्षा जास्त उत्पादन मिळेल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी त्यांनी सुमारे साडे पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

अशी आहे विक्री व्यवस्था

लागवडीपूर्वीच ओंकार यांनी बाजारपेठेचा अभ्यास सुरू केला होता. त्यात त्यांनी पुणे, मुंबई बाजार समितीसह वेगवेगळे मॉल आणि थेट खरेदीदारांसोबत चर्चा केली होती. यानुसार आता सुमारे ४० टक्के उत्पादन पुणे, मुंबई बाजार समितीमध्ये पाठवले जाते. त्याच प्रमाणे विविध मॉल्सचे प्रतिनिधी थेट बांधावरूनही खरेदी करत आहेत. या मॉल्सना ६० टक्के उत्पादन पाठविले जाते. यामुळे सर्व प्रकारच्या आकाराच्या आणि वजनाच्या फळांना मागणी राहते, असा ओंकार यांचा अनुभव आहे.

ओंकार चौधरी, ८६५५५४२५२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Soybean Market : सोयाबीनच्या ‘शेतीमाल तारण’ला ओलाव्याची अडचण

Crop loan Distribution : रब्बीसाठी पीक कर्जवितरण आढावा बैठकच नाही

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमले; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर?

Flood Damage Compensation : २०२० चा पीक विमा बीड जिल्ह्याला मिळालाच नाही; खंडपीठाचे राज्य शासनासह बीडचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT