Indian Agriculture : सातारा जिल्ह्यातील आसनगाव (ता. कोरेगाव) हे सुमारे ८०० लोकसंख्येचे गाव. दरवर्षी भर उन्हाळ्यात पाणी टंचाई असल्यामुळे टँकरवर विसंबून राहावे लागत होते. पाणीटंचाई कमी करण्यासाठी २०१७-१८ मध्ये ग्रामस्थांनी ‘पानी फाउंडेशन’च्या ‘वॅाटर कप’ स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धा जिंकण्यासाठी श्रमदानातून नाला बांध, डीप सीसीटी, बांधबंदिस्ती, ओढा खोलीकरण, रुंदीकरण आदी कामे केली. २०२० मध्ये पाणी पंचायत, सासवड, योगेश चव्हाण आणि लोकसहभागातून गावातील दोन पाझर तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात आले. २०२१-२२ भारतीय जैन संघटना, पुणे, ग्रामगौरव संस्था, सासवड तसेच लोकसहभाग, यात्रेच्या खर्च कमी करून उर्वरित ओढ्याचे खोलीकरण, रुंदीकरण केले. या सर्व कामात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही चांगला सहभाग होता. गावशिवारात झालेल्या जल, मृद् संधारणाच्या कामातून गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली. तसेच शेतीसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध झाले.
महिला गटशेतीस प्रारंभ
गटशेतीस प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘पानी फाउंडेशन'ने पुरस्कार सुरू केला होता. या स्पर्धेत गावातील महिलांनी सहभाग घेण्याचे ठरविले. २०२३ मध्ये फाउंडेशनच्या अडीच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी स्मिता शिंदे, मंदा शिंदे, अनिता शिंदे यांनी हजेरी लावून सर्व स्पर्धा समजून घेतली. गावात येऊन त्यांनी या स्पर्धेची माहिती देण्यासाठी ग्रामसभा घेतली. घरोघरी जाऊन महिलांचा सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी चांगले, वाईट अनुभव आले तरी प्रयत्न सुरू ठेवले. महिलांनी सहभागी होण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची समजूतही काढली. या प्रयत्नातून १५ महिला एकत्रित आल्या. या महिलांनी कृषिलक्ष्मी महिला शेतकरी गटाची स्थापना केली. गटाच्या अध्यक्षपदी स्मिता शिंदे आणि सचिवपदी गौरी जाधव, कोशाध्यक्ष म्हणून वनिता शिंदे यांची निवड करण्यात आली. या गटामध्ये संगीता शिंदे, रूपाली शिंदे, जयश्री शिंदे, मंदा शिंदे, मोहिनी शिंदे, पुष्पा शिंदे, अलका गायकवाड, श्यामल शिंदे, विजया जाधव, फुलाबाई शिंदे, सारिका धुमाळ, रेश्मा शिंदे, रेखा शिंदे या महिला सदस्या कार्यरत आहेत.
घेवडा पिकाचे नियोजन
गाव शिवारातील हवामान, जमीन, उपलब्ध पाणी आणि बाजारपेठेतील मागणीचा विचार करून गटाने घेवडा पिकाच्या वरुण जातीच्या लागवडीचा गटशेती स्पर्धेच्या दृष्टीने विचार केला. या संदर्भात आवश्यक असणारी माहिती आणि प्रशिक्षण घेतले. उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्राची जोड देण्याचे नियोजन केले.
स्पर्धेसाठी प्रत्येक महिलांचे एक एकर क्षेत्राप्रमाणे १५ एकरावर घेवडा लागवड.
गटातील सदस्या अलका गायकवाड यांच्याकडे शेती नसल्याने त्यांनी खंडाने शेतजमीन.
ट्रॅक्टर मालकास एकत्रित क्षेत्र मशागतीला दिल्याने दर एकरी चारशे रुपये भाड्यामध्ये बचत.
सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापरावर भर.
वरुण घेवडा जातीच्या दर्जेदार बियाण्याची निवड. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता चाचणी.
बीज प्रक्रियाकरून बीबीएफ तंत्राने पेरणी.
आवश्यक निविष्ठाची एकत्र खरेदी, त्यामुळे दर तसेच वाहतूक खर्चात बचत.
कीड नियंत्रणासाठी कामगंध चिकट सापळे, पक्षिथांब्याची उभारणी. दशपर्णी अर्काचा वापर.
भांगलण तसेच शेतीकामासाठी इर्जिक पद्धतीने एकत्र येऊन कामे केल्याने मजुरीत चांगली बचत.
इर्जिक पद्धतीने महिलांचे गट करून घेवड्याची काढणी, मळणी आणि विक्रीचे नियोजन.
रसायन अवशेषमुक्त घेवड्याची प्रयोगशाळेत तपासणी. एकत्रित विक्री केल्याने अपेक्षित दर, आर्थिक नफ्यात वाढ.
अर्थकारणाला गती
गटातील महिलांना एकरी १० ते १४ क्विंटल घेवड्याचे उत्पादन मिळाले. गटातर्फे उत्पादित सर्व घेवड्याची एकत्रित विक्री केल्याने किलोस ११० रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता चांगला आर्थिक नफा हाती शिल्लक राहिला. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण झाले. शेतीमध्ये मिळालेले यश आणि वाढलेला आर्थिक नफा तसेच गटामध्ये एकत्रित काम केल्याने महिला एकमेकींच्या सुखःदुखात सहभागी होऊ लागल्या. गावशिवारातील शेती आणि अर्थकारणाला चांगली गती मिळाली आहे.
महिलांना मिळाला सन्मान
गटशेतीच्या माध्यमातून शेतीमध्ये यश संपादन केल्यामुळे महिलांचा कुटुंबात सन्मान वाढला. गटामध्ये एकजिनसीपणा येण्यासाठी एकाच प्रकारचा युनिफॉर्म तयार केला. गावामध्ये सेंद्रिय शेती वाढविण्यासाठी गटातर्फे प्रयत्न सुरू झाले आहेत. गावातील नवतरुण गणेश उत्सव मंडळाने आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत गटाने तयार केलेल्या ‘सेंद्रिय शेती मॅाडेल' ला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
‘वॅाटर कॅप- २०२३' स्पर्धेमध्ये कृषिलक्ष्मी महिला शेतकरी गटाला राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट महिला गटाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अभिनेते अमीर खान, प्रकाशराज, किरण राव, सत्यजित भटकळ यांच्या हस्ते मिळाला. या गटाने परिसरातील गावात जाऊन शेतीला नवी दिशा देण्यासाठी महिलांचे गट स्थापन केले आहेत.
या वर्षी गटाच्या माध्यमातून प्रत्येकी दोन एकर प्रमाणे १५ एकर घेवडा आणि १५ एकरांवर भुईमूग १५ लागवड केली आहे. पहिल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सर्व शेती कामे गटातील महिला एकत्र येऊन करत आहेत. पहिल्या वर्षी चांगले यश मिळाल्याने यंदादेखील घेवड्याचे पीक तंत्रशुद्ध पद्धतीने केले असून कुटुंबातील सदस्य मदत करीत आहेत.
आधुनिक शेतीचे तंत्र अवगत करण्यासाठी गटातील महिलांनी कृषी विज्ञान केंद्र, बारामती, हिवरे बाजार, जिल्ह्यातील बिचकुले, बनवडी, सातारा रोड येथील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या. पीक स्पर्धा तसेच उत्पादनवाढीसाठी गटातील महिलांना माजी सैनिक प्रदीप शिंदे, कृषी अधिकारी अजित गिझगे, मोहन लाड, पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक राहुल भासल, संदेश कारंडे, जागृती शिंदे यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे.
स्मिता शिंदे, ९९२१६९०३९३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.