Dragon Fruit Farming : दुष्काळात ‘ड्रॅगन फ्रूट’ने जागविल्या आशा

Dragon Fruit Production : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यातील अकोला (वासूद) येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी महेश आसबे यांनी सर्वाधिक २० एकरांत ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड केली आहे.
Mahesh Asbe
Mahesh AsbeAgrowon

सुदर्शन सुतार

Success Story of Dragon Fruit : सोलापूर जिल्ह्यात सांगोल्यापासून १२ किलोमीटरवर माणनदीच्या काठावर अकोला (वासूद) हे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे महेश आसबे कुटुंबीयांची ६० एकर शेती आहे. महेश यांचे वडील पांडुरंग प्रगतशील, प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत.

डाळिंबातील आघाडीचे उत्पादक ते राहिलेच, पण सोलापूर जिल्ह्यात त्या काळात डाळिंबाला पर्याय म्हणून त्यांनी सर्वप्रथम ॲपलबेर आणले. पांडुरंग यांचा आई कोंडाबाई, मोठे बंधू दिलीप, लहान बंधू विठ्ठल असा एकत्रित परिवार आहे. आणि तोच त्यांच्या प्रगत शेतीचा आधार आहे.

ड्रॅनन फ्रूटचा शोधला पर्याय

पांडुरंग यांचे चिरंजीव महेश आणि राहुल पूर्णवेळ शेतीत कार्यरत आहेत. वडिलांचेच संस्कार त्यांच्यावर आहेत. महेश यांनी ॲग्री बी.टेक. व त्यानंतर अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी विषयातून एमटेक केले आहे.

तर राहुल बीएस्सी आहेत. अलीकडील वर्षांत तेलकट डाग रोग, मर आदी रोगांनी डाळिंब उत्पादकांना त्रस्त केले आहे. शेतकऱ्यांना उष्ण तापमान, तीव्र दुष्काळ आदी समस्यांनाही वारंवार सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रतिकूल हवामानाला सुसंगत व बाजारपेठेतील मागणी या बाजू पाहून आसबे यांनी २०१३ मध्ये ड्रॅगनफ्रूटची लागवड तीन एकरांत केली. पुढे महाविद्यालयीन काळात (२०१७) महेश यांना इस्राईलचा अभ्यास दौरा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी ड्रॅगन फ्रूटला आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली संधी, विस्तृत वाव दिसून आला. गावी आल्यानंतर डाळिंब, ॲपलबेरचे क्षेत्र कमी करून टप्प्याटप्प्याने ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढवली. आजमितीला तब्बल २० एकरांत त्याचे क्षेत्र आहे.

Mahesh Asbe
Dragon Fruit Farming : दर्जेदार ड्रॅगन फ्रूट उत्पादनासाठी शेडनेटचा वापर

...अशी आहे ड्रॅगन फ्रूटची शेती

वीस एकरांपैकी सर्वाधिक १२ एकरांवर जंबो वाण. तीन एकर यलो, चार एकर रेड (आतून व बाहेरूनही), एक एकर व्हाइट (आतून पांढरे व बाहेरून लाल) असे विविध वाण.

हवामान व दरांच्या अनुषंगाने जोखीम कमी करण्यासाठी अन्य फळांचीही विविधता. यात एक एकर एनएमके सीताफळ, सहा एकरांत जंबो पेरू.

जून ते डिसेंबर या कालावधीत ड्रॅगन फ्रूटची लागवड. वेलींना भक्कम आधारासाठी सिमेंटचे खांब. त्यावर चौकोनी, गोल प्लेट्‍स आणि विना प्लेट अशा तीन पद्धतींचा प्रयोग. यात १० बाय सहा फूट अंतरावर लागवड. सघन पद्धतीचाही वापर. लोखंडी बार, तार आणि बांबू आधारावरील लागवड पद्धतीचेही प्रयोग.

उन्हाळ्यात तीव्र उन्हापासून बचाव करण्यासाठी मार्च ते मे या दरम्यान पाण्याचे प्रमाण जास्त न ठेवता मर्यादितच ठेवले जाते. अन्य फळांच्या तुलनेने या फळाला पाणी कमीच लागते

Mahesh Asbe
Dragon Fruit Production : ‘ड्रॅगन फ्रूट’ उत्पादकतावाढीसाठी कृत्रिम परागीभवन

उत्पादन आणि ‘मार्केटिंग’

लागवडीनंतर वर्षाने उत्पादन सुरू. पहिल्या वर्षी एकरी २ ते ४ टन, दुसऱ्या वर्षी ४ ते ७ टन, तर तिसऱ्या वर्षानंतर एकरी ७ ते १० टनांपर्यंत उत्पादन मिळू लागते.

रेड वाणाला प्रति किलो १०० ते ११०, व्हाइट वाणाला ५७ ते ७० रुपये दर मिळतो.

बाग उभारणीचा भांडवली खर्च एकरी चार ते पाच लाखांपर्यंत. त्यानंतर दरवर्षी एक लाख रुपये.

मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली आदी महानगरांमध्ये बाजारपेठ मिळवली आहे.

सोलापूर, सांगली, कोल्हापूर या स्थानिक बाजारातही चांगला उठाव.

निर्यातदारामार्फंत लंडन येथे पाचशे किलो फळे पाठवण्यात महेश यशस्वी झाले आहेत. स्वतः निर्यातदार होऊन दुबईला निर्यातीचाही प्रयत्न.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कोरडे वातावरण, कमी पाणी आणि कमी खर्चात ड्रॅगन फ्रूट चांगले उत्पादन आणि उत्पन्न देऊ शकते हा विश्‍वास महेश शेतकऱ्यांना देतात. यू-ट्यूब, फेसबुक, व्हॉट्‍सॲप ग्रुपच्या माध्यमातूनही महेश मार्गदर्शन करतात. या पिकाविषयी प्रशिक्षणेही त्यांनी आपल्या शेतात घेतली आहेत. शेतकरी त्यांच्या बागेला भेट देत असतात.

त्यांनी रोपवाटिकाही उभारली आहे. आज चारशेहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्याकडून रोपे घेऊन लागवड केल्याचे महेश यांनी सांगितले. स्वखर्चाने ड्रॅगन फ्रूट शेती अभ्यासासाठी दुबई, इराण, थायलंड, व्हिएतनाम या देशांचे दौरही त्यांनी केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com