Onion Farming AGROWON
यशोगाथा

Onion Farming : वयाच्या सत्तरीत मार्गदर्शन घेत कांद्याची यशस्वी शेती

Rabbi Onion Crop : गुजरात राज्यातील मटोडा येथील वयाच्या सत्तरीतील श्यामलभाई पटेल तेथील कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आले. त्यातून रब्बी कांदा रोपवाटिकेपासून ते पुनर्लागवड, काढणीपर्यंतचे इत्थंभूत मार्गदर्शन त्यांना प्रत्यक्ष शेतावर मिळाले.

Team Agrowon

Rabbi Onion Production : गुजरात राज्यातील मटोडा येथील वयाच्या सत्तरीतील श्यामलभाई पटेल तेथील कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आले. त्यातून रब्बी कांदा रोपवाटिकेपासून ते पुनर्लागवड, काढणीपर्यंतचे इत्थंभूत मार्गदर्शन त्यांना प्रत्यक्ष शेतावर मिळाले. त्यातून पारंपरिक पद्धतीत मिळणारे एकरी ९ ते १० टनांपर्यंतचे उत्पादन एकरी १७.६० टनांपर्यंत पोहोचविण्यात व उत्पादन खर्च कमी करण्यात त्यांना यश मिळाले आहे.

श्यामलभाई धुळाभाई पटेल हे गुजरात राज्यातील मटोडा (ता. खेडब्रह्मा, जि. साबरकांठा) येथील
७० वर्षे वयाचे शेतकरी आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांची सुमारे तीन एकर ३७ गुंठे शेती आहे. शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. सिंचनाचा स्रोत विहीर असून, दरोही धरणाचा फायदाही होतो. कापूस -गहू आणि कापूस - रब्बी कांदा अशी त्यांची पीकपद्धती आहे.

रब्बी कांद्याच्या शेतीबाबत बोलायचे तर काही शेतकरी विहित विलगीकरण अंतराचा विचार न करता अशास्त्रीय पद्धतीने बियाणे तयार करतात. त्याआधारे तयार केलेल्या रोपांपासून पुढे कांद्याचा रंग, आकार व वजन यात एकसारखेपणा नसतो. डेंगळे येणे, भेसळयुक्त कांदे आदी कारणांमुळे अपेक्षित उत्पादन व गुणवत्ता मिळत नाही. श्‍यामलभाईंना याच समस्या जाणवत होत्या.

‘केव्हीके’ने दाखविली वाट

सन २०२१ मध्ये श्‍यामलभाई सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या खेडब्रह्मा (जि. साबरकांठा) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आले. तेथील उद्यानविद्या विभागाचे साहायक प्राध्यापक डॉ. प्रतीक साबळे यांनी त्यांना सुधारित तंत्र व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यातून श्यामलभाईंना स्वतःच कांदा रोप निर्मिती करण्याची कल्पना सुचली.

केव्हीकेने महुवा (गुजरात) येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान संस्थेतील मधुकर मुखेडकर यांचे सहकार्य घेतले. त्यातून एनएचआरडीएफ लाल- ४ जातीचे बियाणे उपलब्ध करून दिले. त्यानंतर श्‍यामलभाईंनी केव्हीकेच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाचा वापर केला.

केव्हीकेचे रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान

-निवड केलेल्या वाणाची रोपनिर्मिती.
-रोपवाटिकेसाठी वाफे २-३ मीटर लांब व १-१.५ मीटर रुंद. जेणेकरून तण काढणे सुलभ होईल.
-एक एकर पुनर्लागवडीसाठी रोपनिर्मितीसाठी दोन किलो बियाणे वापर.
-व्यवस्थित मशागत करून रानबांधणी. रोपे टाकण्यापूर्वी अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत, २:१:१ किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति ५ गुंठे. पेरणीनंतर २० दिवसांनी एक किलो नत्र.
-रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमिथॅलिन २ मिलि प्रति लिटर पाणी अशी फवारणी. २० ते २५ दिवसांनी १ ते २ खुरपण्या.
-फुलकिडी नियंत्रणासाठी फिप्रोनिल (५ ईसी) १ मिलि व करपा नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी- फवारणी. मर रोग नियंत्रणासाठी संयुक्त बुरशीनाशक मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाची रोपांच्या ओळीत आळवणी.
-रोपांची वाढ व विकासासाठी बियाणे वापरल्यानंतर २५ ते ३० दिवसांनी १९:१९:१९ हे खत २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी. आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण-४ (लोह ४ टक्के, जस्त ६ टक्के, मँगेनीज, १ टक्का,
तांबे ०.५ टक्का, बोरॉन ०.५ टक्का) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी
फवारणी.

पुनर्लागवडीनंतरचे व्यवस्थापन

-रोपे ५०-६० दिवसांची झाल्यानंतर १५ × १० सेंमी. अंतरावर पुनर्लागवड. वाढलेल्या रोपांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून मगच पुनर्लागवड.
-जमीन तयार करताना प्रति एकर १० टन चांगले कुजलेले शेणखत.
-पुनर्लागवड करताना एकरी युरिया ४३ किलो, संपूर्ण सिंगल सुपर फॉस्फेट १२५ किलो, म्युरेट ऑफ पोटॅश ३३ किलो आणि ९ ते १० किलो गंधक.
-पुनर्लागवडीनंतर एक आणि दीड महिन्याने युरिया ४३ किलो समान हप्त्यात.
-पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी १९:१९:१९ हे खत ५ ग्रॅम. अधिक सूक्ष्मअन्नद्रव्ये मिश्रण ग्रेड -४ हे २ ग्रॅम. ६० ते ७० दिवसांनी ०:०:५० या खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी.
-पुनर्लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी ऑक्झीफ्लोरफेन (२३.५ टक्के) एक ते १.५ मिलि प्रति लिटर पाणी फवारणी. गरजेनुसार ३० ते ४५ दिवसांनी खुरपणी.
-पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मिलि प्रति लिटर पाणी फवारणी.
-आधीच्या फवारणीनंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मिलि प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी.

उत्पादन (एकरी)

-पारंपरिक पद्धत- ९ ते १० टनांपर्यंत उत्पादन मिळाले.
-उत्पादन खर्च- ९०, ८६५ रु. आला.
-नफा-खर्च गुणोत्तर १.५८
-केव्हीके तंत्रज्ञान सुधारित पद्धत- १७.६० टनांपर्यंत उत्पादन.
.उत्पादन खर्च- ७१, ०६५ रु.
- नफा-खर्च गुणोत्तर ३.७१
-पारंपरिक पद्धतीत चिंगळी, जोड कांदा, डेंगळे, भेसळयुक्त कांद्याचे प्रमाण आढळले होते. सुधारित शेतीत ते आढळले नाही.
-कांद्याला सरासरी दर १५ रुपये प्रति किलो मिळाला.

तू तर माझ्या मुलाप्रमाणेच...

श्‍यामलभाई पत्नीसमवेत राहतात. त्यांना एकुलती एक मुलगी होती. मात्र विवाहानंतर तिचे निधन झाले. आज वयाच्या सत्तरीतही दररोज स्वतः लक्ष देऊन वाटेकऱ्यांच्या साह्याने ते शेती प्रगतिशील ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कांद्याचे सुधारित बियाणे वापरण्याचा सल्ला जेव्हा केव्हीकेकडून देण्यात आला त्या वेळी ऑनलाइन पद्धतीने खरेदीविषयी चर्चा झाली. मात्र श्‍यामलभाईंना त्याविषयी पुरेसे ज्ञान नव्हते. अशावेळी डॉ. साबळे यांनी स्वतःच्या बँक खात्यामधून ऑनलाइन पद्धतीने खरेदी करून त्यांना बियाणे घरी पोहोच करून दिले. रोपनिर्मिती, पुनर्लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष शेतात येऊन केले. शरीर थकलेल्या वयातील श्‍यामलभाईंसाठी हा अनुभव अत्यंत सुखद होता. मला मुलगा नाही, पण अगदी मुलाप्रमाणेच सगळी मदत करून तू त्याचा अनुभव
मला दिलास अशी प्रतिक्रिया त्यांनी उत्स्फूर्त व्यक्त केली.

डॉ. प्रतीक साबळे, ८४०८०३५७७२
श्यामलभाई पटेल, ९९९८४५३७६४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT