
शेतकरी नियोजन - केळी
...........
शेतकरी ः पद्माकर जगन्नाथ पाटील
गाव ः तरडी, ता. शिरपूर, जि. धुळे
एकूण क्षेत्र ः ४० एकर
केळी लागवड ः १० एकर (१३ हजार झाडे)
Tomato Cultivation : पद्माकर पाटील यांची तरडी (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे अनेर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात ४० एकर शेती आहे. जमीन मध्यम व पाण्याचा निचरा होणारी आहे. सिंचनासाठी चार कूपनलिका आहेत. केळी मुख्य पीक असून, त्यात नवती किंवा मृग बहर केळीची दरवर्षी लागवड केली जाते. बेवडसाठी पपई लागवड करतात. पीक फेरपालटीवर त्यांचा विशेष भर असतो. जमिनीचा पोत लक्षात घेऊन केळी लागवडीसाठी वाण निवड, सिंचन आणि खत व्यवस्थापन इत्यादी कार्यवाही केली जाते.
निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याचा पद्माकर पाटील यांचा प्रयत्न असतो. मागील हंगामात सुमारे १८ एकरांत ३१ हजार केळी झाडांची लागवड केली होती. त्या वेळी संपूर्ण लागवड ५ फूट बाय ६ फूट अंतरावर केली होती. निर्यातक्षम उत्पादनासाठी फ्रूट केअर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. उत्पादित संपूर्ण १०० टक्के केळीची खासगी कंपनीच्या माध्यमातून परदेशात निर्यात केली असल्याचे पद्माकर पाटील सांगतात.
मे महिन्याच्या अखेरीस लागवडीचे नियोजन केले जाते. लागवडीसाठी १०० टक्के उतिसंवर्धित रोपांचा वापर केला जातो. ग्रॅण्ड नैन या जातीच्या केळी रोपांची गादीवाफ्यावर लागवड केली जाते. रोपांच्या लागवडीसाठी दीड फूट उंच व तीन फूट रुंद गादीवाफे तयार करून सिंचनासाठी एका ओळीत दोन लॅटरल टाकल्या जातात.
लागवड नियोजन ः
- मृग बहर केळीची ६ जूनला लागवड करण्यात आली. त्यात साधारण १३ हजार उतिसंवर्धित रोपे बसली. पीक सध्या दीड महिन्याचे पीक झाले आहे. लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांचा १०० टक्के उपयोग केला आहे.
- लागवडीनंतर रोपांना विविध सरळ खतांचा बेसल डोस दिला आहे. प्रति १ हजार झाडांना डीएपी ७५ किलो, पोटॅश ५० किलो आणि युरिया ४५ किलो प्रमाणे मात्रा दिली आहे. सोबत सेंद्रिय खत १०० किलो प्रति एक हजार झाडे याप्रमाणे दिले. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून पांढऱ्या मुळांचा विकास होतो. तसेच जमीन भुसभुशीत होते. त्यामुळे सेंद्रिय बाबींचा समावेश बेसल डोसमध्ये केला जाईल.
- या खतांसोबत मॅग्नेशिअम सल्फेट प्रति एक हजार झाडांना २५ किलो एवढे दिले. पोटॅश १० किलो, युरिया १५ किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट ३ किलो प्रति एक हजार झाडांना दर आठ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे देण्यात आले.
कीड-रोग व्यवस्थापन ः
- कुकुंबर मोझॅक (सीएमव्ही) विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दर चार दिवसांनी प्रतिबंधात्मक फवारणी घेण्यासाठी नियोजन केले आहे. सीएमव्ही या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावासाठी बागेचे सातत्याने निरीक्षण करत आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे केळी झाडांचे मोठे नुकसान होते. त्यासाठी सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाय करणे फायदेशीर ठरते.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पहिली फवारणी निंबोळी तेल आणि शिफारशीत घटकांची घेतली. त्यानंतर ५ दिवसांनी पुन्हा निंबोळी अर्क आणि शिफारशीत घटकांची एक फवारणी आणि पुन्हा ४ दिवसांनी शिफारशीप्रमाणे फवारणी केली. अशा १५ दिवसांत तीन फवारण्या घेतल्या आहेत. सध्यातरी बागेत रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही.
मागील कामकाज ः
- सध्या रोपांच्या मुळांचा विकास चांगला होत आहे. त्यामुळे गादीवाफ्यावरील आंतरमशागतीची कामे टाळली आहेत.
- पाऊस बऱ्यापैकी झाल्याने बागेत तणांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मजुरांच्या मदतीने तणनियंत्रण करून घेतले. आणि त्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या आहेत.
- पाऊस आणि जमिनीतील वाफसा यांचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन केले. मागील काही दिवसांत कमी पाऊस तर काही वेळा पावसांत उघडीप होती. त्यामुळे प्रतिदिन २ तास प्रमाणे ठिबकद्वारे सिंचन केले. पाऊस झाला त्या दिवशी सिंचन करणे टाळले. जेणेकरून पिकात वाफसा स्थिती कायम राहील.
- ऑगस्ट महिन्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी घेतली. फवारणी द्रावणात मिनरल ऑइल व्यवस्थित मिसळून नंतर फवारणी घेतले.
- बांधावरील गवतामुळे सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन बांधावरील गवत कापून घेतले. तर काही गवतांवर तणनाशकांची फवारणी घेतली.
पुढील १५ दिवसांतील नियोजन ः
- बागेचे खत व्यवस्थापनाचे काम सुरूच राहणार आहे. कारण बेसल डोससोबत नियमित आवश्यकतेनुसार ड्रीपमधून खते द्यावी लागतात. त्यासाठी लागवडीच्या सुरुवातीला खत व्यवस्थापनासाठी वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार खत व्यवस्थापन केले जाईल.
- प्रति १ हजार झाडांना कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो, बोरॉन अर्धा किलो याप्रमाणे दर १५ दिवसांनी ड्रीपमधून दिले जाईल. याशिवाय झिंक आणि फेरस ही खते अर्धा किलो प्रत्येकी प्रमाणे प्रति १ हजार झाडांना दिली जातील.
- वन्य प्राण्यांपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती तारेचे कुंपण केले आहे. या लावलेले कुंपण, तारांची तपासणी आणि पाहणी करून आवश्यकतेनुसार दुरुस्ती केली जाईल.
- ठिबकचे व्हॉल्व्ह स्वच्छ केले जातील. तसेच ड्रीप व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी तोट्यांची स्वच्छता व पाहणी केली जाईल.
- कुकुंबर मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी घेतली जाईल.
- पद्माकर पाटील, ९३७१७२२१००
(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.