Farmer Success Story : सांगली जिल्ह्यातील आटपाडी (जि. सांगली) या दुष्काळी पट्ट्यातील कापूस हे पहिलं नगदी पीक होतं. पुढे तांत्रिक अडचणीमुळे त्याचं क्षेत्र जवळपास संपुष्टात आलं. त्याजागी डाळिंब पीक आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अनेक शेतकऱ्यांनी तालुक्याची निर्यातक्षम डाळिंबासाठी ओळख तयार केली.
याच आटपाडीत मापटेमळा येथील भागवत दगडू माळी व त्यांचे बंधू यशवंत यांची ४० एकर शेती आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने खचून न जाता शेळी-मेंढी पालन, रब्बी, खरीप हंगामातील पिकांतून त्यांनी नेटाने उदरनिर्वाह केला.
दुष्काळ त्यांनी प्रत्यक्ष भोगला. शेतीला आर्थिक उत्पन्न जोडण्यासाठी यशवंत माळी यांनी सन १९८५ मध्ये खासगी साखर कारखान्यात नोकरी पत्करली. भागवत त्या वेळी शिक्षणासाठी सांगलीत होते. तिथं त्यांनीही नोकरी पत्करली. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शिक्षण आणि स्वतःचा खर्च निघायचा.
दुष्काळातील डाळिंब बाग
माळी बंधूंच्या वडिलांनी १९९५ मध्ये गणेश या वाणाच्या लागवडीपासून डाळिंब बागेचा श्रीगणेशा केला. बाग जगवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण दुष्काळ कायम पाचवीला पुजला असल्याने अडचणीतून बाहेर पडता आले नाही.
सात वर्षांनंतर बाग काढून टाकावी लागली. दरम्यान भागवत यांनी बी. कॉमचे शिक्षण पूर्ण केले. सन १९९६ ते २००१ पर्यंत कोल्हापूर येथे दोन ठिकाणी नोकरी केली. गावी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत त्यांना ‘फील्ड ऑफिसर’ म्हणून नोकरी लागली.
त्यानंतर मात्र घरच्या बागेकडे अधिकाधिक वेळ देणे शक्य होऊ लागले. शेती मुरमाड, काही प्रमाणात काळी होती. काळ होता २००५ च्या दरम्यानचा. तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी डाळिंब बागा काढल्या जात होत्या. नवीन लागवडीकडे कोणी धजावत नव्हते. दरम्यान, भागवत यांचे मित्र पृथ्वीराज पाटील यांनी डाळिंबाचे सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन याबाबत सल्ला देत प्रोत्साहनही दिले.
त्यातून भागवत यांना नव्याने लागवडीचा उत्साह मिळाला. पिकातील बारकावे अभ्यासण्यास सुरुवात केली. हळूहळू दर्जेदार उत्पादन मिळण्यास सुरवात झाली. जोडीला विजय मरगळे यांचेही मार्गदर्शन मिळू लागले. अजून आत्मविश्वास वाढला.
व्यवस्थापनात केल्या सुधारणा
सन २०१० मध्ये चार एकर, २०१८ मध्येही चार आणि २०१९ मध्येही पुन्हा चार एकर आणि पूर्वीची दोन एकर अशी आजमितीला एकूण १४ एकरांवर भगवा वाणाची डाळिंब बाग मोठ्या दिमाखात उभी आहे. भागवत सांगतात की दरवर्षी आगाप मृग बहर धरला जायचा. डाळिंबाची निर्यात करण्याच्या दृष्टीनेच व्यवस्थापन केले जायचे. मात्र अलीकडील वर्षांत परतीचा पाऊस, तेलकट डाग रोगाची समस्या जाणवू लागली.
त्यामुळे मागील वर्षापासून आठ एकरांवर आंबिया बहर घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीतील नुकसान टाळणे शक्य होते. कळी सेट होण्यात अडचणी येत नाहीत. रोगांचा प्रादुर्भाव कमी राहतो. ‘सनबर्निग’ होऊ नये यासाठी नेटचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांत १२ बाय ८, १९ बाय ९ व अलीकडे १५ बाय १० अशा लागवड अंतराचे प्रयोगही केले आहेत.
लागवड गादीवाफ्यावर असते. बागेच्या स्वच्छतेला महत्त्व दिले जाते. रोगट फांद्या काढून टाकल्या जातात. काढणीनंतर छाटणीचे नियोजन असते. त्यानंतर कुदळणी करून प्रति झाड २० किलो शेणखत, तसेच निंबोळी पेंड आणि यंदाच्या वर्षापासून जिवामृत स्लरीचा वापर सुरू केला आहे. शेणखताचा वापर दरवर्षी होत असून ते बाहेरून खरेदी केले जाते.
शाश्वत पाण्याची सुविधा
डाळिंब पिकाला पाण्याची गरज कमी असली तरी ऐन हंगामात कमतरता भासते. त्यामुळे शिवारात चार विहिरी घेतल्या आहेत. तरीही पाण्याच्या पातळीत घट होते. त्यामुळे शेतापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आटपाडी तलावातून २०१८ मध्ये पाच इंची पाइपलाइन करून विहिरीत सोडली आहे. यासाठी साडेअठरा लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्यातच आता टेंभू योजनेची बंदिस्त पाइपलाइन शेताजवळ आली आहे.
उत्पादन व जागेवर ‘मार्केट’
भागवत सांगतात, की एकरी प्रति झाड २० ते २५ किलो माल घेतो. एकरी साडेपाच टनांपासून ते सात टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. फळाचे वजन दोनशे, साडेतीनशे ग्रॅमपर्यंत राहते. मागील काही वर्षे स्थानिक निर्यातदारामार्फंत त्यांनी डाळिंबाची निर्यात केली. किलोला २०० रुपयांपर्यंत दरही मिळवला.
गेल्या तीन वर्षांपासून देशांतर्गतच बाजारपेठेत चांगले दर मिळत आहेत. व्यापारी बागेत येऊन खरेदी करीत आहेत. प्रति किलो १०० ते १२५ रुपये कमाल दर मिळवणे त्यामुळे शक्य होत आहे.
भागवत माळी ९४२३०३७६५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.