Agriculture Agrowon
यशोगाथा

Success Story : शंभर टक्के ‘सक्सेस’ व्हायचे हाच माझा लढाऊ बाणा

Agrowon Diwali Ank : कोणतेही पीक शंभर टक्के ‘सक्सेस’ करायचेच हाच लढाऊ बाणा मी शेतीत ठेवला आहे. म्हणूनच तसे यश मिळाले आहे. शेती हा उद्योग म्हणून केला पाहिजे व त्यात सर्वस्व ओतले पाहिजे.

Team Agrowon

सोमनाथ फलफले

कोणतेही पीक शंभर टक्के ‘सक्सेस’ करायचेच हाच लढाऊ बाणा मी शेतीत ठेवला आहे. म्हणूनच तसे यश मिळाले आहे. शेती हा उद्योग म्हणून केला पाहिजे व त्यात सर्वस्व ओतले पाहिजे. एकेकाळी गावातील सर्वांत गरीब कुटुंब म्हणून आमच्याकडे पाहिले जायचे. आज गावातील अग्रगण्य सधन, प्रगतिशील कुटुंबांमध्ये आमची वर्णी लागली आहे, ही आम्हा फलफले कुटुंबासाठी समाधानाची बाब आहे. ज्ञानाधारित शेतीतून समाधानी अन्‌ श्रीमंतही होता येते याची प्रचिती मी घेतली आहे.

मी   सोमनाथ बाळासाहेब फलफले. पुणे जिल्ह्यात इंदापूर या तालुका ठिकाणापासून सुमारे दोन किलोमीटरवर माझं गलांडेवाडी गाव आहे. दहावीला असतानाच मातृछत्र हरपलं. आजी आणि वडिलांनीच आम्हा भावंडांचा सांभाळ केला. वडिलोपार्जित पाच एकर शेती होती. पण ती पावसावर आधारित. आर्थिक परिस्थिती एवढी हालाखाची होती, की गावातलं सर्वांत गरीब कुटुंब कुणाचं असं विचाराल तर ते आमचंच ठरलं असतं. विहीर खणून वडिलांना सिंचनाची सोय करायची होती. पण गाठीला पैसेच नव्हते. मीदेखील दहावीच्या शिक्षणानंतर ऊस तोडायला, गाळ उपसायला, रस्त्यांच्या किंवा विहिरींच्या कामांना जाऊ लागलो. दुसरा पर्यायच नव्हता. चुलते कै. तुकाराम फलफले नोकरी करायचे. स्वभावाने दयाळू. त्यांनी ३० हजार रुपये दिले. त्यातून विहीर खोदली. त्यातून शेती पिकून खाण्यापुरती ज्वारी, मटकी, हुलगा असं धान्य होऊ लागलं. वडील दिवसभर दुसऱ्यांकडे शेतमजुरी करायचे. पहाटे आणि रात्री उशिरापर्यंत बैलांना वैरणीला न्यायचे.

पपईचा पहिला प्रयोग

थोडी थोडी करीत मी शेती विकसित करण्याच्या मार्गाला लागलो. पपईसारखं पहिलंच फळपीक घेतलं. पैसेही चांगले झाले. तो साधारण १९९३- ९४ चा काळ असावा. उजनी धरण व त्याचं ‘बॅक वॉटर’जवळ असल्याने मच्छीमारीसाठी इथे बरेच जण यायचे. गावातील दादा गलांडे यांनी मासेविक्रीतून गावातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी सोसायटी स्थापन केली. इंदापुरात अडत सुरू केली. मी तेथे कामास लागलो. मधल्या काळात मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. धाकटी बहीण लग्नाची होती.

वडिलांकडचे काही आणि मी कमावलेले काही अशा पुंजीतून तिच्या लग्नाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. शेती आणि मासेविक्रीतून पैशांचा ओघ सुरू होता. त्यातून १९९९ च्या दरम्यान साडेतीन एकर शेती विकत घेण्याचं ठरवलं. संबंधित व्यक्तीने उधारीवर अजून काही जमीन देऊ केली. धाडस केलं आणि एकूण सात एकर १० गुंठे जमीन घेतली. जमीन अशी माळरानाची होती की जनावरेही चरत नसत. चालताना पायाला काटे बोचत. असली जमीन घेतली कशाला असा प्रश्‍न प्रत्येक जण विचारायचा. मी त्यात नारळाचे पीक लावले. ऊस केला. पण उन्हाळ्यात विजेची समस्या त्रास देऊ लागली. हलक्या जमिनीत ऊस साधेना.

ज्ञानप्राप्तीचा मार्ग धरला

आपल्या शेतीची प्रगती झाली पाहिजे असा सतत ध्यास लागला होता. अडतीच्या दुकानात विविध वर्तमानपत्रे यायची. त्यात शेतीविषयक माहिती, शेतकऱ्यांचे प्रयोग सातत्याने वाचायचो. प्रयोगशील शेतकऱ्यांची शेती पाहायला जायचो. त्यातूनच एका प्रसिद्ध कंपनीच्या उतिसंवर्धित डाळिंब रोपांविषयी माहिती समजली. त्या वेळेस राज्यातील डाळिंब पट्ट्यात सर्वत्र तेलकट डाग रोगाची समस्या गंभीर होती.

अशावेळी उतिसंवर्धित रोपांचा पर्याय वापरून डाळिंब शेतीच प्रयोग करायचं ठरवलं. त्या वेळी परिसरातील अभ्यासू व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संगतीत राहत होतो. त्यात राजाभाऊ फलफले, नाना पवार, महादेव शेंडे आदी अनुभवी, बुजुर्ग शेतकऱ्यांचा समावेश होता. ज्ञानप्राप्ती करायची तर हाच मार्ग धरणे गरजेचे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा एकर डाळिंब लावले. त्या काळात आमच्या भागात एवढे डाळिंब क्षेत्र विकसित झाले नव्हते. जिद्द अशी ठेवली, की १०० टक्के हे पीक यशस्वी करायचे.

पहाटे उठून ते अगदी रात्री उशिरापर्यंत सगळ्या कामांमध्ये खूप राबायचो. निश्‍चय केल्याप्रमाणे पीक यशस्वी केलं देखील. किलोला सरासरी ४० ते ४५ रुपये, तर कमाल ७० रुपये दर मिळवला. काही लाख रुपये हाती आले. त्या काळात त्या पैशांची किंमत खूप होती. त्यातून उमेद वाढली.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT