Nampur Animal Market Agrowon
यशोगाथा

Nampur Animal Market : जातिवंत बैलजोड्यांसाठी नामपूरचा राज्यात नावलौकिक

मुकुंद पिंगळे

Nampur Bull Market : शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर वाढत असला तरी अजूनही अनेक अल्पभूधारक शेतकरी बैलांच्या आधारेच शेती करतात. बैलांचे स्थान अजून महत्त्वाचे आहे. कसमादे भागातील शेतकऱ्यांच्या खळ्यात दावणीला बैलजोडी हमखास दिसते. त्यामुळेच नामपूरचा बैलबाजार (ता. सटाणा) प्रसिद्ध झाला आहे.

सुमारे ७५ वर्षांपूर्वी येथे हा बाजार भरण्यास सुरुवात झाल्याचे जुनेजाणते शेतकरी सांगतात. त्या वेळी बाजार गावातील मोसम नदीकाठी भरायचा. सन १९७५ मध्ये सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नामपूर येथे उपबाजार सुरू झाला.

येथे व्यापाऱ्यांना सुविधा देऊ केल्याने शेतकरी खरेदीला येऊ लागले. बाजाराची ख्याती उत्तर महाराष्ट्रात वाढत गेली. पुढे २०१५ मध्ये सटाणा बाजार समितीचे विभाजन होऊन स्वतंत्र नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली.

राज्यभर ख्याती

पूर्वी नामपूर बाजार समितीच्या आवारात हा बाजार सहा एकरांत भरायचा. व्यापारी बैलजोडीची मशागत प्रात्यक्षिके या वेळी दाखवीत. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलाची चाल, गुण समोर लगेच पाहायला मिळत. खरेदीत पारदर्शकता असल्याने गर्दी वाढत गेली. पूर्वी व्यापाऱ्यांच्या २० ते २५ दावणी कायमस्वरूपी असायच्या.

वाळकी (जि. नगर) परिसरातून ४० ते ५० व्यापारी यायचे. दिवसाला ३० लाख रुपयांची उलाढाली झाल्याच्या नोंदी आहेत. यांत्रिकीकरण वाढत गेले तशी बैलांची मागणी कमी होत गेली. पूर्वी दर बुधवारी ३०० ते ४०० बैलजोड्या दिसत. आता ही संख्या १०० ते १५० वर येऊन ठेपली आहे.

परस्पर विश्‍वासाची खात्री

नामपूर ही करंजाड व मोसम खोऱ्यातील ९६ गावांचे कार्यक्षेत्र असलेली बाजार समिती आहे. नाशिक जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार जळगाव जिल्हे, गुजरातमधील सुरत, बडोदा परिसरातून शेतकरी व हौशी लोक जातिवंत बैल खरेदीसाठी येथे येतात. व्यापाऱ्यांच्या तिसऱ्या पिढ्या येथे कार्यरत आहेत.

सौदा होताना शेतकरी इसारा रक्कम देऊन बैलजोडी घेऊन जातात. बैलात खोड निघाली किंवा मारका निघाल्यास ती जोडी व्यापारी परतीच्या बोलीवर परत घेतात.

बैलजोडी चांगली निघाल्यास उर्वरित रक्कम शेतकरी व्यापाऱ्यास देतात. असा हा दोघांच्या परस्पर विश्‍वासावर बाजार सुरू आहे. गावठी हल्लम, खिलार या बैलांना अधिक पसंती असून माळवी, जर्सी, सिन्नरी आदी बैलांचीही विक्री येथे होते.

नामपूर बैल बाजार

-एक लाखापासून ते ३.५० लाख रुपयांपर्यंत किमतीच्या बैलजोड्या उपलब्ध.

-दर बुधवारी (बाजार दिवस) १५ ते २० तर कायमस्वरूपी ५ ते ६ व्यापारी.

-सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बाजार कामकाज

-म्हैस, रेडा, शेळी, मेंढी, बोकड, गाय आदींचीही विक्री.

-व्यापाऱ्यांना बैल बांधण्यासाठी प्रति महिना एक हजार रुपये दराने भाडेतत्त्वावर चार शेड्‍स.

-काही गाळे, पाण्याची सुविधा. संरक्षित भिंत.

-प्रति बैल पाच रुपये प्रवेश शुल्क. सौदा झाल्यानंतर प्रति २ रुपये विक्री नोंद शुल्क घेतले जाते.

येथून येतात बैलजोड्या

जात... ठिकाण

-खिलार.. .काष्टी, पाथर्डी, वाळकी, लोणी (अ.नगर) बेल्हा (पुणे), बीड, कर्नाटक

-लाल कंधारी...परभणी, लातूर

-माळवी.. .सेंधवा, खेतिया (मध्य प्रदेश)

-गावठी हल्लम. .नाशिक, धुळे

बैल बाजार उलाढाल (रुपये)

वर्ष... उलाढाल...

२०१९-२०...६,३१,८६,०००

२०२०-२१...४,६५,३७,३००

२०२१-२२...४,७३,५८,७००

साडेतीन लाखांची विक्रमी बोली

शेतकऱ्यांचा नादच खुळा असे म्हटले जाते. त्याचे सर्जा-राजावर विशेष प्रेम असते. याचा प्रत्यय नामपूरच्या बाजारात आला. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच गाळणे (ता. मालेगाव) येथील चंद्रकांत सोनवणे या व्यापाऱ्याकडून पाडगण (ता. कळवण) येथील विष्णू बागूल या युवा शेतकऱ्याने पांढरीशुभ्र खिल्लार बैलजोडी साडेतीन लाख रुपयांना खरेदी केली.

ती पाहण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे, उपसभापती लक्ष्मण पवार, सचिव संतोष गायकवाड, उपसचिव अरुण अहिरे आदींच्या हस्ते बागूल यांचा सत्कार करण्यात आला. बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

संपर्क : संतोष गायकवाड, सचिव, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, मो. ९९२२७८७६७६

नामपूर बाजाराचे वेगळेपण म्हणजे येथे बैलजोडीत शेतकऱ्याची फसवणूक होत नाही. त्याला दिलेला शब्द पाळला जातो.
चंदू सोनवणे, बैल व्यापारी, गाळणे, ता. मालेगाव , ८८३०८६७१७४
पंचवीस वर्षांपासून बाजारात येत आहे. गावठी, खिलार असे जातिवंत बैल मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्‍वास निर्माण झाला आहे.
सुभाष वामन हारदे, बैल व्यापारी, वाळकी, जि. नगर मो. ९३२२२५८०७४
मनपसंत बैलजोडीचा शोध येथे संपतो. कोवळा तसेच कमी मारका व दात अशा बाबी पाहून बैलाला पसंती देतो. आपल्या ‘बजेट’नुसार येथे बैल पाहायला मिळतात.
रामचंद्र काळू शेवाळे, खामखेडा ९८६०६३५१०३
आमच्याकडे छोटे व हौशी शेतकरी खरेदीसाठी येतात. अनेक वेळा शेतकरी खूष होऊन बक्षिसापोटीही रक्कम देतात.
सलीम अन्सारी, बैल व्यापारी, मालेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT