मांजर्डे (ता. तासगाव) येथील विनायक मोहिते (Vinayak Mohite) यांनी मित्रांच्या साथीने २००६ मध्ये ‘कापूर अग्रणी मिल्क ॲड ॲग्रो प्रोसेसिंग’ ही छोटी संस्था उभारली. त्यातून मिळालेल्या यशातून २०१७ मध्ये ‘अग्रणी फूड्स ॲण्ड ॲग्रो कार्पोरेट’ ('Camphor Leading Milk and Agro Processing Company) या कंपनीची स्थापन केली. दूध संकलन, चिलिंग प्लॅन्ट ते दूध पावडर निर्मिती पर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पार केला. अग्रणी फूड्स या ब्रॅंडने २० राज्यांमध्ये दुग्ध उत्पादनांची विक्री केली जाते.
सांगली जिल्ह्यातील तासगाव हे द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनाचे माहेरघरच. नैसर्गिक आपत्ती असो वा कोणतेही संकट त्यावर जिद्दीने मात करण्याची इच्छाशक्ती इथल्या शेतकऱ्यांमध्ये आहे. तालुक्याच्या पूर्व भागात मांजर्डे गाव वसलेले आहे. गावातील शेतकरी द्राक्ष उत्पादनात माहिर आहेतच, शिवाय प्रत्येकाच्या दावणीला दुधाळ व जातिवंत जनावरे देखील आहेत. येथील विनायक राजाराम मोहिते यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने शेती जोपासली आहे.
व्यवसाय करणे हा हेतू कधीच मनाशी बाळगला नाही. आहे त्या परिस्थितीत आपले जीवन उत्तम चालू आहे, अशीच मोहिते यांची भावना होती. तरुणांनी एकत्र येऊन उद्योजक बनले पाहिजे, असे स्व. आर.आर. पाटील (आबा) यांनी म्हटले होते. त्यातूनच विनायक मोहिते यांनी उद्योग उभारणीचा विचार सुरु केला. परंतु, एकट्याने उद्योगाची सुरुवात करण्यापेक्षा मित्रांच्या साथीने एकत्रित व्यवसायाची उभारणी केल्यास उत्तमरीत्या मोट बांधता येईल, अशी भावना मित्रांसमोर बोलून दाखविली. पुढे शेतकरी मित्रांसोबत उद्योग उभारणीबाबत विचारविनिमय सुरु झाला. कोणत्या उद्योगाची उभारणी करावी आणि उद्योग कसा असावा यावर मंथन सुरु झाले.
दूध संकलनापासून सुरुवात ः
दरम्यान, गावात अपेक्षित दूध संकलन व्हायचे. हीच बाब ध्यानात घेऊन २००६ मध्ये कापूर अग्रणी मिल्क ॲड ॲग्रो प्रोसेसिंग प्रा. लि. या संस्थेची स्थापना केली. गावातच चिलिंग सेंटर उभे केले. गाव परिसरातील २० किमी अंतरावरून दुधाचे संकलन सुरु झाले. प्रक्रिया करून मोठ्या दूध संघांना दुधाची विक्री सुरु केली. व्यवसायात हळूहळू यश प्राप्त होऊ लागले. चिलिंग सेंटर सुरू करून १० वर्षे झाली होती. त्यातील बारकावे आणि इतर गोष्टी उमगत गेल्या. त्यामुळे चिलिंग सेंटर वाढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात चिलिंग सेंटरची संख्या वाढल्याने संघांना विक्री करूनही दूध शिल्लक राहू लागले. शिल्लक दुधाचे काय करायचे? असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून दूध पावडर निर्मितीचा मार्ग दिसला. त्यानुसार पावडर निर्मिती उद्योगाविषयी अभ्यास सुरु केला.
अभ्यासाअंती निर्णय ः
सन २०१६ मध्ये अग्रणी फूड्स ॲण्ड ॲग्रो कार्पोरेट या कंपनीची स्थापना केली. त्यासाठी तासगाव-आटपाडी राज्यमार्गालगत ४ एकर जागा खरेदी केली. मात्र, २०१६-१७ मध्ये राज्यातील अनेक दूध पावडर निर्मिती उद्योग बंद असलेले पाहिले. ते बंद पडण्यामागची कारणे, आलेल्या समस्या, उत्पादनाचा दर्जा इत्यादी बाबींचा अभ्यास केला. गोकूळ, वारणा, कन्हैया, इंदापूर, बारामती आणि हरियाना या ठिकाणी जाऊन दूध पावडर निर्मितीच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. दूध पावडर निर्मिती, पावडरचा दर्जा, टिकाऊपणा तसेच दुग्धजन्य पदार्थ निर्मिती इत्यादी सर्व बाबींचा अभ्यास केला. या उद्योगातील फायदे, तोटे यांचा सारासार विचार केल्यानंतर उद्योग उभारणीचे निश्चित केले.
दूध पावडर निर्मिती युनिटची उभारणी
दूध पावडर निर्मितीचे युनिट उभारण्याचे धाडस केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दुधाची उपलब्धता होती, चिलिंग सेंटर उभेच होते. मात्र, नवीन प्रकल्प उभारायचा म्हणजे मोठ्या रक्कमेची आवश्यकता होती. संस्थेतील प्रत्येकाने आर्थिक हातभार लावण्याचा निर्धार केला. प्रत्येकाने जमेल तशी आर्थिक मदत केली. २०१८ मध्ये तासगाव-आटपाडी राज्यमार्गावर पुनदी जवळ दूध पावडर निर्मितीचे युनिट उभारले. त्यासाठी दि. कर्नाटका बॅंक लि; शाखा सांगली यांचे अर्थसाहाय्य मिळाले. प्रकल्पासाठी आवश्यक सर्व अद्ययावत यंत्रसामग्री देश आणि परदेशातून खरेदी केली.
मार्केटिंगची व्यवस्था
कोणत्याही व्यवसायाची विक्री व्यवस्था ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. अभ्यासाअंती बाजारात मालाचा दर्जा हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे लक्षात आले होते. उत्पादनांचा दर्जा चांगला असला की विक्री व्यवस्था उभी करणे सोपे असते, ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून उत्पादन सुरु केले. प्रकल्प सुरु करण्यापूर्वी विविध ठिकाणी दिलेल्या भेटीतून देशातील विविध व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या नोंदी ठेवल्या होत्या. प्रत्यक्षात उत्पादन सुरु झाल्यानंतर व्यापाऱ्यासोबत संपर्क केला. त्यांनी सुरुवातीला थोड्या मालाची मागणी करून तपासणी केली. त्यांच्याकडून मालाची चव आणि दर्जा या वर चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यानंतर भक्कम विक्री व्यवस्था उभी होत गेली.
चिलिंग प्लॅन्ट ः
- सांगली जिल्ह्यात ः मांजर्डे, भिवघाट, जत, कुंभारी.
- सोलापूर जिल्ह्यात ः सांगोला, मंगळवेढा, वाकी, पंढरपूर.
व्यवसाय दृष्टिक्षेपात ः
- दररोज सुमारे दीड ते २ लाख लिटर दूध संकलन.
- दूध, दूध पावडर तपासणीसाठी अद्ययावत प्रयोगशाळा.
- उत्पादन (प्रतिदिन) ः १) दूध पावडर- १२ टन, २) तूप व बटर - ६ टन.
- दूध पावडर, बटर, तूप ही प्रमुख उत्पादने.
- अग्रणी फूड्स या नावे उत्पादनांची विक्री.
- देशातील २० राज्यात उत्पादनांची विक्री.
- उत्पादन निर्मिती ते पॅकिंगपर्यंत यांत्रिकरणाचा वापर.
- अन्न सुरक्षिततेतील एफएसएसएएआय परवाना प्राप्त.
ठळक बाबी ः
- प्रकल्पासाठी आलेला खर्च ः २५ कोटी
- खेळते भांडवल ः १० कोटी
- दूध वाहतुकीसाठी ४ ट्रॅंकर.
- १०० टन क्षमतेचे शीतगृह.
- ऑनलाइन विक्रीची व्यवस्था.
- २०० हून अधिक कर्मचारी कार्यरत.
संपर्क ः विनायक मोहिते, ९४२२६१३६४१
(संस्थापक, अध्यक्ष, अग्रणी फूड्स ॲण्ड ॲग्रो कार्पोरेट प्रा. लि. पुनदी, ता. तासगाव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.