Agritourism Success Story : कोल्हापूर हा ऐतिहासिक आणि उसाचा जिल्हा म्हणूच प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील अनेक स्थळे प्रसिद्ध असल्याने अभ्यासक, पर्यटकांची येथे कायमच रेलचेल असते.
पन्हाळा तालुक्यातील वारणा खोऱ्यात माले हे छोटेसे गाव वसले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची अखेरची भेट याच गावात झाल्याने त्यास वेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे.
याच गावात रघुनाथ चौगुले हे शेतकरी राहतात. त्यांची तीन मुलगे व दोन मुली म्हणजेच तीन भाऊ व दोन बहिणी यांनी एकत्र येऊन आपल्या साडेचार एकर क्षेत्रावर तारांकित दर्जाचे कृषी पर्यटन केंद्र साकारले आहे. शशिकांत, रमाकांत व कै. श्रीकांत हे चौगुले बंधू व संगीता भोसले, अर्चना पाटील अशी ही भावंडे आहेत.
...असा झाला पर्यटन केंद्राचा जन्म
चौगुले परिवाराची एकत्रित १२ एकर शेती आहे. त्यातील सहा एकरांत ऊस, एक एकर सोयाबीन आहे. कुटुंब प्रमुख रघुनाथ वृक्षप्रेमी आहेत. त्यांनी सन २००२ पासूनच एक झाड म्हणजे एक कुटुंब हे धोरण ठेवून झाडांची लागवड केली. ती जोपासली. तोच मंत्र मुलांना दिला. ज्या ठिकाणी झाडे लावली होती त्या ठिकाणी पाणी नव्हते.
एक किलोमीटरवरून घागर, कावडीने पाणी आणून सात वर्षांपासून असे कष्ट करून मुलांनी ही झाडे जगवली. वडिलांचे विचार जपले. सन २०१९, २०२० या काळात कोरोनाने हाहाकार उडवला. आणि याच संकटात चौगुले कुटुंबाला एका व्यवसायाची दिशा मिळाली. त्या वेळी शहरातील अनेक लोक गावी परतत होते.
काहींनी शेतात वास्तव्य केले. निसर्गाच्या सान्निध्यात ते राहू लागले. अशावेळी शशिकांत व रमाकांत यांचे दाजी राम भोसले व कृष्णात भोसले यांनी या चौगुले बंधूंना कृषी पर्यटन केंद्राचे महत्त्व सांगितले. इथून पुढील काळात त्यास कशी संधी आहे ते समजावून दिले.
कोरोना काळात शहरी लोकांनी अनुभवलेला निवांतपणा आपण पर्यटन केंद्राच्या रूपाने देऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या आपल्यालाही त्याचा फायदा होईल असा विचार मांडला. त्यानंतर सर्व भावंडे एकत्र आली आणि सर्वांच्या एकत्रित विचारातून पर्यटन केंद्राचा जन्म झाला.
...असे आहे पर्यटन केंद्र
शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवन व शेती संस्कृती, तेथील निसर्ग, आहारशैली आदींचा जिवंत अनुभव या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून देण्याचा चौगुले भावडांचा प्रयत्न आहे. ‘आठवण मातीची’ या नावाने हे केंद्र असून ‘आठवण मातीची, साठवण गोड क्षणांची’ अशी व्यवसायाची ‘टॅगलाइन’ तयार करण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र ज्योतिबा या प्रसिद्ध देवस्थानापासून सात किलोमीटर, तर निसर्गरम्य पन्हाळ्यापासून दहा किलोमीटर अंतरावर हे केंद्र वसले आहे फोंडामाळ असलेल्या या भागात चौगुले भावंडांनी हिरवाई आणली आहे.
सोयीसुविधा
काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेली केसर आंब्याची दीडशे ते दोनशे, तर चिकूची दीडशेपर्यंत झाडे येथे आहेत. झाडाच्या फांदीलाही धक्का न लावता लाकूड, बांबू, कोकणातील जांभ्या दगड, पाइनवूड आदींचा कल्पकतेने अधिकाधिक वापर करून पर्यावरणपूरक रचना व सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.
त्याच पद्धतीने निवासासाठी आठ खोल्या व एक डॉरमेटरी बांधली आहे. बांबू आसामहून आणला आहे. विविध ठिकाणी बाकडी, खेळांसाठी छोटे मैदान, स्वीमिंग पूल, मचाण, झोपाळे, नैसर्गिक धबधबा, गवताळ रचना, पेव्हिंग ब्लॉक्स आदींची बांधणी केली आहे.
तारांकित सुविधा देण्याचा प्रयत्न
रमाकांत म्हणाले, की शहरातील लोक खेडेगावात आले तरी शहरात असलेल्या काही तारांकित सुविधा इथेही मिळाव्यात अशी त्यांची इच्छा असते. त्यादृष्टीने आमच्या कृषी पर्यटन केंद्रातत्या देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. वातानुकूलित यंत्रणा, वायफाय आहे. अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी व मांसाहारी भोजनासहित नाश्त्याची सोय आहे.
त्यासाठी ‘हॉटेल मॅनेजमेंट’ पदवी घेतलेले सुमारे पंधरा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विविध विभागांचे मिळून २८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र केवळ त्यांच्यावर अवलंबून न राहता दोघे चौगुले बंधू चोवीस तास ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी सज्ज असतात.
ग्राहकांकडे स्वतः जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवितात. ‘फीडबॅक’ वा ‘कंप्लेट फॉर्म’देखील ठेवला आहे. मालक स्वतःच मदतीला येत असल्याने वेगळा स्नेह पर्यटकांमध्ये निर्माण होण्यास मदत झाली आहे.
प्रत्यक्ष शेतीकामांची अनुभूती
पर्यटन स्थळ टेकडीवर आहे. तेथून शेती परिसर सुमारे एक किलोमीटर आहे. तिथपर्यंत पायवाटेने पर्यटकांना नेण्यासाठी व पुन्हा स्थळापर्यंत आणण्यासाठी खास वाहनाची व्यवस्था केली जाते. आंबा, चिकू बागा तसेच वर्षभर केला जाणारा
विविध भाजीपाला, भुईमूग, सोयाबीन आदी
विविधता येथे पर्यटकांना प्रत्यक्ष अनुभवता येते. येथे छोटे छोटे प्लॉट तयार करून शेती केली जाते.
मशागत, पेरणी, कोळपणी- भांगलणी अशी जी जी शेतीकामे सुरू असतात त्यांचा अनुभव पर्यटकांना देण्यात येतो. शहरी लोकांसाठी ही वेगळी अनुभूती असते. पर्यटक आपल्या हाताने भाज्यांची तोडणीदेखील करतात.
हाच भाजीपाला स्वयंपाकासाठी वापरण्यात येतो. स्वतःच्या हातांनी तोडलेली भाजी खाण्याचा आनंद पर्यटकांना देण्यात येतो. या शेती व्यवस्थापनाच्या निमित्ताने गावातील स्थानिक मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला आहे. आंबा, चिकूची विक्री उपलब्धतेनुसार ग्राहकांना होते. तसेच बाहेरील बाजारपेठेतही माल विक्रीसाठी पाठवला जातो. येथील आंबा दुबईपर्यंत पोहोचला आहे.
जुन्या खेळांना संजीवनी
ग्रामीण भागात एकेकाळी लोकप्रिय असलेले मात्र आता लुप्त होत चाललेले विटीदांडूसारखे खेळ त्याचबरोबर क्रिकेटसह ‘इनडोअर’ खेळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्येष्ठांपासून लहानांपर्यंतचे सर्वांना विविध खेळांचा आनंद घेता येतो.
‘सेलिब्रिटीं’ची पसंती
येथील स्थळास विविध मान्यवरांनी भेट देऊन चौगुले कुटुंबाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. यात महेश मांजरेकर, प्रवीण तरडे, अशोक नायगावकर, हितेश मोडक आदींचा समावेश आहे. गुगल- वेबसाइट, इन्स्टाग्राम आदीच्या माध्यमांतून पर्यटन केंद्राचे ‘प्रमोशन’ केल्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
त्यातून वेस्ट इंडीज, न्यू यॉर्कमधील नागरिक येथे आले आहेत. शनिवारी- रविवारी नियमित बुकिंग असते. ‘माउथ पब्लिसिटी’ झाल्याने ‘रिपिटेड कस्टमर’ मिळत आहेत हेच आम्ही देत असलेल्या सेवेचे यश असल्याचे शशिकांत यांनी सांगितले. केंद्रामुळे माले गावाला देखील वेगळी ओळख मिळू लागली आहे याचा चौगुले कुटुंबीयांना आनंद आहे.
अलीकडील काळात आपल्या शेतीच्या जागेतील एक इंच देखील कोणी कोणाला देत नाही. बांधावरून कलह तयार होतात. मात्र आमच्याबाबत असे घडले नाही. आमच्या भावकीतील सदस्यांनी दाखविलेला उदारपणा निश्चितच आदर्शवत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज पूर्वीसारखी घरची एकी राहिलेली नाही. सर्व भाऊ, बहिणी मालमत्तेतील आपापले वाटे मागतात. पण आमच्या इथे आम्ही भाऊ- बहिणी एकत्र येऊन व्यवसायाची उभारणी केली ही देखील आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीत निराश होण्याची काहीही गरज नाही. कृषी पर्यटन हा त्यांच्यासाठी खरोखरच उत्पन्नाचा चांगला स्रोत होऊ शकतो. शिवाय हा व्यवसाय तारांकित दर्जाचा करणे हे आमचे उद्दिष्ट होते. आणि त्याच दिशेने पुढील प्रयत्नदेखील आहेत.शशिकांत चौगुले
भावकीने केले सहकार्य
कृषी पर्यटन केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे एक किलोमीटरचा मार्ग आहे. तो तयार करण्यासाठी चौगुले परिवारातील भावकीने मोठे सहकार्य केले. त्यांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय वाट तयार करण्यासाठी जागा दिली. इतकेच नव्हे तर स्वतः सर्व सहकार्य केले.
याशिवाय अनेक मित्रमंडळीनी या प्रयत्नाला बळ दिल्याचे चौगुले बंधूंनी सांगितले. केंद्र उभारणी करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च आला. त्यासाठी कुटुंबीयांतील सदस्यांची आयुष्याची पुंजी पणाला लावली. मात्र भावाबहिणींची एकी व शेतीविषयक तळमळ यामुळे पैसा ही गोष्ट अडसर ठरली नाही.
शशिकांत चौगुले ९०९६१६४७४२, रमाकांत चौगुले ८३२९३१९५९४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.