
Pune News : ‘‘महसूल विभाग हा सरकारचा कणा आहे. त्यामुळे नियमात न बसणारे काम होणार नसल्याचे तुम्ही लोकांना सांगा. मात्र सरकारी कामासाठी जनतेला कार्यालयात हेलपाटे मारण्यास लावू नका. माझी तुम्हाला विनंती आहे,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे कान टोचले.
विभागीय आयुक्तालयात आयोजित केलेल्या महसूल सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर महसूल आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त महसूल आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार चेतन दुपे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकर मांडेकर तसेच इतर मान्यवर होते.
जरा अंतर्मनाला विचारा
महसूल दिनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. लोकांची कामे जलद होण्यासाठीच पुण्यात ‘टॉप’चे अधिकारी आणण्याचा माझा प्रयत्न असतो. हेलपाटे न मारता काम व्हावे, हेच लोकांना अपेक्षित असते. काम नियमात न बसणारे असेल तर नागरिकाला सांगायला हवे. परंतु त्याला हेलपाटे मारण्यास लावू नये. मी स्वतः कडक आहे. मात्र चांगल्या अधिकाऱ्यांच्या मागे मी उभा असतो आणि त्यांचे कौतुकपण करतो.
पुण्यातील अधिकाऱ्यांचे काम जलद, पारदर्शक, उत्तम असते, असे आधीच्या भाषणात अधिकाऱ्यांनी सांगितले. ते ऐकून मी अचंबित झालो. कारण हे खरे आहे की नाही, हे तुम्हीच जरा अंतर्मनाला विचारा. अधिकाऱ्यांना चांगल्या सेवासुविधा मिळायला हव्यात. मात्र तुम्ही देखील जनतेची कामे वेळेत आणि काही अपेक्षा न ठेवता केली पाहिजे. अमुक अधिकाऱ्याने जमीन घेतली, असे ऐकू येत असते. उद्या ईडी, आयकरवाले आले तर काय उत्तर देणार आहात? तुम्ही चुकाच करू नका. तुमच्या विभागाची व सरकारची बदनामी होऊ देऊ नका.’’
उपमुख्यमंत्र्यांचा आदर्श घ्यावा
महसूल आयुक्त श्री. पुलकुंडवार म्हणाले, ‘‘लोकांना महसूल सेवा जलद देण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. महसूल कर्मचारी राज्य शासनाचा चेहरा असतो. त्यामुळे जनतेची कामे पारदर्शक व तत्परतेने करावीत. तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अधिकाऱ्याने लोकांना भेटून समस्या सोडवाव्यात. कामात पारदर्शकता असावी, पण संदिग्धता नसावी. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपले आदर्श आहेत. ते काम होईल की नाही, हे लगेच सांगत असतात.’’
बदल्यात पैसे घेतल्याचे सांगावे
सरकारी कामकाजात तुम्हाला पारदर्शकता दाखवावी लागेल. हात अडकला म्हणून लोकं हेलपाटे मारतात. त्यानंतर देवघेव झाल्यावर लोकं सांगत असतात. मी माझ्या ३५ वर्षांच्या राजकीय जीवनात असंख्य बदल्या केल्या. मात्र अजित पवाराला बदलीसाठी पैसे दिल्याचे कोणत्याही ‘माय का लाल’ने उठून सांगावे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.