Agri Tourism Center : पालघरमधील निधी गावड यांनी नारळ, सुपारीच्या बागेत साकारले कृषी पर्यटन केंद्र

Agri Tourism In Palghar : वडराई (ता. जि. पालघर) येथील निधी गावड यांनी आपल्या १४ एकरांत फळे- फुलपिके व अन्य झाडांची समृद्धी व विविधता विकसित केली आहे. समुद्रकिनारी असलेल्या या जागेचा पुरेपूर वापर करीत या बागेचे रूपांतर त्यांनी कृषी पर्यटन केंद्रात केले आहे. शेतीसह या पूरक व्यवसायातून आर्थिक प्राप्ती, स्थानिकांना रोजगार देण्यासह जीवनात समाधान व आनंदही मिळविला आहे.
Agri Tourism Center
Agri Tourism CenterAgrowon

बाळासाहेब पाटील

Success Story In Palghar : पालघर हा निसर्गाने संपन्न असलेला, चिकूचे माहेरघर व अन्य फळफळावळे - भाजीपाला यांच्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे.. येथून सुमारे १० किलोमीटर अंतरावर वडराई येथे मुख्य रस्त्यापासून थोडे आत गेले की निधी व निखिल या गावड दांपत्यांची १४ एकरांत समुद्रकिनाऱ्यापासून जवळ वसलेली समृध्द बाग ( वाडी) दृष्टीस पडते. त्यांनी कृषी पर्यटन केंद्रही विकसित केले आहे.

सध्या शेती व पर्यटन केंद्राची सर्व जबाबदारी निधीच पाहतात. त्या मूळच्या नाशिकच्या. त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. मुंबई हे त्यांचे सासर आहे. वडराई येथील सासरची ही बाग त्यांनी चिकाटीने व मेहनतीने सांभाळली. मोठी केली. पतीचीही त्यांना समर्थ साथ असते. या बागेत एक हजार नारळ, ४०० सुपारी, ७० हून अधिक आंब्याची झाडे आहेत.

चिकूची २० तर काही फणसाची झाडे आहेत. जास्वंदीचे पिवळा. जांभळा. लाल असे २५ हून अधिक प्रकार आहेत. रिठा, कडुनिंब, बांबूचे प्रकार, रूद्राक्ष, चाफा, बकुळीसारख्या वनस्पती आहेत. सफेद वेलची, लाल केळी, भूर केळी (गोड) व भाजीची केळीही बागेत आहेत. पपईची २० ते २५ झाडे आहेत.

बागेतील व्यवस्थापन

१४ एकर बागेची निगा राखणे, पाणी देणे आणि समुद्राकाठी जमीन असल्याने गोडे पाणी उपलब्ध करणे आव्हान होते. बागेला आधी पाटाने पाणी दिले जायचे. पण कमी मनुष्यबळात काम करण्यासाठी स्प्रिंकलर बसविले. तीन विहिरी खणल्या.

त्यामुळे गोड्या पाण्याचा प्रश्न मिटला. या विहिरींतील पाणी केवळ बागेसाठीच वापरले जात नाही तर यात कोळंबी आणि अन्य मासे सोडून त्यांचे संगोपन व विक्रीही केली जाते. रासायनिक निविष्ठांचा खूप कमी वापर केला जातो. चार ते पाच गायी- बैल असे पशुधन असून शेण आणि गोमूत्रापासून तयार केलेले खत बागेला वापरले जाते.

Agri Tourism Center
Agri Tourism : कृषी पर्यटनातील संधीच्या प्रसारासाठी होणार प्रयत्न

कृषी पर्यटनात रूपांतर

शेती फायद्याची करायची असेल तर जोड व्यवसाय असणे गरजेचे आहे. तो खुबीने केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळवून अर्थकारण सशक्त करता येते हे गावड दांपत्याला उमगले. आपली बाग समुद्रकिनारी असल्याची पुरेपूर नामी संधी शोधून बागेचे रूपांतर त्यांनी कृषी पर्यटन केंद्रात केले आहे.

त्यातून शेतीला हा पूरक व्यवसाय जोडून अर्थकारण सक्षम केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे त्यांचे केंद्र नोंदणीकृत आहे. पर्यटकांसाठी नैसर्गिक वातावरणात पाच खोल्या तयार केल्या आहेत. त्या समुद्रकिनारी असल्याने अथांग समुद्राच्या उधाणलेल्या लाटा अंगावर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येतात. विशेषतः शनिवारी, रविवारी गर्दी जास्त असते.

शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहली देखील येथे येतात. पर्यटकांना घरगुती जेवण दिले जाते. मसाले, लोणचे, तूपही घरचेच असते. शेतातील भाजीपाला जेवणासाठी वापरला जातो. मासे खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी विहिरीतील मासे काढून त्यावर आधारित पदार्थ तयार केला जातो.

लग्ने, वाढदिवसही येथे साजरे होतात. नैसर्गिक साबण- तेल निर्मिती बागेतील विविध औषधी वनस्पतींचा वापर करून निधी यांनी घरच्या घरी नैसर्गिक साबण आणि तेल उत्पादने तयार केली आहेत. यात कोरफड, गुलाब, शिकेकाई, रिठा, नारळ दूध, मध आदींचा वापर करून साबण तर रिठा, वडाच्या पारंब्या, जास्वंदी, गुलाबाची फुले यापासून तेल तयार केले आहे.

नारळाच्या करवंटीपासूनही चारकोल साबण तयार केला आहे. आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेल्या या साबणांना मुंबईसह अन्य ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांची मागणी आहे. यातून गावड कुटुंबीय चांगले आर्थिक उत्पन्नही मिळवतात.

Agri Tourism Center
Agri Tourism Center : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गजानन कुडाळकर यांचे कोकण हेरिटेज कृषी पर्यटन केंद्र

मुलींचे उच्चशिक्षण

निधी या मुंबईत वाढलेल्या. त्यांना शेतीचा अनुभव नव्हता, पण पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत पतीसह त्यांनी शेतीचा अनुभव घेण्यास सुरवात केली. आज वीस वर्षांहून अधिक काळ त्या शेती व पर्यटन व्यवसायात रमल्या आहेत. त्यांना सासरचाही चांगला पाठिंबा असतो.

मुंबईची बाजारपेठ जवळ आहे. तसेच नारळ, सुपारी, आंबा आदी शेतमाल व्यापाऱ्यांना दिला जातो. शहाळ्यांची पर्यटकांना विक्री होते. गावड दांपत्याने आपल्या मुलींनाही याच शेती व व्यवसायाच्या जोरावर चांगले शिक्षण दिले आहे. मोठी मुलगी जबलपूर आयआयटी येथे तर दुसरी मुलगी उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहे.

संपर्क - निधी गावड- ९५०३००४९४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com