Flower Farming Agrowon
यशोगाथा

Flower Farming : कोकणात झेंडू, लिली, कागडा बहरला

Team Agrowon

राजेश कळंबटे

Marigold Flower Farming : कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह दिवाळीच्या सणापेक्षाही अधिक असतो. कोकणातील बाजारपेठेतील फुलांची विशेषतः अशा सणांच्या काळातील गरज लक्षात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांकडूनही फुलशेतीला चांगली चालना मिळाली आहे. झेंडू, लिली, कागडा यांसारख्या फुलांची लागवड करून शेतकरी नगदी पैसा मिळवू लागले असून, त्यातून त्यांचे अर्थकारण उंचावण्यास मदत मिळाली आहे.

कोकणासाठी सर्वांत मोठा, किंबहुना दिवाळीपेक्षा अधिक उत्साहाचा सण म्हणजेच गणेशोत्सव. गणपती पूजनासाठी झेंडू, लिली, शेवंती, ॲस्टर आदी फुलांना हारांसाठी मोठी मागणी असते. मागणीनुसार हारांचा आकार असतो. सार्वजनिक मंडळांच्या गणपती मूर्ती मोठ्या असल्याने दहा फुटांहून अधिक उंचीच्या हारांना चांगली मागणी असते. अलीकडील काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमधून झेंडू लागवड होताना दिसत आहे.

गणेशोत्सव काळात रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत दिवसाला सात ते आठ टन झेंडूची गरज भासते. या ठिकाणी सुमारे ३५ आठ फूल विक्रेते आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडून दोन टनांपर्यंत पुरवठा होतो. गुहागर तालुक्यातील शुंगारतळी येथेही छोट्या प्रमाणात फुलबाजार भरतो. येथे सणाच्या काळात स्थानिक शेतकऱ्यांनी पिकविलेला सुमारे आठशेहून अधिक किलो झेंडू विक्रीस येतो. या फुलशेतीतून येथील शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ मिळून अर्थार्जनाचे साधन मिळत आहे.

फुलशेती ठरतेय फायदेशीर

रत्नागिरी जिल्ह्याचे भात हे प्रमुख पीक आहे. परंतु सण-समारंभ व उत्सवांची स्थानिक मागणी लक्षात घेता कोकणातील शेतकऱ्यांनी फुलशेतीवरही भर दिला आहे. खरिपात दोन गुंठ्यांपासून ते एक एकरपर्यंत त्याचे क्षेत्र असते. मळण येथील मनोहर आणि विलास हे साळवी बंधू बाजारातील मागणी लक्षात घेऊन सन २०१८ मध्ये झेंडू पिकाकडे वळले. कृषी विभागाचे अधिकारी गजेंद्र पौनिकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. पाचशे रोपांपासून त्यांनी सुरुवात केली.

कराड (जि. सातारा) येथे जाऊन त्यांना कोलकाता जातीची रोपे आणावी लागत. शुंगारतळी बाजारात १०० रुपये प्रति किलो दर मिळाल्यानंतर त्यांना या प्रयोगातील हुरूप वाढला. त्यानंतर एक हजार रोपे लागवड व यंदा तीन हजार रोपांची लागवड त्यांनी केली आहे. पावसाळ्यात रोपांचे नुकसान होऊ नये म्हणून पॉली मल्चिंगचा प्रयोग त्यांनी केला.

यंदापासून वाफे तयार करून रोपे निर्मिती त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे रोपे आणण्यासाठी कराडला जाण्याचा दरवर्षीचा सुमारे तीन हजार रुपये खर्च कमी केला आहे. पूर्वी नांगरणीसाठी भाडेतत्त्वावर पॉवर टिलर आणावा लागे. आता कृषी विभागाकडून अनुदानावर तो घेतला आहे. स्वतःसाठीच्या तीन हजार रोपांसोबत गावातील अन्य शेतकऱ्यांनाही सात हजार रोपे साळवी यांनी तयार करून दिली आहेत. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळवले आहे.

यंदा गणेशोत्सवात चांगला दर

साळवी यांचे गाव शुंगारतळी बाजारपेठेपासून एक किलोमीटरवर आहे. ते फूल उत्पादक आणि विक्रेतेदेखील आहेत. त्यांच्यासहित येथे व्यावसायिकांची संख्या आठपर्यंत आहे. या वर्षी गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच झेंडू येईल असे नियोजन ठेवून जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली. जुलैमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही रोपांची मर झाली. तीन हजार रोपांपैकी अडीच हजार रोपांना फुले धरली आहेत.

यंदा गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी १५० रुपये प्रति किलो दराने १०० किलो फुलांची विक्री त्यांनी केली. गणेशोत्सवाच्या कालावधीत सरासरी ५०० किलोपर्यंत फुलांची विक्री व ३० ते ४० हजार रुपये नफा असा मागील अनुभव आहे. यंदा दर अधिक असल्यामुळे उत्पन्न त्याहून अधिक मिळेल अशी अपेक्षा आहे. भात, नाचणी या नियमित पिकांमध्ये आता झेंडूची भर पडली
आहे. चार वर्षांपासून हे पीक आम्हाला नगदी उत्पन्न देत आहे.

रब्बी हंगामात भाजीपाला आणि कलिंगड लागवड असते. काळानुसार बदलती पीक पद्धती फायदेशीर ठरते. फुलशेतीही कोकणातील शेतकऱ्यांसाठी अर्थार्जनाचे चांगले साधन होऊ शकते असे साळवी अनुभवातून सांगतात.

लिली, कागडाची लागवड

जिल्ह्यातील कसोप येथील तरुण शेतकरी चेतन साळवी यांच्या शेतामधून दरवर्षी लिली, कागडा यांसारखी फुले विक्रेत्यांना पुरवली जातात. स्थानिक बाजारांमध्ये गजरा आणि हारांसाठी या
फुलांना मोठी मागणी असते. गणेशोत्सवात ती सर्वाधिक होते. बाजारातील मागणी लक्षात चेतन यांचे वडील सुहास यांनी काही वर्षांपूर्वीच फुलशेतीला सुरुवात.

सात गुंठे क्षेत्रावर कागडा, तर २० गुंठ्यांवर त्यांची लिली आहे. दिवसाला लिलीच्या ४० गड्ड्या मिळतात. प्रति गड्डीला १२ ते १५ रुपयांपर्यंत दर मिळतो. कागड्याचे फूल पांढऱ्या रंगाचे असून, उत्सवांमध्ये महिला वर्गाकडून त्यास प्रचंड मागणी असते. श्रावणानंतर या फुलांचा बहर सुरू होतो. ही फुले प्रति किलो साधारण २०० रुपये दराने, तर गजरा वीस रुपयांना विकला जातो.

फुले व हार विक्री

निखिल पवार यांचा रत्नागिरी येथील कुवारबाव येथे फुले आणि हार विक्रीचा व्यवसाय आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत त्यांच्याकडे दिवसाला २०० किलो याप्रमाणे फुलांची विक्री होते. हारांना लागणारा झेंडू कोल्हापूरसह रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्‍वर, मजगाव, पावस, कोतवडे यांसारख्या गावांमधून अशा व्यावसायिकांना पुरवला जात आहे.

यंदा झेंडूचा खरेदी दर किलोला ८० ते ९० रुपये असून ग्राहकांना तो १५० रुपये किलोने विकला जात आहे. झेंडू, लिलीपासून बनवलेले हार १० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत दराने विकले जातात. या हारात एक फूल झेंडूचे व त्याखाली आडवे लिलीचे फूल अशी रचना असते. निखिल म्हणाले, की गणेशोत्सवात लिलीच्या फुलांचा दर ७० रुपये प्रति गड्डी आहे.

प्रति गड्डीत ४० फुले असतात. अ‍ॅस्टरची १० फुलांची गड्डी असून, ती १० रुपयांना मिळते. फुलांच्या विक्रीपेक्षाही हार बनवून त्यातून फायदा अधिक मिळतो. साधारणपणे चाळीस टक्के फायदा या व्यवसायात आहे. मात्र पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. या वर्षी वातावरणातील बदलांचा परिणाम म्हणून लिलीचा स्थानिक शेतकऱ्यांकडील माल कमी आहे.

नेहमीच्या ७० गड्ड्यांऐवजी २० गड्ड्यांवरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे उर्वरित माल कोल्हापूरहून मागवावा लागला आहे. हारामध्ये लागणाऱ्या शेवंतीच्या फुलांना किलोला १८० रुपये मोजावे लागतात. तर गुलाबाचा दर ३२० ते ४०० रुपये प्रति किलो आहे. प्रति किलोत लहान मोठी मिळून सुमारे १०० ते १२५ फुले बसतात. दोन वर्षांपूर्वी झेंडूचा कमाल दर तीनशे रुपयांच्या पुढे
पोहोचला होता. यंदा दर आटोक्यात असल्याने निखिल यांनी सांगितले.

मनोहर साळवी, ७८२१८६२८४१
निखिल पवार, ७३८७४४४२४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT