Sheep Wool Products  Agrowon
यशोगाथा

Sheep Wool : मेंढीच्या लोकरीपासून दर्जेदार उत्पादनांची निर्मिती

Sheep Wool Fabrics : शेळी-मेंढी संवर्धन व लोकरीवर आधारित उत्पादने निर्मितीसाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ ही संस्था राज्यात ४६ वर्षांपासून अव्याहत कार्यरत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sheep Wool Products : सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ हा दुष्काळी तालुका आहे. तालुक्यात रांजणी हे प्रसिद्ध गाव आहे. गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रत्येक कुटुंबातील एक जण तरी देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर उभा आहे. त्यामुळे ‘मिलिटरीचे रांजणी’ अशी ओळख निर्माण झाली आहे. याच गावात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ कार्यरत आहे. संस्थेची राज्यभरात १० प्रक्षेत्रे असून, त्यातील रांजणी हे प्रमुख असून त्याचे क्षेत्र ७१५ हेक्टर आहे.

संस्थेची सन १९७८ मध्ये स्थापना झाली असून सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात कार्यक्षेत्र आहे. संस्थेचे आजगायत ४६ वर्षांपासून अव्याहतपणे कामकाज सुरू असून, त्याचा विस्तार सुरू आहे. रांजणी येथील प्रक्षेत्रात उस्मानाबादी शेळी व माडग्याळ मेंढींचे संगोपन व संवर्धन केले जाते. शेळ्या १०७५, तर मेंढ्या ५२२ अशी एकूण १५९९ संख्या आहे.

उत्पादनांची निर्मिती

डॉ. सचिन दडस रांजणी प्रक्षेत्राचे व्यवस्थापक आहेत. संस्थेतर्फे शेतकऱ्यांना शेळी-मेंढी पालन, प्रथमोपचार, कृत्रिम रेतनासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाते. गांडूळ खत, खाद्याची विक्री केली जाते. यापुढे जाऊन लोकरीवर उत्पादनांची निर्मिती करणे हे संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

पारंपरिक हातमाग व चरखा यांचा वापर करून चादर, उशी, सतरंजी, जेन, घडीचे जेन, उशी, चेअर कार्पेट, आसन आदी बाराहून प्रकारची उत्पादने संस्थेने तयार केली आहेत. पुणे येथे (गोखले नगर) संस्थेचे मुख्यालय आहे. या ठिकाणी असलेल्या लोकर उपयोगिता केंद्राद्वारे आधुनिक यंत्रांच्या साह्याने मफलर, शाल, घोंगडी आदींची निर्मिती केली जाते.

उत्पादन निर्मितीतील बाबी

उत्पादनांच्या निर्मितीतील लोकर हा मुख्य घटक असून प्रक्षेत्रातील मेंढ्यांपासून वर्षातून ती दोन वेळा काढण्यात येते. परंतु ती पुरेशी ठरत नाही. त्यामुळे स्थानिक मेंढपाळांकडून काळी लोकर ३५ रुपये, तर मिश्र लोकर ३० रुपये या शासकीय दराने खरेदी केली जाते.

वर्षाकाठी मेढपाळांकडून सुमारे ५ ते ६ हजार किलो लोकरीची खरेदी होते. चादर तयार करण्यासाठी ५० टक्के लोकरीचे, तर उर्वरित ५० टक्के सूत कपाशीचे लागते. कपाशीचे सूत सांगलीहून निविदा पद्धतीने घेण्यात येते. प्रक्षेत्रातील लोकर राजस्थानात पाठवून तेथून विविध रंगांचे सूत तयार करून घेण्यात येते.

लोकरीच्या गुणवत्तेची तपासणी

केंद्रीय लोकर विकास मंडळाकडे (जोधपूर) संस्थेकडून लोकरीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने केसांची जाडी, चकाकी, लांबी, रुंदी, ‘मेड्युलेशन’ टक्केवारी, कुरळेपणा आदी निकषांचा समावेश असतो.

ही लोकर धाग्यांसाठी योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतर धागा तयार करण्याचे नियोजन केले जाते. दर्जेदार लोकरीचा वापर केल्याने उत्पादनांची गुणवत्ताही तेवढीच सरस व टिकाऊपणाही चांगला असतो.

बाजारपेठ

सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई या शहरांमधील कृषी, खादी ग्रामोद्योग तसेच अन्य प्रदर्शनांमधून संस्था सहभाग घेते. पुण्यश्‍लोक नावाचा ब्रॅंड तयार केला आहे. प्रक्षेत्राला अनेक जण भेटी देतात. त्यांच्या माध्यमातूनही उत्पादनांची विक्री होत असते. प्रक्षेत्रावर पाच- सहा लाखांपर्यंत तर महामंडळाची एकूण २५ ते ३० लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल होते.

पुणे येथेही विक्री केंद्र उभारले असून, राज्यभरातील प्रक्षेत्रांनाही पुरवठा होतो. प्रकारानुसार सातशे, एक हजारांपासून ते तीनहजार रुपयांपर्यंत उत्पादनांचे दर आहेत. सन २०२१ पासून ते यंदाच्या वर्षापर्यंत दरवर्षी साडेतीनशे पासून ते सव्वासहाशे या प्रमाणात उत्पादनांची विक्री झाली आहे.

मेंढी उत्पादकांना लाभ

जोधपूर येथील केंद्रीय लोकर विकास मंडळाकडून १०० टक्के अनुदानावर लोकर सुधार हा कार्यक्रम सुरू झाला. सन २०१८ पासून रांजणी येथील प्रक्षेत्रावर तो राबवण्यात आला. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील मेंढपाळांकडून ५० हजार मेंढ्या प्रक्षेत्राने दत्तक घेतल्या. या मेंढ्यांची वाढ चांगली व्हावी, पर्यायाने लोकर दर्जेदार मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले.

यात संतुलित पशुखाद्य, खनिज मिश्रणे, लसीकरण-प्रथमोपचाराची औषधे पुरविण्यात आली. प्रक्षेत्रावर उत्पादित जातिवंत मेंढा नर मेंढपाळांना शंभर टक्के अनुदानावर देण्यात आला. जातींची आनुवंशिक शुद्धता टिकून राहावी असाही प्रयत्न करण्यात आला.

प्रशिक्षण, रोजगार निर्मिती

भिलवडी (ता. पलूस), ढालगाव (कवठेमहांकाळ), व्हसपेठ (जत), करगणी (आटपाडी) अशा परिसरातील गावांमधील ५० हून अधिक कुशल कारागिरांकडून उत्पादने तयार करून घेतली जातात. उत्पादनाच्या प्रकारानुसार मजुरी देण्यात येते. एक महिना कालावधीच्या लोकरीपासून विणकामासंबंधी प्रशिक्षणाची सुविधा आहे.

सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुक तसेच महिला बचत गटातील महिलांनीही त्याचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला त्यातून आर्थिक आधार प्राप्त झाला आहे.

लोकरीच्या धाग्यापासून तयार झालेली उत्पादने नैसर्गिक- देशी असल्याने कृत्रीम वस्त्रांच्या तुलनेत त्यांना ग्राहकांकडून चांगली पसंती आहे. अनेक ग्राहक आमच्याकडे फोनद्वारेही मागणी नोंदवत असतात. संस्थेच्या उलाढालीत वृद्धी होत आहे.
डॉ. सचिन दडस, ८३२९३९८३६९ (महामंडळ प्रक्षेत्र व्यवस्थापक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT