Desi Cow Agrowon
यशोगाथा

Indigenous Cow : देशी गोवंश संवर्धनाचा आदर्श सांगणारे माळसोन्ना

Desi Cow : परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना हे गाव लाल कंधारी व देवणी या प्रसिद्ध देशी गोवंशांच्या पालनासाठी व संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे.

माणिक रासवे

Desi Cow Conservation : परभणी आणि पूर्णा या दोन तालुक्यांच्या सीमेवर माळसोन्ना (जि. परभणी) गाव आहे. शिवारात खोल, काळी जमीन असून, जवळून गोदावरी नदी वाहते. पैठण येथील जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात गाव येत असले, तरी धरण दरवर्षी नियमित भरत नाही.

शिवाय कालव्याच्या टोकाकडे गाव असल्याने पुरेसे पाणी मिळण्याची खात्री नाही. खरिपात सोयाबीन, तूर, ज्वारी तर रब्बीत ज्वारी, गहू ही गावची प्रमुख पिके आहेत. हळद, भाजीपालाही गावच्या शिवारात फुलतो. पावसाच्या अनियमित वितरणामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पन्नाची खात्री नसते. त्यामुळे पूरक व्यवसाय करण्याकडे त्यांचा ओढा असतो. त्यातूनच गावातील अनेक शेतकरी पशुपालनाकडे वळले आहेत.

देशी गोवंश पालनाची प्रेरणा

भारतीय किसान संघाचे कार्यकारिणी सदस्य तथा प्रदेश संघटनमंत्री (महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात) दादा लाड यांचे माळसोन्ना हे मूळ गाव आहे. त्यांची प्रेरणेतून व मार्गदर्शनातून २००० मध्ये सचिन लाड लाल कंधारी या देशी गोवंश पालनाकडे वळले. ही जात मराठवाड्यातीलच उगमस्थान असून शेतीकामे व दुधासाठीही उपयुक्त आहे.

एकाची प्रेरणा दुसरा घेतो आणि ती मालिका पुढे सुरू राहते. तेच माळसोन्नात झाले. सचिन यांच्या पाठोपाठ अनंता लाड, बळिराम लाड यांच्या गोठ्यातही देशी गाय दिसू लागली. आजच्या घडीला गावातील प्रत्येकाकडे एक तरी देशी गोवंशाची बैलजोडी आणि गाय आहे. लाल कंधारीचे प्रमाण त्यात सर्वाधिक आहे.

दोन वर्षांपासून वळूच्या आधारे नैसर्गिक रेतनाचा कार्यक्रम अन्य गावांमध्ये सुरू आहे. त्यातून माळसोन्ना परिसरातील २० ते २५ गावांमध्ये देवणीसह लाल कंधारी गोवंशाचा प्रसार झाला आहे. परभणी जिल्ह्यासह शेजारील नांदेड, लातूर, बीड आदी जिल्ह्यांतील पशुपालक नैसर्गिक रेतनासाठी माळसोन्ना येथे वाहनांव्दारे गायी घेऊन येतात.

खाद्याकडे विशेष लक्ष

पशुधनाच्या खाद्याविषयी बोलायचे तर ज्वारीचा कडबा, सोयाबीनचे कुटार, भुईमुगाचा पाला आदी सुका चारा तर मका, गजराज गवत, कडवळ आदी हिरव्या चाऱ्याचा समावेश असतो. त्यसाठी तारा पिकांच्या लागवडीचे नियोजनही शेतकरी करतात. हरभरा चुरी, शेंगदाणा व सरकी पेंड या खाद्याचाही समावेश असतो. गोऱ्ह्यासाठी भरपूर दूध ठेवले जाते. तो दीड ते दोन वर्षे वयाचा झाल्यानंतर वळू म्हणून रेतनासाठी त्याचा वापर सुरू केला जातो. त्याच्या आहाराकडेही विशेष लक्ष दिले जाते. त्यांना बसण्यासाठी दावणीजवळ रबरी मॅट अंथरलेल्या असतात.

प्रदर्शनांमध्ये गौरव

नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा तसेच राज्य, जिल्हास्तरीय विविध प्रदर्शनांमध्ये माळसोन्ना येथील पशुधनाचा सहभाग असतो. येथील शेतकऱ्यांनी प्रदर्शनात रोख स्वरूपाची पारितोषिके पटकावली आहेत. प्रातिनिधिक उदाहरणे द्यायची, तर यंदा परळी वैजनाथ (जि. बीड) येथे कृषी विभागाच्या राज्यस्तरीय प्रदर्शनात सचिन लाड यांच्या देवणी कालवडीस द्वितीय पारितोषिक (रोख १५ हजार रु.) मिळाले.

तर पशुसंवर्धन विभागातर्फे शिर्डी येथील ‘महापशुधन एक्स्पोमध्ये (मार्च २०२३) अनंत लाड यांच्या लाल कंधारीला (नर) वासरू प्रवर्गात प्रथम पारितोषिक (चॅम्पियन) (५१ हजार रु.) मिळाले. बळिराम लाड यांच्या लाल कंधारीसही द्वितीय (२१ हजार रु.) पारितोषिक मिळाले. पारितोषिकाची रक्कम शेतकरी पशुधनाच्या संगोपनावरच खर्च करतात.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

माळसोन्ना येथे पशुसंवर्धन विभागाचा पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी २) आहे. पशुवैद्यकीय पर्यवेक्षक डॉ. रूपेश कलाल येथे कार्यरत आहेत. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, तालुका पशुधन विस्तार अधिकारी डॉ. अजय धमगुंडे यांच्यासह परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते.

नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने आदी तज्त्रांनाही गावाला भेट देऊन येथील देशी गोवंशाची पाहणी केली आहे.

टॅंकरमुक्ती साधली

गावाचा जल वापर निर्देशांक एकपेक्षा कमी असल्याने असुरक्षित स्थिती होती. उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये माळसोन्नाची निवड झाली. वार्षिक पर्जन्यमान, उपलब्ध होणारे पाणी, गावाची पिण्याच्या पाण्याची व शेतीची गरज, मृद- जलसंधारणाच्या कामांमुळे निर्माण होणारा अतिरिक्त पाणीसाठा असा सर्व ताळेबंद मांडण्यात आला. त्यानंतर पाझर तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. तलावाचे पुनरुज्जीवन केले. त्यातून पाणीसाठवण क्षमता तसेच सिंचन स्रोतांची पाणीपातळी वाढली.

नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील राजाच्या नावावरून लाल कंधारी गोवंशास नाव पडले आहे. नांदेड, परभणी, लातूर, बीड जिल्ह्यांमध्ये या पशुधनाची संख्या जास्त असली, तरी अन्य जिल्ह्यातही प्रसार झाला आहे. देवणी हा मराठावाडा तसेच कर्नाटक, तेलंगण राज्यातील सीमावर्ती भागात आढळून येणारा व ओढकामे व दूध अशी दुहेरी उपयुक्तता असलेला गोवंश आहे. त्याचे वानेरा, शेवरा, बालंक्या असे प्रकार आहेत.

डॉ. बाबासाहेब ठोंबरे, ९४२११९५७६१ प्राचार्य, कृषी महाविद्यालय, लातूर

पशुपालकांचे अनुभव

गावातील सचिन मधुकर लाड सांगतात की आमची पाच एकर शेती आहे. पूर्वी आमच्याकडे गावरान बैल व गायी होत्या. चोवीस वर्षांपूर्वी मावलगाव (जि. लातूर) येथून लाल कंधारी गाय आणि वळू खरेदी करून गावात प्रथमच त्यांचे संगोपन सुरू केले.

सध्या १५ व्या वेताची लाल कंधारी लक्ष्मी गाय आहे. तिच्यापासून पुढील वंशवृद्धी झाली आहे. बैलजोडी, गायी, वासरे मिळून आठपर्यंत संख्या आहे. शेतकऱ्यांकडून या पशुधनाची मोठी मागणी असते. दोन वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यातून देवणी (वानेरा) कालवड व वळू आणला आहे. दूध, शेणखत व वळूच्या विक्रीतून उत्पन्नस्रोत निर्माण झाला आहे.

सचिन मधुकर लाड, ७०३०६२२९२०

पाच एकर शेती आहे. केवळ शेतीवर अवलंबून राहणे शक्य नसल्याने पशुपालन व्यवसायाची जोड दिली आहे. सध्या पाच लाल कंधारी व सहा देवणी जातीचे पशुधन आहे. रेतन आणि पशुधनाच्या विक्रीतून उत्पन्नाचा पूरक पर्याय मिळाला आहे.

दीपक बळिराम लाड, ९८२२९५००२५

लाल कंधारी व देवणी अशा दोन्ही जातींचा सांभाळ करतो आहे. वळूंच्या आधारे शेतकऱ्यांकडील गायींचे नैसर्गिक रेतन करून दिले जाते. यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे नाव तसेच गायीसंबंधीचे सर्व तपशील नोंदवलेले असतात. या व्यवसायातून आर्थिक उत्पन्न मिळते. विविध पशू प्रदर्शनांमध्येही माझ्याकडील पशुधनाचा पारितोषिकाने गौरव झाला आहे. ‘ॲग्रोवन’मध्ये माझ्या शेतीची यशकथा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी आमच्याकडून लाल कंधारी गाय व गोऱ्हा यांची खरेदी केली आहे.

अंकुश अनंत लाड, ९८२२६८३४५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT