Rice Production
Rice Production Agrowon
यशोगाथा

Rice Production : भात उत्पादनात कोंढाळकरांचा विभागात उच्चांक

sandeep navale

Rice Cultivation : पुणे जिल्ह्यातील भोर तालुका भातशेतीचे आगार समजला जातो. तालुक्यातील अनेक शेतकरी भाताच्या इंद्रायणी वाणाची लागवड करतात. मागील काही वर्षांपासून मजुरांच्या तीव्र टंचाईमुळे भातशेतीत अनेक समस्या येत आहेत.

शेतकरीदेखील पारंपरिक पद्धतीकडून चारसूत्री, एसआरटी, एसआरआय आदी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. लागवडीसह काढणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर होत आहे.

कोंढाळकरांची सुधारित शेती

तालुक्यातील नसरापूर जवळील कांबरे खेबा गावातील श्रीरंग कोंढाळकर यांनी भातशेतीत प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी अशी ओळख तयार केली आहे. त्यांची वीस एकर शेती असून, पैकी पडीक पाच एकर तर बागायती पंधरा एकर शेती आहे.

कुटुंबात पाच सदस्य आहेत. शेतीला दुग्ध व कुक्कुटपालनाची जोड त्यांनी दिली आहे. दरवर्षी खरिपात भात हे त्यांचे मुख्य पीक असते.

सिंचनासाठी दोन विहिरी असून, गावाजवळील जलसंपदा विभागांतर्गत तलावातून पाण्याचे नियोजन होते. भाताची एकरी उत्पादकता वाढविण्यासाठी अलीकडील काळात चारसूत्री तंत्राचा वापर कोंढाळकर यांनी सुरू केला आहे. त्याची सुरुवात वाण निवडीपासून केली.

बाजारपेठेत कोणत्या वाणाला अधिक मागणी, दर आहेत, त्याची वैशिष्ट्ये, उत्पादकता यांचा अभ्यास केला. त्यातून इंद्रायणी वाण पक्के केले. तालुका कृषी अधिकारी देंवेद्र ढगे, मंडल अधिकारी राजेंद्र डोंबाळे, कृषी सहायक संदीप भोसले, लक्ष्मीकांत कणसे यांचे मार्गदर्शन मिळाले.

व्यवस्थापनातील प्रमुख बाबी

-दरवर्षी भाताखाली चार एकर क्षेत्र.

- लागवडीपूर्वी उन्हाळ्यात शेणखत व भाताचा पेंढा यांचा वापर करून उभी- आडवी- उभी नांगरणी.

- त्यानंतर ग्लिरिसिडीयाचा एकरी सुमारे एक टन पाला टाकून चिखलणी केली जाते.

-दरवर्षी चार ट्रॉली शेणखताचा वापर होतो. घरी १५ ते २० जनावरे आहेत.

-योग्य वाणाची निवड झाल्यानंतर मुख्य टप्पा असतो बीजप्रक्रियेचा. भांड्यात दहा लिटर पाणी घेऊन त्यात ३०० ग्रॅम मीठ टाकून त्याचे द्रावण तयार केले जाते. त्यामध्ये २५ किलो बियाणे थोडे थोडे करून टाकण्यात येते. पाण्यावर तरंगणारे बी बाजूला केले जाते.

भांड्याच्या तळाशी जे बियाणे राहते ते योग्य समजण्यात येते. ते एका पोत्यावर पसरवून ॲझोटोबॅक्टर यासारख्या जिवाणूसंवर्धकांची प्रक्रिया शिफारशीनुसार केली जाते.

- गादीवाफ्यामध्ये रोपवाटिकेचा पर्याय वापरला जातो. मात्र मजूरटंचाईची तीव्रता ओळखून त्याचे क्षेत्र निश्‍चित केले जाते.

-लागवडीसाठी चारसूत्री पद्धतीच्या तंत्राचा वापर होतो. दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात चिखलणी केल्यानंतर दोरीच्या साह्याने लागवड केली जाते. चालू वर्षी पाच एकरांवर नियोजन आहे.

-पूर्वी १५ बाय १० सेंटिमीटरवर लागवड व्हायची. आता ती १५ बाय १० सेंमी अंतरावर केली जाते. रोपांची संख्या नियंत्रित असल्याने हवा खेळती राहते, परिणामी, फुटवे जास्त निघतात. रोपांना सूर्यप्रकाश भरपूर मिळाल्याने अन्ननिर्मिती जास्त होऊन उत्पादनात वाढ होते. कोळपणीस मदत होते. त्यामुळे मुळांना भर देणे सोयीचे होते.

-पूर्वी कुटुंबातील सदस्य व मजुरांची मदत घेऊन लागवड केली जायची. आता चारसूत्री पद्धतीत पूर्वीच्या एक एकर लागवडीसाठी लागणाऱ्या १५ ते १७ मजुरांची गरज भासायची. आता ८ ते १० व्यक्तींमध्ये एक एकर लागवड एका दिवसात करणे शक्य झाले आहे.

- लागवडीनंतर २० दिवसांनी बेणणी किंवा कोळपणी होते. गरजेनुसार दहा- पंधरा दिवसांनी युरिया- डीएपी ब्रिकेटचा वापर होतो.

-चारसूत्री व सुधारित पद्धतींमुळे नियंत्रित पद्धतीने रोप लागवड झाली. रोग- किडींचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. यंत्राद्वारे कापणी सुकर झाली. उत्पादनात वाढ झाली. भात लोळण्याचा धोका कमी झाला. तण नियंत्रण सोयीचे झाले.

उत्पादनात वाढ

सुधारित तंत्रज्ञानाचा वापर होण्याआधी एकरी २० ते २५ क्विंटलच्या आसपास उत्पादन मिळायचे. आता त्यात चांगलीच वाढ झाली आहे.

मिळत असलेले उत्पादन (एकरी क्विंटल)

वर्ष उत्पादन

२०१९ - २० --- ३९ क्विंटल

२०२० - २१ --- ३८ क्विंटल

२०२१ - २२ --- ४० क्विंटल ( ११० किलो प्रति गुंठा)

पीक स्पर्धेत विभागात पहिला क्रमांक

दोन वर्षांपासून कृषी विभागाच्या पीक स्पर्धेत कोंढाळकर यांनी भाग घेतला. मागील वर्षी गुंठ्याला १३८ किलो, तर एकरी सुमारे ५० क्विंटल उत्पादन घेण्यात कोंढाळकर यशस्वी झाले. त्यासाठी पुणे विभागात पहिला क्रमांक त्यांनी पटकावला. त्याबाबतचे प्रमाणपत्रही मिळाले आहे.

यंदा त्याहून अधिक उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरवर्षी एकरी उत्पादन खर्च किमान ५० हजार रुपये असतो. बहुतेक सर्व तांदळाची किलोला ५० रुपये दराने थेट विक्री होते.

लेखक - श्रीरंग कोंढाळकर, ९२७२७४४२४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Cultivation : नियोजन हळद लागवडीचे...

Soybean Varieties : मध्य भारतासाठी प्रसारित वैशिष्ट्यपूर्ण सोयाबीन वाण

Chana Market : हरभऱ्यातील तेजीची कारणे काय?

Agriculture Commodity Market : हळद, तूर, मक्याच्या भावात वाढ

Onion Rate : कांदा प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न; केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांकडून सरकारचं कौतुक!

SCROLL FOR NEXT