Rice Farming : प्रो ट्रे नर्सरी तंत्राने भातशेती झाली सुकर

Agriculture Science Center : पालघर येथील कृषी विज्ञान केंद्राने प्रो ट्रे पद्धतीने भात रोपवाटिका (नर्सरी) तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर घेत त्याची उपयुक्तता पटवून दिली आहे. या तंत्रज्ञानामुळे मजुरी, वेळ, बियाणे व श्रम यात बचत होऊन भातशेती सुकर झाली आहे.
Rice Farming
Rice FarmingAgrowon
Published on
Updated on

Success Story : भातपट्ट्यात अनेक वेळा पाऊस वेळेवर येतो. पण पुढे दीर्घ खंड पडतो. रोपे सुकून जातात. पाऊस उशिरा सुरू झाल्यास जास्त कालावधीच्या वाणांची लागवड शक्य होत नाही. दुसरी बाब म्हणजे काही शेतकरी उन्हाळ्यात राब पद्धतीचा वापर करतात. यात झाडांचा पालापाचोळा, शेण आदी घटकांचे थर करून ते मेमध्ये पेटवून देण्यात येतात.

त्या जागेवर पाऊस झाल्यानंतर जूनमध्ये भात पेरणी होते. मात्र या पद्धतीत जमिनीला मिळणारे सेंद्रिय पदार्थ, लाभदायक जिवाणू नष्ट होतात. हा सर्व विचार करून पालघर येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) भातशेती सुकर करणारे प्रो ट्रे पद्धतीचे भात रोपवाटिका (नर्सरी) तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवले आहे.

येथील शास्त्रज्ञ भरत कुशारे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्राच्या प्रक्षेत्रावर पाच वर्षांपासून या तंत्राद्वारे रोपे तयार होतात. कोरताड, देहरे, खरवंद, डेंगाचीमेठ (जव्हार), गांजे(पालघर) येथील सुमारे २४ शेतकऱ्यांकडे प्रायोगिक तत्त्वावर तंत्रज्ञान प्रात्यक्षिकेही घेतली आहेत.

ट्रे पद्धतीचे रोपवाटिका तंत्र

-एक एकरासाठी ९५ ते १०० ट्रे पुरेसे होतात. जाड, बारीक यानुसार प्रत्येक ट्रेमध्ये ६० ते ७० ग्रॅम बियाणे वापरावे. ७० टक्के माती अधिक २० टक्के कंपोस्ट वा गांडूळ खत आणि १० टक्के भाताचे तूस (शक्यतो काळसर) असे मिश्रण तयार करावे. हे शक्य नसल्यास समप्रमाणात माती, कंपोस्ट अथवा गांडूळ खताचे मिश्रण तयार करावे.

मातीत दगड, काडीकचरा असता कामा नये. मिश्रण पाण्याने ओले करून घ्यावे. पाच दिवसानंतर ते ट्रेमध्ये भरण्यासाठी वापरावे. त्यावेळी त्यात रासायनिक मिश्र खत दोन किलो (१०० ट्रे ) वापरावे. मिश्रण भरताना थोडा ट्रे रिकामा ठेवावा.

त्यानंतर प्रक्रियायुक्त बियाणे पेरावे व मिश्रणाने झाकावे. पाऊस असल्यास ४- ५ दिवस हिरवी शेडनेट ट्रे वर अंथरावी. पाऊस नसल्यास दोन वेळेस झारीने पाणी द्यावे. रोपे उगवून आल्यानंतर ट्रे वरील शेडनेट काढून घ्यावे.

Rice Farming
Rice Farming Useful For Azolla : भातशेतीसाठी ॲझोला उपयुक्त

या तंत्रज्ञानाचे फायदे

-एक हेक्टर लागवडीसाठी एक गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका पुरेशी.

-रोपे १५ दिवसांत व १५ ते २० सेंमी उंचीची तयार होतात. नेहमीच्या अवणीसाठी वा यांत्रिक पद्धतीने लागवडीसाठी वापरता येतात.

-१५ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरले जाते. राब पद्धतीपेक्षा ४५ किलो तर गादीवाफा पद्धतीपेक्षा २५ किलो बियाणे बचत.

-राब पद्धतीत होणारी पर्यावरणाची हानी होत नाही. पालापाचोळा, शेण यांचा खत म्हणून वापर.

-गुणवत्तेनुसार ट्रे तीन ते दहा वर्षे टिकू शकतात. पालघर जिल्ह्यात ट्रे उपलब्ध होत नव्हते. पण केव्हीकेने कर्नाटकातून ते उपलब्ध केले.

खरवंद (जव्हार) येथील सदाशिव राऊत यांची एक एकर आंबा, काजूबाग आहे. वरकस जमिनीत ते नागली, वरई घेतात. दोन एकरांत भात आहे. या शेतीत पूर्वी ते उन्हाळ्यात राब करून जूनमध्ये बियाणे पेरून रोपवाटिका तयार करायचे.

दोन वर्षांपूर्वी त्यांना केव्हीकेमार्फंत ट्रे नर्सरी तंत्राचे प्रशिक्षण मिळाले. आता त्या पद्धतीचा वापर ते करीत आहेत. पूर्वी एक एकर लागवडीसाठी १० गुंठे राब नर्सरीत २४ किलो बियाणे लागायचे. आता ट्रे पद्धतीत बारीक वाणासाठी सहा किलो बियाणे पुरेसे होते. त्यासाठी आवश्यक ट्रे केव्हीकेनेच पुरविले. व्यवस्थापनही सुधारले आहे.

राऊत यांना पूर्वी एकरी साडेदहा क्विंटल उत्पादन मिळायचे. आता ते १५ क्विंटलवर पोहोचले आहे. कोरतड (जव्हार) येथील कमलाकर घेगड चार वर्षांपासून ट्रे नर्सरी तयार करू लागले आहेत. ते म्हणतात की ही पद्धत अतिशय सोपी, कमी खर्चिक आहे. निसर्गाची हानी नाही. माझ्या निमगरव्या शेतात गरव्या भातजातीची लागवड शक्य झाली आहे.

Rice Farming
Rice Farming : कासा परिसरात उन्हाळी भातशेती फुलली
देहरे (जव्हार) येथील मीराताई महाले यांची अडीच एकर भात शेती आहे. त्या चार वर्षांपासून केव्हीकेच्या मार्गदर्शनाखाली ट्रे पद्धतीने तयार केलेली रोपे २० गुंठ्यात अवणीसाठी वापरतात पूर्वी राब पद्धतीत त्यांना १२ किलो बियाणे व २२ दिवसांचा कालावधी लागायचा. आता ट्रे तंत्राद्वारे रोपे १५ दिवसांत लागवडीसाठी तयार होतात. बियाणे केवळ ३.५ किलो लागते. चार ट्रेची गुंडाळी (रोल) करून त्यांची सुलभ वाहतूकही सोपी झाली. आठ दिवस कमी कालावधी रोपे तयार करण्यासाठी लागतो. त्यामुळे जास्त कालावधीचे वाण वापरणे शक्य झाले. पूर्वी अडीच एकरांत भात आवणीसाठी १२ गुंठ्यांवर नर्सरी तयार करावी लागे. ट्रे पद्धतीत घराजवळ एक गुंठ्यात ती तयार करता येत आहे. पावसाचा खंड पडल्यास झारीने पाणी देता येते. पूर्वी २० गुंठ्यांत पाच क्विंटल उत्पादन मिळायचे. आता केव्हीकेचे मार्गदर्शन, ट्रे नर्सरी व व्यवस्थापनातून तेवढ्याच क्षेत्रात ७.५ क्विंटल (एकरी १५ क्विं.) उत्पादन मिळते.
मीराताई महाले, ९२२५५५९९०३
बदलत्या पाऊसमानामुळे भातशेतीत समस्या वाढल्या आहेत अशावेळी शेतकऱ्यांनी प्रो ट्रे नर्सरी तंत्र व यांत्रिकीकरणाकडे वळावे. या पद्धतीत बियाणे, मजुरी आणि वेळेत बचत होते. पर्यावरणाची हानी कमी होते.
भरत कुशारे, शास्त्रज्ञ, केव्हीके, पालघर, ९८५०२६०३५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com