Rice Plantation Machine : भात रोपांच्या पुनर्लागवडीसाठी यंत्रे

Rice Farming : भाताची रोपे तयार करून त्याची पुनर्लागवड करण्याची पद्धत राज्याच्या कोकणासह विदर्भातील काही भागांमध्ये राबवली जाते.
Rice Plant Machine
Rice Plant MachineAgrowon

ज्ञानेश्‍वर ताथोड, डॉ. संदीप कऱ्हाळे

Indian Agriculture : भाताची रोपे तयार करून त्याची पुनर्लागवड करण्याची पद्धत राज्याच्या कोकणासह विदर्भातील काही भागांमध्ये राबवली जाते. मात्र या पद्धतीमध्ये मजूर अधिक लागत असल्याने शेतकऱ्यांकडून सातत्याने रोवणी यंत्राबाबत विचारणा होत आहे. या लेखामध्ये रोप लागवडीच्या यंत्रांविषयी माहिती घेऊ.

भात रोवणी यंत्राचे दोन प्रकार पडतात. १) मानवचलित रोवणी यंत्र २) स्वयंचलित लागवड मशिन.

१) मानवचलित रोवणी यंत्र : या यंत्राचा आकार व वजन कमी असून, एक मनुष्य चिखलामध्ये सहजपणे ओढू शकतो. या यंत्राला खाली फ्लोटिंग प्लेट व त्यावर रोवणीकरिता ट्रे दिलेला असतो. ट्रेच्या खालील बाजूला चेनद्वारे चालणारी दोन बोटांप्रमाणे रचना (फिंगर) असून, त्याद्वारे रोपे ट्रेमधून उचलून चिखलामध्ये रोवली जातात.

ही चेन फिरविण्यासाठी दिलेला हॅन्डल ऑपरेटरने एका हाताने फिरवायचा असतो. तर दुसऱ्या हाताने यंत्राचे संतुलन साधायचे असते. कारण हे यंत्र चालविताना ऑपरेटरला उलट्या दिशेने चालावे लागते.

कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे यंत्र उपयुक्त ठरते. NRRI ने विकसित केलेले चार ओळींचे मानवचलित रोवणी यंत्र २०-२५ दिवसाच्या मॅट स्वरूपात तयार केलेल्या भात रोपांच्या पुनर्लागवडीसाठी योग्य आहे. दोन ओळींतील अंतर २४ सें.मी. असून, प्रति तास ०.०१८-०.०२० हेक्टर (१.८ ते २ गुंठे) या वेगाने काम करते. या यंत्रामुळे मजुरांमध्ये ३०-४० टक्के इतकी बचत होते.

Rice Plant Machine
रत्नागिरी जिल्ह्यात भात लागवडीखाली २१ टक्के शेती

२) स्वयंचलित लागवड मशिन.

स्वयंचलित लागवड मशिन यंत्रामध्ये खालील दोन प्रकारे मशिन आहेत.

अ) रायडिंग टाइप रोवणी यंत्र

ब) वॉकिंग टाइप रोवणी यंत्र

शेताची पूर्वतयारी व रोपवाटिका -

पुनर्लागवड किंवा रोवणी करण्यापूर्वी मुख्य शेत तयारी करून घ्यावे लागते. त्यात उत्तम मशागत केल्यानंतर मातीची ढेकळे व काडीकचरा काढून घ्यावा. मऊ चिखलणी ही उथळ म्हणजेच १० सें.मी.ते १५ सें.मी.पर्यंत असावी.

या प्रकारे मुख्य शेत तयार झाल्यानंतर रोपवाटिकेत साठविलेल्या पाण्याचा निचरा रोवणीपूर्वी ६ ते १२ तास आधी करावा. हळूवारपणे रोपांच्या मॅट यंत्राच्या रोपे ठेवण्याच्या कप्प्यात ठेवावेत. रोपांची उचल केल्यानंतर त्याच दिवशी रोवणी करणे आवश्यक आहे.

- रोपवाटिकेची जागा समपातळीत व दगड, गोटे विरहित असावी.

- रोपवाटिकेची उंची २ सें.मी.पेक्षा जास्त असू नये.

- रोपवाटिका कधीही कोरडी पडणार नाही, याची काळजी घ्यावी. पहिल्या ३ दिवसांनंतर रोपवाटिकेमध्ये पाण्याची पातळी कायम ठेवावी.

- या रोपवाटिकेमध्ये नत्र (युरिया) खताची फवारणी कधीही करू नये.

- चिखलणी उथळ (१० ते १५ सें.मी.पर्यंत) असावी.

- रोवणी यंत्राच्या कप्प्यात रोपे ठेवल्यानंतर पाणी शिंपडावे.

- रोपवाटिकेतील रोपांची जास्त वाढ होऊ देऊ नये. रोवणीकरिता १६ ते २० दिवसांचीच रोपे वापरावीत.

- रोपवाटिकेच्या फ्रेममध्ये अति दाट किंवा विरळ बियाणे टाकू नये.

- रोवणीपूर्वी १ दिवस चिखलणी करावी.

- रोपांची वाहतूक करताना बेड तुटणार नाही, याची काळजी घ्यावी.

अ) रायडिंग टाइप रोवणी यंत्र

या प्रकारच्या रोवणी यंत्रावर ऑपरेटर बसून चालवतो. या यंत्रामध्ये इंजिन पुढील भागात दिलेले असून, दिशा देण्यासाठी स्टिअरिंग व्हील व त्यामागे ऑपरेटरसाठी सीट दिलेली असते. सीटखाली गायडिंग व्हील असून ते स्टिअरिंगद्वारे नियंत्रित होते. पुढील चाकाला ऊर्जा दिलेली असते. सीटच्या मागे रोपे ठेवण्यासाठी लागणारा ट्रे फ्लोटवर स्थापित केलेला असतो.

प्रत्येक ट्रेसाठी एक या प्रमाणे खालच्या बाजूला रोपे उचलण्यासाठी दोन फिंगर दिलेले असतात. ८ ओळींची एकाच वेळी रोवणी करणारे यंत्र शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. फक्त यासाठी रोपे मॅट पद्धतीने तयार करावी लागतात. यंत्रासाठी ०.७५ लिटर प्रति तास इतके डिझेल लागते. कार्यक्षमता ही २ ते २.५ प्रति दिन एवढी आहे.

ब) वॉकिंग टाइप रोवणी यंत्र

या रोवणी यंत्राच्या मागे ऑपरेटर चालत जातो. चालताना यंत्र वेगवेगळ्या नियंत्रण प्रणालीद्वारे नियंत्रित करावे लागते. या यंत्रामध्येही पुढील भागात इंजिन फ्लोटवर स्थापित केलेले असते. त्यामागे गिअर बॉक्स आणि दोन्ही बाजूला दोन चाके असतात.

यंत्रातील मागच्या भागात रोपे ठेवण्यासाठी ट्रे, फिंगर यंत्रणा आणि यंत्र नियंत्रित करण्यासाठी हँडल व त्यावर वेगवेगळे कंट्रोल्स दिलेले असतात. रोपे ठेवलेले ट्रे फ्लोटवर स्थापित केले जातात. ट्रेच्या खालील बाजूस फिंगर दिलेले असतात.

त्याद्वारे ट्रेमधील रोपे उचलून चिखलात रोवली जातात. जास्तीची रोपे ठेवण्यासाठी इंजिनच्या वर वेगळा ट्रे माउंट केलेला असतो. या यंत्राद्वारे एका वेळी चार ओळींमध्ये रोवणी होते. दोन ओळींमधील अंतर हे ३० सेंमी, तर दोन ओळींमधील अंतर १६ ते २२ सेंमी गरजेनुसार ठेवता येते. या यंत्राची कार्यक्षमता ही ०.२२ ते ०.५२ एकर प्रति तास असते.

Rice Plant Machine
Rice Harvesting : भातझोडणीनंतर वैरणीला मागणी

मॅट नर्सरी करण्याची पद्धत

वरील दोन्ही यंत्रांसाठी मॅट पद्धतीने रोपवाटिका करणे गरजेचे असतात. ती पुढील प्रमाणे तयार करावी.

१) भात रोवणी यंत्राच्या साहाय्याने भाताची रोवणी करण्यासाठी एक एकर क्षेत्रामध्ये १.२ मीटर रुंदी व १० मीटर लांबी असलेल्या दोन बेडची आवश्यकता आहे. बेडची उंची १५ सेंमी ठेवावी.

२) योग्य लागवडीसाठी रोपवाटिकेची जागा समपातळीत असावी. त्यामुळे बेडची जाडी एकसमान राहील. पाण्याच्या निचऱ्यासाठी दोन बेडमध्ये चर तयार करावा. बेडच्या मातीमध्ये कंपोस्ट खत किंवा गांडूळखत ३ ः १ प्रमाणात मिसळावे.

३) समपातळीत तयार केलेल्या बेडवर पॉलिथीन शीट अंथरून घ्यावा. नंतर बेडवर २१ सेंमी बाय ५५ सेंमी बाय २ सेंमी आकाराची फ्रेम रोपांचे केक तयार करण्यासाठी वापरावी. फ्रेमच्या वापरामुळे बियाणे वाया जात नाही. फ्रेम मातीच्या मिश्रणाने काठोकाठ भरून घ्यावी. त्यावर अंकुर आलेले बियाणे १२० ग्रॅम ते १५० ग्रॅम प्रति केक या प्रमाणात एकसमान पसरून घ्यावेत.

नंतर पक्षी आणि पावसापासून बचावासाठी बेड हिरव्या पानांनी किंवा भात तुसाच्या साहाय्याने झाकून घ्यावेत. रोवणी यंत्रासाठी आवश्यकता असलेले एकसमान अशा २ सेंमी उंचीचे केक तयार होतात.

४) हवामानाप्रमाणे दिवसातून २ ते ३ वेळा बेडवर झारीने ३ ते ४ दिवस पाणी द्यावे. बेड कधीही कोरडा पडू देऊ नये.

५) चौथ्या दिवशी रोपांची चांगली वाढ होत असल्याची पडताळणी करावी. रोपवाटिका हिरवी दिसत असल्याची खात्री करावी. २ ते २.५ सेंमीची रोपे दिसायला सुरू झाल्यानंतर भाताचे तूस काढून घ्यावे. रोपवाटिकेमध्ये २ सेंमी उंचीपर्यंत (रोपाच्या उंचीच्या निम्मी) पाणीपातळी ठेवावी.

६) रोपवाटिकेवर बारकाईने लक्ष ठेवून कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तत्काळ नियंत्रणाचे उपाय करावेत.

७) अंकुर आलेले बियाणे रोपवाटिकेमध्ये टाकल्यापासून १७ ते १८ दिवसांपर्यंत १२.५ ते १५ सें.मी.उंची असलेले रोपे तयार होतील. ३ ते ४ पाने असलेली रोपे रोवणी यंत्राच्या साह्याने रोवणीसाठी योग्य असल्याचे समजावे. रोपवाटिकेमध्ये रोपांची जास्त दिवस वाढ होऊ देऊ नये. जाड व टणक अशा मॅटमधील रोपांची रोवणी यंत्राच्या बोटांना करताना सोईस्कर होत नाही.

संपर्क - ज्ञानेश्‍वर ताथोड, ९६०४८१८२२०, (कृषी अभियांत्रिकी विषय तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com