Agriculture Agrowon
यशोगाथा

Agriculture : कष्टाला शिक्षणाची जोड देत वाढवले उत्पन्नाचे स्रोत

आर्थिक नियोजन वगैरे गोष्टी आपल्यासारख्या खेडवळाला काय समजणार, असे म्हणणाऱ्या कोणालाही विचारात पाडणारे शेतकरी म्हणजे रामचंद्र बाबूराव ढेबे. वय वर्षे ६०. पहिलीनंतर शाळेचे तोंडही न पाहिलेले, खरंतर निरक्षर. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीवर विसंबून आयुष्यभर शेतात कष्ट करणारा हा शेतकरी पारंपरिक शेतीला (Traditional Trading) पशुपालनाची (Animal Rearing) जोड देत आपल्या कुटुंबाला समृद्धीकडे घेऊन जातो.

मनोज कापडे

पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुका म्हणजे कोकणाचेच दुसरे रूप. येथील भुतोंडे मार्गावर आहे पाली खुर्द हे गाव. येथील रामचंद्र ढेबे यांची यांच्याकडे १० एकर शेती आहे. त्यातील केवळ पाच एकरच वहितीखाली. एकतर या अतिपावसाळी आणि दुर्गम गावामध्ये त्या काळी शाळा नाहीत. तंगडेतोड करत शाळेपर्यंत गेले तरी अनेक वेळा शिक्षकांचीच शाळेला दांडी. त्यात त्यांचे वडील निरक्षर.

त्यामुळे शिक्षणाचे महत्त्वच माहीत नसलेले हे कुटुंब. स्वतः रामचंद्रही इयत्ता पहिलीला काही दिवस शाळेत गेले आणि त्यापुढे गेलेच नाहीत. पण आपल्या वडिलांकडून त्यांनी शेतीतील कष्टाचे धडे घेतले. शिक्षण नसले तरी पै न् पै कशी मिळवायची, टिकवायची आणि साठवायची, यात तेही वडील बाबूरावांप्रमाणे पक्के होत गेल्याचे रामचंद्र ढेबे सांगतात.

ते पुढे सांगतात, ‘‘आमची दहा एकर शेती असली तरी त्यातील केवळ काही खाचरामध्येच आम्ही भात पिकवत असू. एके दिवशी वडिलांनी डोंगरकाठच्या पडीक जागेत भातशेती तयार करण्याचा ध्यास घेतला. रामचंद्राला सोबत घेतलं. १९७२ पासून आम्ही डोंगर फोडण्यास सुरुवात केली. नेमका त्याच वर्षी दुष्काळ पडला.

इतके कष्ट करूनही अवघा एक पोते भात हाती आला. पण शेती तयार करण्याचा घेतलेला वसा काही आम्ही टाकला नाही. टिकाव-फावडे घेत दरवर्षी थोडे थोडे रान तयार करत राहिलो, ते १९९० पर्यंत. पाच एकर शेती वहितीखाली आणली. आता पाच एकरामध्ये ७० पोत्यांपेक्षा जास्त भात पिकतो.

दरम्यान, त्यांचं गुणाबाई यांच्याशी लग्न झाले. पत्नीही त्यांच्यासारखीच कष्टाळू आणि पै, पै जोडणारी. शकुंतला, सीता आणि संगिता अशा तीन मुली आणि हनुमंत हा मुलगा झाला. मुलींना गाव परिसरातच असलेल्या माध्यमिक शाळेतच शिकवलं. त्यांची चांगली लग्नं केली. शिक्षणावाचून होणाऱ्या अडचणी त्यांना समजल्या होत्या. आपल्या कष्टाला, अनुभवातून येणाऱ्या शहाणपणाला शिक्षणाची जोड असती तर आपण कुठल्या कुठे गेलो असतो, असे त्यांना वाटायचं.

त्यातून त्यांनी मुलगा हनुमंतला चांगले शिक्षण देण्याचा निर्धार केला. त्यासाठी पैसा पाहिजे, अधिक उत्पादन मिळाले पाहिजे म्हणून ते प्रयोगशील शेतीकडे वळाले. केवळ भातशेतीवर अवलंबून राहून चालणार नाही, म्हणून ढेबे दांपत्यांने पशुपालनाचा मार्ग स्वीकारला. हाती पैसा खेळू लागला. हनुमंतला २० किलोमीटरवरील आंबवणे गावात शिक्षणाला पाठवू शकले. पुढे ३२ किलोमीटर लांब नसरापूरला त्यानं सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला.

तोही आता वडिलांच्या खांद्याला खांदा देत शेतीमध्ये लक्ष घालू लागला आहे. त्याच्या विचारानं शेतीमध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत. हनुमंत सांगतो, “आम्ही भातशेतीमध्ये आता सेंद्रिय खतांचा वापर वाढवला आहे. त्यासाठी देशी जनावरे पाळली आहेत. सध्या तीन कोकण कपिला गायी, तीन म्हशी, आठ मेंढ्या व ५० कोंबड्या आहेत.

या जनावरांचे कुजलेले शेणखत एकरी दोन ट्रॉली या प्रमाणे किमान एक वर्षाआड तरी वापरतो. शिवाय समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी काही प्रमाणात रासायनिक खतेही दिली जातात. त्यामुळे भातशेतीमधून उत्पादन वाढले आहे.’’ अर्थात, ते केवळ भातशेतीवर थांबले नाहीत. रब्बीत गहू, ज्वारी, बाजरी पिकवली जाते. दुभत्या जनावरांसाठी चारा पीक म्हणून मका लावला जातो.

भात विक्रीचे नियोजन बसवले

पूर्वी पिकवलेला सगळा भात व्यापाऱ्याला विकला जायचा. दरही कमी मिळायचा. आता कोणत्याही कीडनाशकाचा वापर न करता पिकवलेल्या भातापासून स्वतः तांदूळ काढून घेतला जातो. एका पोत्यामध्ये ८० किलो साळ बसते. त्यातून निम्मा तरी तांदूळ मिळतो. या तांदळाची विक्री पुण्यामध्ये मुलगा हनुमंत आणि पुतण्या प्रकाश करतात. त्याला ५० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतो. त्यातून अनेक शहरी ग्राहक आता जोडले गेले आहेत. काही ग्राहक तांदुळ खरेदीसाठी थेट त्यांच्या शेतात येतात.

पर्यावरणपूरक घरांची उभारणी...

हनुमंत यांने स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका केलेली असल्याने पर्यावरणपूरक बांबू घरांच्या उभारणीचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांने ‘एईआरएफ’ या संस्थेचे मार्गदर्शनही घेतले आहे. सहकारी शेतकरी भरत दळवी याच्यासह पर्यावरणपूरक बांबूच्या घराची निर्मिती करत आहेत.

त्यातून मिळालेले उत्पन्न पुन्हा शेतीत भांडवल म्हणून वापरत आहे. आमच्या भागात राजगड, तोरणा असे किल्ले आणि मढेघाटसारखा निसर्गरम्य परिसर आहे, त्यामुळे कृषी पर्यटनाला चांगली संधी आहे. अनेक जण यात उतरत आहेत. त्याचा माझ्या पर्यावरणपूर घर उभारणीला मागणी वाढली आहे. स्वतःच्या शेतातही कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचा ध्यास हनुमंत यांने घेतला आहे. थोडे आर्थिक बळ कमी पडत असल्यामुळे चांगला गुंतवणूकदार किंवा बॅंक कर्ज मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे तो सांगतो.

ढेबे परिवाराचे आर्थिक गणित

- तीन एकर भातशेतीसाठी साधारणपणे ४५ हजार रुपये इतका खर्च होतो. त्यातून दीड ते दोन टन तांदूळ मिळतो. त्याला थेट विक्रीतून ५० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळवण्याचा प्रयत्न असतो. त्यातून ४५ ते ५० हजाराचे उत्पन्न मिळते.

- सध्या तीन एकरांवर बांबू लागवड केली आहे. त्याच्या लागवडीला ५० हजार रुपये खर्च आला. साधारणपणे दर दोन वर्षांनी त्यातून उत्पन्नाचा एक स्रोत सुरू होईल.

- दुभत्या जनावरांपासून मिळणाऱ्या दुधातून रोज २०० रुपये उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता त्यातून वर्षाला अंदाजे ३० हजार रुपये सुटतात.

- मेंढीपालनही सुरू केले असून, सध्या आठ मेंढ्या आहेत. त्यांच्या पिल्लांच्या विक्रीतून वर्षाला सरासरी २० हजार रुपये मिळतात.

- ५० देशी कोंबड्या पाळल्या आहेत. त्यांच्या अंड्यांच्या विक्रीतून वर्षाला सरासरी ५ हजार रुपये मिळतात.

संपर्क ः हनुमंत रामचंद्र ढेबे, ८४०७९६३१०५, ८९७५२१६४६६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT