Agriculture Warehouse Agrowon
यशोगाथा

Agriculture Warehouse : शेतीमाल साठवणुकीतून वाढवले नफ्याचे प्रमाण

Success Story : शेती भाड्याने घेऊन व्यवस्थापनाचा वेगळा पॅटर्न राबविणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील परसाड (ता. कामठी) येथील सचिन व संदीप उमाठे या दोन भावंडांनी सात वर्षापूर्वीच साठवणीसाठी गोदामाची उभारणी केली.

Vinod Ingole

Vegetable Farming : नागपूर येथे वास्तव्यास असलेल्या सचिन व संदीप उमाठे बंधूची शहरापासून १८ किलोमीटर अंतरावरील परसाड शिवारात २५ एकर वडिलोपार्जित शेती. वडील मारोतराव यांच्या वाट्याला तर वडिलोपार्जित अवघी चार एकर शेती आली होती. त्यात प्रामुख्याने ते ऊस आणि भाजीपाला लागवडीवर भर देत. त्याच वेळी अन्य शेतकऱ्यांची शेतीही करारावर घेत फायद्यामध्ये वाढ केली.

वडिलांकडूनच शेती व्यवस्थापनाचे धडे घेणाऱ्या सचिन आणि संदीप या उमाठे भावंडांनीही करार शेतीचा पॅटर्न राबविला आहे. गुमथळा, हुडकेश्‍वर, माथनी, परसाड, सोनेगाव या नागपूरलगतच्या भागात अनेक नोकरदारांची शेती आहे. त्यांना शेतीचे व्यवस्थापन होत नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधून पडीक ठेवण्याऐवजी करारावर केल्याचे फायदे समजावले जातात.

शेताच्या प्रकारानुसार एकरी १७ ते २१ हजार रुपये प्रति एकर या दराने शेती कराराने घेतली जाते. सध्या ४०० एकर शेती कसण्यासाठी १० ते १२ व्यक्ती कायमस्वरूपी, तर ७० ते ८० हंगामी मजूर त्यांच्याकडे कार्यरत असतात. इतक्या मोठ्या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी यांत्रिकीकरणावर भर आहे. त्यांच्या ताफ्यात शुगरकेन हार्वेस्टर, तब्बल ८ ट्रॅक्‍टर व त्यावर चालणारी अवजारे, उपकरणे आहेत.

गोदामाची केली उभारणी

इतक्या मोठ्या क्षेत्रातून येणारा शेतीमालही अधिक असते. काढल्यानंतर त्याची त्वरित विक्री केल्यास येईल त्या दरामध्ये माल विकावा लागतो. त्या ऐवजी साठवणे शक्य असलेला शेतीमाल काही काळ साठवून ठेवल्यास दरातील चढ-उताराचा फायदा घेता येईल, हे त्यांच्या लक्षात आले.

साठवणीची सोय करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी असलेल्या अनुदानाचीही माहिती मिळाली. मात्र कोणत्याही अनुदानासाठी आवश्यक असलेल्या अटी, नियम आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यात वेळ घालविण्यापेक्षा स्वनिधीतूनच गोदाम उभारणी सुरू केली.

२०१६ मध्ये बारा हजार चौरस फूट आकाराचे २७ ते ३० हजार क्‍विंटल साठवण क्षमतेचे भव्य गोदाम उभे राहिले. गोदामात चारही बाजूंनी थेट आतपर्यंत ट्रॅक्‍टर नेण्याची सोय केली आहे. हे बांधकाम चार टप्प्यांत सुमारे ८० लाख रुपये खर्चून केले.

...अशी राखतो निगा

गोदामातील साठवणीमध्ये काही किडींचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होते. हे टाळण्यासाठी दर तीन महिन्यातून एकदा निर्जंतुकीकरणाची (फ्युमिगेशन) प्रक्रिया करणे यावर भर दिला जातो. त्यासाठी प्रति २ हजार चौरस फुटांसाठी एक हजार रुपये खर्च येतो. त्यासाठी सर्व धान्याची पोती ही हवाबंद स्थितीमध्ये ठेवावी लागतात.

गंजीची साठवणूक असलेल्या खालील भागातूनही हवा खेळती राहावी, यासाठी सहा इंच बाय अडीच फूट असे रेलिंग तयार केले आहेत. त्यावर वाळू भरलेली पोती अंथरली जातात. हा संपूर्ण भाग ताडपत्रीच्या साहाय्याने हवाबंद केला जात असल्याचे सचिन उमाठे यांनी सांगितले.

...असा झाला फायदा

१) मुगामध्ये क्‍विंटलमागे १७०० रुपयांची वाढ

२०२१-२२ या वर्षात ९ एकरांवर मूग लागवड होती. व्यवस्थापनासाठी एकरी २१ हजार रुपये खर्च झाला. उत्पादन ४० क्‍विंटल मिळाले. या वर्षी मे-जून महिन्यांत ६५०० रुपये प्रति क्विंटल असा दर होता. मात्र उमाठे बंधूनी त्याची साठवणूक करून

सप्टेंबर महिन्यात मुगाचे दर ८२०० रुपयांवर पोहोचल्यानंतर विक्री केली. परिणामी, केवळ साठवणुकीमुळे क्‍विंटलमागे १७०० रुपयांचा फायदा झाला.

२) गव्हातही वाढला नफा

अ) २०२०-२१ या वर्षात ६० एकरांतून एकरी १३ क्‍विंटलप्रमाणे ७८० क्‍विंटल गहू उत्पादन झाले. व्यवस्थापनावर एकरी १६ हजार रुपये खर्च झाला. एप्रिल महिन्यात गव्हाला केवळ १७०० रुपये प्रति क्विंटल दर होता. साठवणुकीनंतर सप्टेंबर महिन्यात २२०० रुपयांनी गव्हाची विक्री केल्यामुळे क्‍विंटलमागे ५०० रुपयांचा फायदा झाला.

ब) २०२१-२२ मध्ये ६२ एकरातून १३.५ क्‍विंटलप्रमाणे ८६७ क्‍विंटल गहू उत्पादन मिळाले. व्यवस्थापनावर एकरी १९ हजार रुपये खर्च झाला. काढणीनंतर एप्रिलमध्ये गव्हाचे दर २००० रुपये प्रति क्विंटल होते. सप्टेंबरपर्यंत साठवणूक करून विक्री केल्यामुळे त्यांना २६०० रु. प्रति क्विंटल असा दर मिळाला. क्‍विंटलमागे ६०० रुपये फायदा झाला.

क) २०२२-२३ या वर्षात ५० एकर गहू लागवडीतून एकरी १३ क्‍विंटल प्रमाणे ६५० क्‍विंटल उत्पादन झाले. त्यावर एकरी २१ हजार रुपये खर्च झाला. सध्या गव्हाचा दर २१०० रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र त्यात वाढ होण्याची अपेक्षा असून साठवण केलेली आहे.

३) तुरीचा ताळेबंद

अ) २०२०-२१ या वर्षात १० एकरातून सरासरी ११ क्‍विंटलप्रमाणे ११० क्‍विंटल तूर झाली. फेब्रुवारीत ५४०० असा दर होता. मात्र साठवणीनंतर जुलैमध्ये विक्री केली असता ६२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. क्‍विंटलमागे तब्बल ८०० रुपये अधिक मिळाले. ब) २०२१-२२ या वर्षात २५ एकरांतून एकरी १२ क्‍विंटल प्रमाणे २९५ क्‍विंटल तूर उत्पादन झाले.

फेब्रुवारीमध्ये ७२०० असा दर असल्याने साठवण केली. सप्टेंबर महिन्यात विकलेल्या तुरीला ७८०० प्रति क्विंटल असा दर मिळाला. क्विंटलमागे ६०० रुपये अधिक मिळाले.

क) २०२२-२३ या वर्षात ३२ एकर तूर लागवडीतून एकरी ११ क्‍विंटलप्रमाणे ३४५ क्‍विंटल उत्पादन झाले. फेब्रुवारीत तुरीला ७२०० असा दर होता. हेच आता दर १० हजार ते ११ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र अजूनही वाढ होण्याच्या शक्यतेने उमाठे बंधूनी अद्याप तुरीची विक्री केलेली नाही.

४) कापसातही मिळाला तेजीचा फायदा

अ) २०२०-२१ या वर्षात कापसाखाली १३० एकर क्षेत्र होते. यातून उत्पादित कापसापैकी १००० क्‍विंटल कापूस ५५०० रुपयांनी विकला. उर्वरित साठवलेल्या ५०० क्‍विंटल कापसाला नंतर ६०५० रुपये दर मिळाला. यातून क्‍विंटलमागे ५५० रुपयांचा फायदा झाला.

ब) २०२१-२२ मध्ये १५० एकर लागवडीतून ८०० क्‍विंटल कापूस उत्पादन झाले. त्याची विक्री नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा तीन टप्प्यांत अनुक्रमे ८०५०, ८३०० आणि ९००० रुपये प्रति क्विंटल या दराने केली. तर एप्रिल महिन्यात कापसात चांगलीच तेजी येऊन दर १२,१०० रुपयांवर पोहोचले. या वाढीव दरात ५०० क्‍विंटल साठवलेल्या कापसाची विक्री केली.

क) २०२२-२३ या वर्षात २२० एकरावर कापूस लागवड होती. यातून ३३०० क्‍विंटल कापसाचे उत्पादन झाले. ६७ हजार रुपयांचा एकरी व्यवस्थापन खर्च झाला आहे. सध्या कापसाचा दर ७८०० रुपये असून, याही वर्षी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करण्याचे नियोजन आहे.

ड) गोदामाचा सर्वाधिक फायदा कोरोना काळात अचानक झालेल्या लॉकडाउनमध्ये झाला. अन्य शेतकऱ्यांना मे-जूनमध्ये ३००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापूस विकावा लागला. त्या वर्षी उमाठे यांनी जून अखेरपर्यंत कापूस रोखून ४८०० रुपये दराने विक्री केली होती.

५) भातातही वाढले नफ्याचे प्रमाण

अ) २०२०-२१ या वर्षात ६० एकरांवर धान (भात) लागवडीतून १३०० क्‍विंटल उत्पादन झाले. डिसेंबर महिन्यात २००० ते २२०० प्रति क्विंटल इतकाच दर होता. मात्र तेच दर ऑगस्ट २०२१ मध्ये २८०० रुपयांवर पोहोचल्यावर विक्री केल्याने ६०० रुपयांचा फायदा झाला. या वर्षी भातासाठी एकरी ४२ हजार रुपये व्यवस्थापन खर्च आला.

ब) २०२१-२२ या वर्षात ६२ एकरांतून १३५० क्‍विंटल उत्पादन झाले. त्यासाठी एकरी ४६ हजार रुपये खर्च झाला. काढणीवेळी २१०० ते २३०० असलेला दर पुढे जुलैमध्ये ३१०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. त्या वेळी विक्री केल्यामुळे प्रति क्विंटल ८०० रुपये अधिक मिळाले.

क) २०२२-२३ या वर्षात ५८ एकर भात पिकातून १४०० क्‍विंटल उत्पादन मिळाले. एकरी ५० हजार रुपये इतका व्यवस्थापन खर्च झाला. सध्या ३२०० रुपये प्रति क्‍विंटल दर आहे. आठ दिवसांपूर्वी बियाण्यांसाठी म्हणून ३५०० रुपये क्विंटल प्रमाणे २७० क्विंटल भात विक्री केली. अजून ११३० क्विंटलला अजूनही चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

(टीप - सर्व पिकांच्या उत्पादन खर्चामध्ये शेती भाडे समाविष्ट केले आहे.)

गोदामांसाठी नाबार्डची आहे योजना

ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फास्ट्रक्‍चर ग्रेडिंग ॲण्ड स्टँडर्डायझेशन’ अंतर्गत शेतकरी कंपन्या, समूहांना नाबार्डकडून गोदाम उभारणीसाठी कर्ज देण्याची योजना आहे. पोकरामधून देखील गोदाम उभारणीकरिता शेतकरी कंपन्यांना अनुदान दिले जाते.

आम्ही स्वतः जरी अनुदानासाठी प्रयत्न केले नसले तर गावात शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनी उभारून गावकऱ्यांनी स्वतःचे उत्पादन साठवणीचे नियोजन केले पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यालाही त्यांच्या थांबण्याच्या आर्थिक क्षमतेनुसार योग्य तो दर मिळवणे शक्य होईल, अशा आशाही सचिन उमाठे यांनी व्यक्त केली.

संपर्क - सचिन उमाठे, ९८२३७७७३०४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT