Poultry Business Agrowon
यशोगाथा

Poultry Industry : पोल्ट्री उद्योगामध्ये तयार केली ओळख

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Poultry Business : पुणे शहरातील ग्राहकांची गरज ओळखून चिकनसोबत अंड्याची वाढती मागणी लक्षात घेऊन लोणी काळभोर (ता. हवेली, जि. पुणे) येथील किरण काळभोर यांनी लेअर पोल्ट्री उद्योगात चांगला जम बसविला आहे. सुरुवातीला कोळभोर कुटुंबीयांनी एक एकर शेती खरेदी केली होती. शेतीतून अपेक्षित आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने पूरक उद्योगातून आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

यातूनच कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली. किरण काळभोर यांनी २०१४ मध्ये लेअर पोल्ट्री व्यवसायाची निवड केल्यानंतर तांत्रिक माहिती घेण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. या भेटीतून त्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या व्यवसायातील बारकावे समजून घेत ब्रॉयलर आणि लेयर अशा दोन्ही प्रकारच्या पोल्ट्री व्यवसायाचे व्यवस्थापन आणि आर्थिक उलाढालीचा अभ्यास केला.

शेडसाठी लागणारी जागा, व्यवस्थापन खर्च, खेळते भांडवल, विक्रीचे नियोजन यातील बारकावे समजून शहरातील दुकानदारांच्याकडून अंड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन लेअर पोल्ट्री सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय सुरू करताना आर्थिक अडचणी आल्या होत्या. त्यावर मात केली. तसेच खर्च अधिक असल्याने बॅंकेकडून कर्ज घेऊन लेअर पोल्ट्री व्यवसायाला गती दिली.

शेडची उभारणी

किरण काळभोर यांनी २०१४ मध्ये पहिल्या टप्यात ६२ फूट बाय ४०० फूट आकाराची पोल्ट्री शेड तयार केली. शेडची उभारणी पूर्ण झाल्यानंतर शास्त्रीय पद्धतीने लेअर कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी योग्य आकाराचे पिंजरे बसविले. या शेडमध्ये सुमारे ३० हजार लेअर कोंबड्यांचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन सुरू केले.

पोल्ट्री उद्योगात चांगला जम बसल्यानंतर दोन वर्षांनी ६२ बाय ४०० फूट आकारमानाच्या दुसऱ्या लेअर फार्म शेडची उभारणी केली. सध्या दोन्ही शेड मिळून ६० हजार लेअर कोंबड्यांचे संगोपन केले जाते. कोंबडी पिले खरेदी केल्यानंतर पहिले १२ आठवडे स्वतंत्रपणे एका शेडमध्ये ठेवली जातात. त्यासाठी ४५ बाय ७०० फुटांचे शेड उभारण्यात आले आहे.

या शेडमध्ये व्यवस्थितरीत्या संगोपन, खाद्य व्यवस्थापन आणि लसीकरण केल्यानंतर मुख्य शेडमध्ये कोंबड्यांना नेले जाते. १८ आठवड्यांपासून कोंबडी अंडी देण्यास सुरुवात करते. सुरुवातीच्या काळात अंडी लहान असल्याने दरही कमी असतो. परंतु २५ व्या आठवड्यापासून अंड्याचा आकार चांगला मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळे दरही चांगला मिळतो. साधारणपणे एक कोंबडी ८५ ते ९० व्या आठवड्यांपर्यंत अंडी देत राहते.

खाद्याचा पुरवठा

सुरुवातीचे दोन महिने कंपनीचे कोंबडी खाद्य वापरण्यात आले. परंतु ओळखीचे पोल्ट्रीचालक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार किरण काळभोर यांनी स्वतः कोंबडी खाद्य बनवण्याचा निर्णय घेतला. दहा लाख रुपये किमतीची यंत्रणा विकत घेतली. त्यानंतर फीडसाठी लागणारे घटक विकत घेऊन स्वतः खाद्य निर्मितीला सुरुवात केली. यामुळे प्रति किलोमागे एक ते तीन रुपयांपर्यंत बचत होऊ लागली.

सुरुवातीला कोंबड्यांना मजुरांकरवी खाद्य देत असल्यामुळे साधारणपणे दोन ते तीन तास वेळ जायचा आणि फार कष्ट जाणवत होते. तसेच मजूरटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे कोंबड्यांना खाद्य देण्यासाठी आधुनिक यंत्रणा पोल्ट्री शेडमध्ये बसविण्यात आली. त्यामुळे कोंबड्यांना आठ ते दहा मिनिटांमध्ये खाद्य देण्याचे काम पूर्ण होऊन वेळेची बचत होऊन त्रासही कमी झाला.

पाण्याची योग्य सोय

पोल्ट्रीला पाणीपुरवठा होण्यासाठी विहिरीची व्यवस्था आहे. या पाण्याची सातत्याने प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. त्यानुसार पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवली जाते. कोंबड्यांना योग्य गुणवत्तेचे पाणी मिळेल यापद्धतीने नियोजन केले जाते. त्यासाठी शेडमध्ये तीन टाक्या बसविण्यात आल्या आहेत. टाक्यांद्वारे स्वयंचलित निपल सिस्टिम पद्धतीने कोंबड्यांना पाणी पिण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अंड्यांचे उत्पादन आणि विक्रीचे नियोजन

सुरुवातीच्या काळात अंड्यांचे उत्पादन कमी होते. परंतु हळूहळू त्यात वाढ झाली. सध्या दोन्ही शेड मिळून दररोज ५५ हजार अंडी उत्पादन होत आहे. त्यात काही वेळा खराब अंडी होण्याचे प्रमाण असले, तरी ते अत्यंत नगण्य आहे. सुरुवातीला अंडी विक्रेत्यांबरोबरीने करार करण्यात आला. सध्या पाच विक्रेत्यांच्या माध्यमातून अंड्यांची विक्री केली जाते.

ही सर्व विक्री फार्मवर केली जाते. त्यामुळे वाहतूक खर्च, वेळेची बचत होत आहे. याशिवाय पुण्यातील मॉलमध्ये आकर्षक पॅकिंगमध्ये अंड्यांची विक्री केली जाते. यासाठी ‘श्रीमंत अंबरनाथ पोल्ट्री’ या नावाचा ब्रँड तयार केला आहे.अंड्यांचे दररोज दर बदलत असतात. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार कमीअधिक दराने विक्री करावी लागते.

साधारणपणे वर्षभराच्या सरासरीनुसार प्रति नग ३ ते ६ रुपयांपर्यत दर मिळतो. बाजारपेठेतील पुरवठ्यानुसार दररोज दर बदलत असतात. पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांचे व्यवस्थापन, वाहतूक, खाद्य, मजूर, वीजबिल असा मोठा खर्च होतो. हा सर्व खर्च वजा जाता महिन्याला सरासरी तीन लाखांचा नफा होता. हा नफा बाजारपेठेतील दरावर अवलंबून असतो. काही वेळा अपेक्षेपेक्षा कमी दरानी अंडी विकली जातात. परंतु पोल्ट्रीचे काटेकोर व्यवस्थापन ठेवून खर्च मर्यादित ठेवण्यावर काळभोर यांनी भर दिला आहे. त्यामुळे बँक कर्ज परतफेड व्यवस्थित करता येते.

कोंबड खताची विक्री

पोल्ट्रीमधून कोंबडी खत चांगल्या प्रतीचे मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्याकडून यास वाढती मागणी आहे. परिसरातील अनेक शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोंबडी खताची खरेदी करतात. पूर्ण वर्षभराच्या कालावधीत साधारणपणे आठ लाख रुपयांची खत विक्रीतून उलाढाल होते.

- किरण काळभोर, ९६८९५०२१५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT