Nagar News : शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून परसबागेतील कुक्कुटपालनाचा अवलंब करावा. परसबागेतील कुक्कुटपालनामुळे कुटुंबास आर्थिक हातभार मिळतो व कुटुंबातील सदस्यांसाठी एक पोषण सुरक्षिततेचा स्रोत उपलब्ध होतो, असे प्रतिपादन प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र निमसे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठातील भारतीय कृषी संशोधन परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत परसबागेतील कुक्कुटपालन एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तांभेरे गावात करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र निमसे बोलत होते. शेतकरी प्रथम प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सचिन सदाफळ व प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख, प्रगतिशील शेतकरी सुनील शेलार आणि साहेबराव लोंढे उपस्थित होते.
डॉ. रवींद्र निमसे म्हणाले, की परसबागेतील कुक्कुटपालनाचा मूळ उद्दिष्ट कमी खर्चात पिलांचे संगोपन करणे हे आहे. शेतकऱ्यांनी पहिल्या महिन्यात ब्रूडिंग, लसीकरण व खाद्य व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित केल्यास पिल्लांची मर होत नाही.
एक महिन्यानंतर कोंबड्यांचे रोग व्यवस्थापन व आहार व्यवस्थापन शास्त्रीयदृष्ट्या करावे. परसबागेतील कुक्कुटपालनातून एक चांगल्या प्रकारचा उत्पन्नाचा स्रोत शेतकऱ्यांना उपलब्ध होतो. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सचिन सदाफळ यांनी केले.
या वेळी डॉ. भगवान देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये पोषण सुरक्षिततेसाठी परसबागेतील कुक्कुटपालन महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रगतिशील शेतकरी राधाकृष्ण गागरे, रवींद्र मुसमाडे तसेच तांभेरे व कानडगाव या गावातील १०० पेक्षा जास्त शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय शेडगे यांनी केले. तर किरण मगर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री. राहुल कोऱ्हाळे व किरण मगर यांनी परिश्रम घेतले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.