Edible Oil Processing Business  Agrowon
यशोगाथा

Natural Edible Oil : खाद्यतेलाचा यशस्वी स्वानंद शतायू ब्रॅण्ड

Processing Industry : पुणे जिल्ह्यातील नारायणगाव- वारूळवाडी येथील राजेंद्र व रेश्‍मा या कानडे दांपत्याने लाकडी घाण्यावरील खाद्यतेल निर्मिती उद्योगाची यशस्वी मुहूर्तमेढ रोवली आहे.

राहुल घाडगे

Rural Entrepreneurship Success : पुणे जिल्ह्यात नारायणगाव- वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील राजेंद्र महादू कानडे यांना लहानपणापासूनच शेतीची ओढ होती. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी. (उद्यानविद्या) पदवी नारायणगाव येथील कृषी तंत्र निकेतनमधून पूर्ण केली. पदवीधर झाल्यानंतर २००१ मध्ये अर्धा एकरावर द्राक्ष शेतीला सुरुवात केली. पुढे स्वतःची दोन एकर आणि खंडाने आठ एकर जमीन घेऊन एकूण १० एकरांवर १८ वर्षे द्राक्ष शेतीचा अनुभव घेतला. अनेक चढ-उतार अनुभवले.

प्रक्रिया उद्योगाची दिशा

हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता, दरांमधील चढ-उतार यामुळे द्राक्षशेती आर्थिक दृष्ट्या परवडेनाशी झाली. विशेषतः कोरोना काळात द्राक्ष मार्केटिंगवर मोठा परिणाम झाला.

त्यामुळे प्रक्रिया आधारित किंवा मूल्यवर्धित शेती उद्योगाचे महत्त्व तीव्रतेने जाणवू लागले. सन २०१७-१८ मध्ये नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात (केव्हीके) ६० दिवसांचा ‘ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस’ अभ्यासक्रम पूर्ण केला.

यामध्ये प्रक्रिया- मूल्यवर्धन विषयातील सखोल ज्ञान मिळाले. बाजारातील मागणीचा अभ्यास करताना पारंपरिक लाकडी घाण्यावर आधारित खाद्यतेलाची वाढती गरज लक्षात आली. याच अभ्यासातून प्रेरित होऊन कानडे यांनी हा तेल उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा निश्‍चय केला. त्या दिशेने प्रवास सुरू केला.

पद्धतशीर नियोजन, समस्यांवर मात

वाट सोपी नव्हते. अनेक प्रश्‍न समोर उभे होते. परंतु कानडे यांनी उद्योगाची उभारणी करताना चार महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले. अद्ययावत यंत्रसामग्रीची निवड, आवश्यक प्रशिक्षण, भांडवल उभारणी व कच्च्या मालाची उपलब्धता या त्या बाबी होत. सातारा येथील एका लाकडी घाणा प्रकल्पात विशेष प्रशिक्षणातून तेल निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया सखोलपणे समजून घेतली.

त्यातून पॅकिंग, साठवणूक, विक्री व्यवस्था यांचेही सविस्तर ज्ञान घेतले. या सर्व तयारींमुळे कानडे उद्योग यशस्वी उभारण्यास सज्ज झाले. अजून मोठे आव्हान पैशांचे होते. किमान दहा लाख रुपयांची आवश्यकता होती. शेतीतील नुकसानीमुळे आधीच कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. मात्र हार मानली नाही.

स्वतःकडील दोन लाख रुपयांचे भांडवल गुंतवले. घर बँकेकडे तारण ठेवून आठ लाखांचे कर्ज मिळवले. त्या जोरावर पुणे-नाशिक राज्य महामार्गावर नारायणगाव बायपास येथे जागा भाडेतत्वावर घेतली. मे २०१९ मध्ये स्वानंदी शतायू लाकडी घाणा या उद्योगाचा शुभारंभ झाला. नारायणगाव केव्हीकेचे संस्थापक व अध्यक्ष अनिलतात्या मेहेर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

उद्योगातील ठळक बाबी

कोइमतूर येथून विजेवर चालणारी दोन लाकडी घाणा यंत्रे खरेदी केली.

प्रत्येक यंत्र दररोज १०० किलो बियांपासून तेलनिर्मिती करते.

सुरुवातीला कमी अनुभवामुळे कच्चा माल जास्त दराने मिळे. परंतु हळूहळू बाजारपेठ आणि कच्च्या मालाच्या प्रतवारीची योग्य माहिती मिळत गेली. त्यातून योग्य दरात दर्जेदार कच्चा माल मिळण्यास मदत झाली.

कच्च्या मालाचे आजचे स्रोत

शेंगदाणा- बार्शी, धुळे, जळगाव, गुजरात.

करडई- लातूर, मंगळवेढा, कर्नाटकातील धारवाड.

मोहरी- उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान

नारळ, तीळ, बदाम, जवस- पुणे- गुलटेकडी

भांडवली गुंतवणूक

दोन घाणा यंत्रे प्रत्येकी तीन लाख रुपये याप्रमाणे सहा लाख रुपये, कच्च्या मालासाठी तीन लाख रुपये असे भांडवल गुंतवावे लागले. पॅकेजिंग व अन्य खर्चासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये खर्च झाले. मासिक भांडवलाचा विचार केल्यास जागेचे भाडे, मजुरी, कच्चा माल वीजबिल, पॅकिंग साहित्य,बॅंकेचा हप्ता असा काही लाखांहून मोठा खर्च येतो.

कानडे यांच्या अनुभवानुसार सुरुवातीची गुंतवणूक प्रामुख्याने यंत्रे व कच्च्या मालावर करणे महत्त्वाचे आहे. उद्योग सुरू झाल्यानंतर किमान पाच लाखांच्या खेळत्या भांडवलाच्या जोरावर अन्य मासिक खर्च हे विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून भागवता येतात. त्यातून हेच जाणवते की प्रारंभिक टप्प्यात भांडवली खर्च आणि नियमित खर्च यांचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आयुष्य आनंदी करणारे ब्रॅण्डनेम

कानडे यांनी आमचे मिशन आरोग्य संपन्न जीवन या तत्त्वावर आधारित खाद्यतेल उत्पादन सुरू केले.सुरवातीला कोणतेही विशिष्ट ब्रॅण्डिंग नव्हते. सर्व तेल एक लिटर पॅकिंगमध्ये विकले जायचे. मात्र ग्राहकांकडून विविध आकारांतील पॅकिंगची मागणी वाढू लागली. त्यानुसार आणि बाजारपेठेचा सखोल अभ्यास करून पॅकिंगमध्ये बदल सुरू केले. उद्योगाचे व उत्पादनांचे स्वानंद शतायू हे ब्रॅण्डनेम ठेवले. स्वानंद शतायू म्हणजे स्वआनंदाने १०० वर्षे निरोगी जगावे.

विक्री व उलाढाल

शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, मोहरी, तीळ, नारळ, जवस व बदाम यांच्यावर आधारित खाद्यतेलांची निर्मिती होते. प्रकारानुसार प्रति लिटर ३५०, ५०० ते तीन हजार रुपये दर आहेत. शंभर मिली ते पाच लिटरपर्यंतच्या आकर्षक पॅकिंगमधून विक्री होते. तेल असावं नैसर्गिक आणि शुद्ध! जीवनभर देईल निरोगी आयुष्य! असा संदेश उत्पादनांच्या माध्यमातून कानडे यांनी दिला आहे. अलीकडे घाण्यावरील तेलाला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. आहारतज्ज्ञही त्याच्या सेवनाबाबत सल्ला देत आहेत. मागील सहा वर्षांमध्ये मुंबई येथे सुमारे पाच वितरकांचे जाळे

तयार केले आहे. स्वानंद शतायू फूड्स नावाने नारायणगाव नजीक स्वतःचे आउटलेटही तयार केले आहे. प्रति महिना शेंगदाणा तेल ८०० ते ९०० लिटर, सूर्यफूल ४०० लिटर, करडई ३०० लिटर, जवस, तीळ आणि खोबरेल तेल प्रत्येकी ८० ते १०० लिटर अशी सरासरी विक्री होते. महिन्याला सात ते आठ लाख रुपयांची उलाढाल होते.योग्य नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि बाजारपेठांच्या गरजा ओळखून कानडे दांपत्याने आपला उद्योग यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक बनवला आहे हे सिद्ध होते.

कुटुंबाचे योगदान

राजेंद्र यांना उद्योगात आई सुभद्रा व पत्नी रेश्मा यांचा सिंहाचा वाटा आहे. २०१९ च्या दरम्यान उद्योगाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबातील सदस्यांनीच मोठा मानसिक पाठिंबा दिला होता. द्राक्ष शेतीतही आई व पत्नीने खूप कष्ट घेतले होते. व्यवसाय सुरू झाल्यावर राजेंद्र यांना कच्चा माल खरेदी आणि तयार माल विक्रीसाठी सतत बाहेर जावे लागे.

अशावेळी रेश्मा यांनी खंबीरपणे तेल निर्मिती आणि विपणनाची जबाबदारी सांभाळली. रथाची दोन्ही चाके एकसाथ फिरली तर त्याला गती प्राप्त होते हे वचन कानडे दांपत्याच्या जीवनात अनुभवण्यास मिळाले आहे. मुलगी पौर्णिमा सध्या जयपूर येथे मास्टर इन बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करते आहेत. तर मुलगा दुर्वेश अकरावीत शिकत आहे.

केव्हीकेचे मोलाचे मार्गदर्शन

व्यवसायाची संकल्पना रुजवण्यापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत नारायणगाव केव्हीकेने कानडे दांपत्याला विविध स्तरांवर सहकार्य केले आहे. प्रशिक्षणाबरोबरच येथील विषय तज्ज्ञांनी उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने, उत्पादनांचा दर्जा राखणे आणि विपणनामध्ये (मार्केटिंग) येणाऱ्या अडचणींवर बहुमोल सहकार्य केले. त्याचबरोबर प्रशिक्षण वर्ग व कृषी प्रदर्शनांमध्ये मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले. त्यामुळे उत्पादनांचा थेट ग्राहकांपर्यंत प्रसार होण्यास मदत झाली.

आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारा उद्योग

उद्योगातून कानडे कुटुंबाच्या जीवनात चांगले आर्थिक, सामाजिक बदल झाले आहेत. जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. आपल्या उत्पादनांमुळे ग्राहकांनाही आरोग्यदायी जीवनाचा मार्ग सापडल्याचा आनंद या कुटुंबाला आहे. दर्जेदार उत्पादन, योग्य आर्थिक शिस्त आणि नियोजन असेल तर कमी भांडवल असलेला उद्योगही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकतो असे राजेंद्र सांगतात. शेतीमाल मूल्यवर्धनात अनेक संधी आहेत. युवकांनी त्यांचे अवलोकन केले पाहिजे असे आवाहनही ते करतात.

राजेंद्र कानडे ९९६०३५१३३७

राहुल घाडगे ९४२२०८००११

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे येथे कृषी विस्तार विषय तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: नियतीनेच तोडला थुट्टे कुटुंबाचा ‘भरवसा’

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

Kharif Sowing: खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल

Maharashtra Agriculture Minister: कृषिमंत्री कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून परतले

Agri Officers Support: कृषिमंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी सरसावले

SCROLL FOR NEXT