Kanchan Patil And Agarbatti Business Agrowon
यशोगाथा

Agarbatti Business: अगरबत्ती उद्योगात तयार केला ब्रॅण्ड

Agarbatti Aradhana Brand: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंदुर्ले गावातील कांचन पाटील यांनी कोविडच्या संकटातून प्रेरणा घेत स्वतःचा अगरबत्ती व्यवसाय उभा केला. 'आराधना ब्रॅण्ड' नावाने सुरू केलेल्या या उद्योगातून त्यांनी महिला बचत गटांना रोजगार दिला आणि एक यशस्वी ग्रामीण ब्रॅण्ड निर्माण केला.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Women Success Story: आंदुर्ले (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील कांचन दीपेश पाटील यांनी अनेक अडचणींवर मात करत अगरबत्ती व्यवसायाला आकार दिला आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी अगरबत्ती उद्योगामध्ये चांगली वाढ करत ‘आराधना ब्रॅण्ड’ तयार केला. या उद्योगातून गावातील महिलांना रोजगाराची उपलब्धता करून दिली आहे. बचत गटाच्या माध्यमातून गावामध्ये विविध उपक्रमांना चालना दिली आहे.

कुडाळ-चिपी विमानतळ मार्गावर आंदुर्ले हे गाव आहे. गावशिवारात भातपिकांसह आंबा, काजू आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यात देखील काही शेतकरी भाजीपाला लागवड करतात. या गावातील उपक्रमशील महिला म्हणजे कांचन दीपेश पाटील. डीएड केल्यानंतर कांचनाईंनी गावातील खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम केले. त्यांचा विवाह २०२० मध्ये गावातीलच, परंतु पुण्यात नोकरीला असलेल्या दीपेश यांच्याशी झाला. लग्नानंतर दीपेश हे पुण्यामध्ये खासगी कंपनीमध्ये नोकरीला गेले तर कांचनताई गावातील एका खासगी शिक्षण संस्थेत ज्ञानार्जनाचे काम करू लागल्या.

२०२० मध्ये कोरोनामुळे मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून देशात लॉकडाउन झाले. या संकटात अनेकांचे रोजगार गेले. त्याला पाटील कुटुंबीय देखील अपवाद ठरले नाही. कोरोनाचा पहिला फटका कांचनताईंना बसला. शाळा बंद केल्यामुळे त्यांना संस्थेने काम थांबविण्यास सांगितले. त्यामुळे त्या पुण्याला नोकरीसाठी गेल्या. परंतु कांचन यांच्या पाठोपाठ पती दीपेश यांना देखील कोरोना संकटामुळे कंपनीने काम थांबविण्यास सांगितले. पाटील दांपत्यांवर आर्थिक संकट कोसळले. परंतु दोघेही डगमगले नाही.

कांचनताईंनी पुण्यातच एका अगरबत्ती उद्योगात नोकरी करण्यास सुरुवात केली. या उद्योगामध्ये कार्यालयीन काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु नवीन काहीतरी शिकण्याची असलेली ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी कार्यालयीन काम करताना अगरबत्ती कशी तयार करतात, कोणकोणत्या प्रकिया केल्या जातात, त्याचे पॅकिंग कसे केले जाते, अशा प्रकारे उत्पादन ते मार्केटिंगचा अभ्यास अवघ्या काही महिन्यांत केला.

अगरबत्ती उद्योगात काम करीत असतानाच कांचनताईंना आपण देखील हा उद्योग करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. अगोदरच आर्थिक चक्रात अडकल्याने मोठी जोखीम न घेता व्यवसायाचा विचार त्या करू लागल्या. पती सोबत चर्चा केल्यानंतर सुरुवातीला काम करीत असलेल्या कंपनीतून अगरबत्तीचा कच्चा माल खरेदी करून त्यावर सुगंधाची प्रकिया करण्याचा निर्णय घेतला. उत्पादित अगरबत्ती स्वतःच्या गावपरिसरात विक्री करण्याचे नियोजन केले.

अगरबत्ती विक्रीसाठी कांचनताईंनी कुडाळ-चिपी मार्गावर रस्त्यालगत हुमरमळा येथे आराधना सुगंधालय हे दुकान सुरू केले. कंपनीतून कच्चा माल घेऊन घरामध्ये अगरबत्तीवर प्रकिया करायची आणि तो विक्रीसाठी गावी सुगंधालयात पाठविण्यास सुरुवात केली. अगरबत्ती विक्री करण्याची जबाबदारी त्यांनी दीपेश यांची बहीण शिल्पा यांच्यावर सोपविली. काही प्रमाणात व्यवसायात जम बसत होता. अगरबत्ती व्यवसायाला किती संधी आहे याची जाणीव देखील त्यांना झाली.

अगरबत्ती निर्मितीला सुरुवात

फक्त कच्च्या मालावर प्रकिया करण्यापेक्षा आपणच स्वतः अगरबत्ती निर्मिती उद्योग सुरू करूयात, असा विचार करून २०२३ मध्ये कांचन आणि दीपेश हे पुणे सोडून आपल्या मूळ गावी आंदुर्ले येथे आले. राहत्या घराचा काही भाग व्यवसायाकरिता वापरण्याचे ठरविले. अगरबत्ती निर्मितीसाठी कांचनताईंना पती, सासू-सासरे,आज्जी या सर्वांची साथ मिळाली. सुरुवातीला अगरबत्तीवर केवळ परफ्युमिंगची प्रकिया केली जात होती.

परंतु व्यवसायात जम बसल्यामुळे स्वतः कच्चा माल तयार करण्यापासून ते परफ्युमिंगपर्यंतची प्रकिया करण्याचे ठरले. त्यानुसार व्यवसायासाठी आवश्यक प्राथमिक यंत्रसामग्री त्यांनी खरेदी करून व्यवसाय सुरू केला. व्यवसायात चांगला जम बसत असतानाच सासू-सासरे,आजी आणि कांचनताईंचे वडील ही सर्व मंडळी व्यवसायात मोलाचे मार्गदर्शन करीत होती. परंतु भक्कम साथ देणाऱ्या या चारही जणांचे वर्ष-सव्वा वर्षाच्या कालावधीत निधन झाले.

संघर्षामध्ये साथ देणारे सर्व जण सोडून गेल्याने दुःखाचा डोंगर पाटील दांपत्यांवर कोसळला. मात्र या भयावह संकटात देखील दोघेही खंबीर बनले. त्यांनी आलेल्या संकटाचा स्वीकार करीत बचत गटातील महिलांना साथीला घेऊन अगरबत्ती निर्मिती व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढविला आहे.

महिला बचत गटांना चालना

कांचनताई गृहलक्ष्मी बचत गटाच्या सदस्या आहेत.या गावात ‘उमेद’ अभियानांतर्गत २३ महिला समूहांची स्थापना करण्यात आली. यांपैकी अनेक गट विविध प्रकारची उत्पादने घेतात. संपूर्ण गावाचे अर्थकारण शेतीवर अवलंबून असल्याने गांडूळ खताची मागणी आहे. गावातील धनलक्ष्मी महिला समूह, दिशा महिला समूह आणि गुरुकृपा महिला समूह गांडूळ खत निर्मिती करतात. आंदुर्लाई महिला समूह कुक्कटपालन करतो. याशिवाय काही गटातील महिलांनी मालवणी मसाले, घावणे पीठ, तांदूळ पीठ, वडे पीठ, उडीद, कुळीथ पीठ निर्मितीतून चांगल्या प्रकारे आर्थिक उलाढाल करत आहेत. ‘उमेद’कडून २०२४ मध्ये कांचन पाटील यांना ‘लखपती दीदी’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

व्यवसायाचे नियोजन

कांचनताईंना अगरबत्ती व्यवसायामध्ये पाच वर्षांचा अनुभव आहे. अगरबत्तीला आवश्यक काडी वगळता बहुतांशी कच्चा माल स्वतः तयार करतात. अगरबत्ती तयार करण्यासाठी कोळसा पावडर ६० टक्के आणि लाकडाचा भुसा ४० टक्के असे प्रमाण असते.१२ टक्के गम पावडरचा वापर केला जातो. कोळसा आणि कच्चा भुस्सा प्रति किलो १६ ते १७ रुपयांनी खरेदी केला जातो. कांचनताईंनी बँकेकडून कर्ज घेऊन अगरबत्ती निर्मिती यंत्रणा, मिक्सर मशिन, क्रश मशिन आणि ड्रायर तसेच पॅकिंग मशिनची खरेदी केली.

यंत्रामुळे उत्पादनाची गती वाढली. स्वतः व्यवसाय करीत असताना अन्य ठिकाणी परफ्युमिंग करून विक्री करणाऱ्यांना कच्च्या मालाचा मालाचा पुरवठा केला जातो. काळी स्टिक प्रति किलो ७० रुपयांनी खरेदी केली जाते. पांढरी स्टिक प्रति किलो ९५ रुपयांनी खरेदी केली जाते.काळ्या स्टिकमधील तयार अगरबत्ती २५० रुपये प्रति किलो, तर पांढऱ्या स्टिकमधील अगरबत्ती प्रति किलो ५०० रुपये या दराने विक्री केली जाते. प्लॅस्टिक बाटली, पाउच, डब्यांमध्ये अगरबत्ती पॅकिंग केले जाते.

सध्या फळे, फुले, अत्तराचा सुगंध असलेल्या सोळा प्रकारच्या अगरबत्तींची निर्मिती होते. अगरबत्तींची विक्री ‘आराधना ब्रॅण्ड्र नावाने केली जाते. दर महिन्याला तीन टन अगरबत्ती निर्मिती होते. दर महिन्याला दीड लाखाची उलाढाल या व्यवसायातून होते. सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्यात अगरबत्तीचा पुरवठा केला जातो. या व्यवसायात तीन स्थानिक महिलांना बारमाही रोजगार मिळाला आहे. याशिवाय हंगामनिहाय बचत गटातील चार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन आजाराचा पशुधनात वाढता धोका

SCROLL FOR NEXT