
Agriculture Success Story : बीड जिल्ह्यातील उदंडवडगाव हे गाव. येथील डोळस कुटुंबीयांची चौदसवाडी शिवारात तीन एकर शेती आहे. या शेतीला तीन वर्षापासून मक्त्याने घेतलेल्या तीन एकर शेतीची जोड दिली आहे. साधारणतः १२ वर्षांपासून अर्जुनराव डोळस व त्यांची मुले संदीप आणि किशोर प्रामुख्याने फळभाज्यांच्या लागवडीचे नियोजन करतात. त्यांच्या शेतीचे प्रमुख वैशिष्ट्य़ म्हणजे शेडनेटमधील संरक्षित शेती. शेडनेटमध्ये ढोबळी मिरची पीक घेतात. संरक्षित शेती असो, की खुल्या शेती मल्चिंग, ठिबक सिंचन आणि पीक विविधतेचा प्रभावी वापर करतात. शेतीतील कामाची विभागणी ठरलेली आहे.
संदीप संपूर्ण शेतीची देखभाल, वेळेवर लागवड, कीडनाशकांच्या फवारणी, खते आणि सिंचनाचे व्यवस्थापन सांभाळतात. या कामात आई कमलबाई अर्जून डोळस यांची भक्कम साथ मिळते. किशोर बाजारपेठेची माहिती, संपर्क, विक्री, वाहतूक या जबाबदारी सांभाळतात. वेगवेगळ्या बाजारपेठांतील व्यापाऱ्यांशी संपर्कात राहून मालाला जास्तीत जास्त दर मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सर्वात मोठा भाऊ रवी वडिलांनी ३३ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या वाहन दुरुस्ती गॅरेजची जबाबदारी सांभाळतात. त्याला वडील अर्जूनरावांच्या अनुभव आणि मार्गदर्शनाचा फायदा होतो. एकत्र कुटुंबामध्ये शेती आणि गॅरेजसारखा जोड व्यवसाय या दोन्ही बाजू बळकट ठेवल्या आहेत.
ढोबळी मिरची - नफा देणारे पीक
एक एकर शेडनेटमध्ये गेल्या ७ वर्षांपासून ढोबळी मिरची पीक घेतले जाते. त्याचा लागवड चार फूट बाय सव्वा फूट अंतरावर असते. रोपे, खते, कीडनाशके, मल्चिंग, मजुरी यांचा सुमारे दीड लाखापर्यंत खर्च येतो. आजवर उत्पादनाची सरासरी २२ ते २५ टन इतकी राहिलेली आहे. दरामध्ये २० ते ५० रुपये प्रतिकिलो अशी चढउतार होत असली तरी एकरातून ५ ते ७ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती येते. बऱ्यापैकी ३ ते ५.५ लाखापर्यंतचे निव्वळ व शाश्वत उत्पन्न त्यातून मिळत असल्याचा संदीप यांचा अनुभव आहे.
उन्हाळ्यातील उत्पन्नाचे साधन
डोळस बंधू उन्हाळ्यात टरबुजाची लागवड दोन एकरावर करतात. तीन वर्ष त्यांनी पावसाळ्यात टरबूज लावण्याचा प्रयोग केला होता. या पिकाला लागवडीपासून काढणीपर्यंतचा एक ते सव्वा लाख रुपये खर्च येतो. पाच बाय सव्वा फूट अंतरावर लागवड केल्या जाणाऱ्या टरबुजातून साधारणतः २० ते २२ टन एकरी उत्पादन मिळते.
त्याला सुमारे ८ ते १० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. त्यामुळे अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत मिळते. खर्च वजा जाता दीड ते पावणेदोन लाख निव्वळ उत्पन्न हाती येते. टरबुजाची विक्री थेट शेतावरून व्यापाऱ्यांकडे केली जाते. त्यामुळे वाहतूक खर्च वाचतो आणि दर परवडतात असे किशोर सांगतात.
खरबुजाची लागवडही दोन एकरमध्ये केली जाते. एकरी १५ ते १७ टन उत्पादन मिळते. दर २० ते २५ रुपये प्रतिकिलो मिळतो. खर्च सुमारे दीड लाख रुपये, तर उत्पन्न दराच्या चढ उतारानुसार कमी अधिक परंतु तीन ते चार लाख रुपयांपर्यंत मिळाल्याचा आजवरचा अनुभव आहे. निव्वळ नफा १.५ ते २.७५ लाख रुपये राहतो. खरबुजाच्या विक्रीसाठी थेट बांधावरून किंवा बीड व छत्रपती संभाजीनगरला पाठवणे असे दोन्ही पर्याय खुले ठेवलेले असतात.
टोमॅटो – जोखमीचे पीक, पण सातत्य
टोमॅटो दरातील चढ उतारामुळे खरेतर जोखमीचे पीक आहे. पण त्यामध्येही त्यांना सुमारे सहा वर्षापासून सातत्य ठेवले आहे. टोमॅटोची लागवड जूनमध्ये दोन एकर स्वतःच्या तर एक एकर मक्त्याने घेतलेल्या शेतात करतात. एकरी १५०० ते २००० कॅरेट उत्पादन मिळते. (प्रति कॅरेट सुमारे २० किलो टोमॅटो बसतात.) टोमॅटो दरामध्ये चढउतार मोठी असून, कधी प्रति कॅरेट ५० रुपयांवर समाधान मानावे लागते, तर कधी १५०० रुपये प्रति कॅरेटचा दरही घेतला आहे.
२०२०–२१ मध्ये खरिपातील टॉमॅटोला दर कमी मिळाल्याने नुकसान झाले तरी न घाबरता पुन्हा रब्बीत लागवड केली तर चांगला फायदा देऊन गेले. २०२३ मध्ये पाण्याच्या कमतरतेने अपेक्षेप्रमाणे उत्पादन व दर्जा मिळाला नाही. अशा अडचणी असल्या तरी त्यांनी टोमॅटो पिकात सातत्य कायम ठेवले आहे. कारण या पिकामध्ये नुकसानीची जितकी शक्यता असते, तितकाच अधिक फायदा देणारे हे पीक असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
संरक्षित शेतीसाठी गुंतवणूक, शहाणपणाने केली बचत
सुमारे दहा वर्षांपूर्वी शासनाच्या योजनेतून ४० टक्के अनुदानावर एक एकर शेडनेट घेतले. यंदा स्वखर्चातून दोन एकर शेडनेट बांबूच्या साहाय्याने कमी खर्चात उभारले. स्ट्रक्चरसाठी बांबू २४ हजार रुपये, मल्चिंगसाठी ३० हजार रुपये, तारांसाठी २५ हजार रुपये, शेडनेटसाठी १.५० लाख रुपये असा एकूण २.२५ लाख रुपये खर्च त्यांना आला.
कामासाठी मजुरीचा खर्च ५४ हजार रुपये आला असता मात्र अर्जुनराव, संदीप, किशोर आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी सर्व कामे केली. त्यामुळे मजुरीखर्चात ३० हजार रुपयांपर्यंत बचत झाली. कोणत्याही कामामध्ये एकत्र येत तडीला नेण्याच्या या वृत्तीमुळेच डोळस कुटुंबीय प्रगती करत आहेत.
सिंचनाची अशी आहे सोय
डोळस बंधूकडे दोन बोअरवेल, एक विहीर आणि २०१२ मध्ये शासन योजनेतून मिळालेले ३१ बाय ३१ मीटरचे शेततळे, सोलर पंप अशी सिंचनाची सोय आहे. या बऱ्यापैकी शाश्वत पाणी पुरवठ्याच्या बळावरच स्वतःच्या शेतीसोबत आणखी मक्त्याने तीन एकर अशी संपूर्ण शेती ठिबक सिंचनवर केली जाते.
याविषयी संदीप म्हणाले, की वाफसा स्थिती टिकविण्याइतपत पाण्याचा पुरवठा ठिबकद्वारे केला जातो. पिकाच्या सुरुवातीच्या काळात पंधरा ते वीस मिनिट असलेला ठिबक चालविण्याचा काळ गरजेनुसार तासापर्यंत वाढवला जातो. पिकाच्या वाढीची स्थिती आणि त्या त्या वेळची गरज यानुसार खते देण्यावर भर असतो.
आमची ‘खरबुजाची राणी’
आपल्याला साथ देणाऱ्याची कृतज्ञता व्यक्त करण्यात शेतकरी कधीही मागे राहत नाही. खरबूज पिकात डोळस बंधूंनी आजवर सातत्य ठेवले आहे. २०१८ मध्ये केलेल्या दोन एकर खरबुजाने चक्क सात लाख रुपये मिळवून दिले. त्याच पैशातून त्यांनी शेतीमाल वाहतुकीसाठी चारचाकी वाहन खरेदी केले आणि त्याला नाव दिले - खरबुजाची राणी. आजही या गाडीकडे पाहिले की एक आत्मिक समाधान मिळत असल्याचे संदीप व किशोर सांगतात.
या बाजारपेठांशी थेट कनेक्शन
आपल्या उत्पादित शेतीमालाच्या विक्रीसाठी किशोर डोळस हे आजवर लातूर, परभणी, नांदेड, छत्रपती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, बीड, कळंब,अहिल्यानगर, नारायणगाव, चाकण आदी बाजारपेठांमध्ये स्वतः गेले आहेत. त्या विषयी ते सांगतात, की कोणत्याही बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांशी थेट संपर्क आणि प्रत्यक्ष ओळख करून घेणे फायद्याचे ठरते. कारण त्यातून दोघांमध्ये एकमेकांप्रति विश्वास निर्माण होतो.
दरांचे अंदाज बऱ्यापैकी आधीच मिळतात. प्रत्यक्ष संपर्कांतून खात्री केल्यानंतरच त्या बाजारात माल नेण्याचे नियोजन करतो. त्यातही त्या बाजारपेठेत मध्यरात्री १२ पर्यंत पोचण्याचे नियोजन केले जाते. आजवरच्या अनुभवातून आपल्याला टोमॅटोसाठी नारायणगाव, खरबुजासाठी छत्रपती संभाजीनगर, ढोबळी मिरची व टरबूज आपल्याला जागेवरून व्यापाऱ्याला देणे परवडल्याचे किशोर सांगतात.
संदीप डोळस, ८३८०८९०२०२
किशोर डोळस, ९२८४३०६९६९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.