Kasalganga Pattern
Kasalganga Pattern Agrowon
यशोगाथा

Drought : पूर आणि दुष्काळमुक्तीचा कासाळगंगा पॅटर्न

टीम ॲग्रोवन

डॉ. सुमंत पांडे

सो लापूर जिल्ह्यातील एका ओढ्याची कासाळगंगा (Kasalganga) कशी झाली याची आपण आज चर्चा करणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुके, २३ गावांमधून ४२ किलोमीटरचा ओढा, मागील सुमारे तीन दशकापूर्वी खळखळ वाहत असे. तथापि, गेल्या तीन दशकांमध्ये झालेल्या काही बदलांमुळे हा ओढा गाळाने पूर्णपणे बुजला गेला आहे.

पूर्वी सुमारे २०० ते २५० फूट रुंदी असलेला आणि ८ ते १० फूट खोल असलेला ओढा आता केवळ ३० फूट रुंद आणि उथळ झालेला आहे. परिणामी, पूर आणि दुष्काळाची वारंवारता वाढत आहे. २०१५ -१६ या कालावधीमधील दुष्काळ गंभीर होता. गाव सोडून परागंदा होण्याची स्थिती या गावांची होती. या गावातील सगळ्यात मोठे आणि दाट लोकवस्तीत गाव म्हणजे महूद होय. या गावासारखी सुमारे २३ गावे या ओढ्याच्या काठी वसलेली आहेत.

काही प्रमुख गावे

सांगोला पंढरपूर माळशिरस

कटफळ गार्डी शिन्गोर्ली

चिकमहूद लोणारवाडी बचेरी

महूद पळशी

महिम सुपली

खिलारवाडी वाडीकुरोली

गायगव्हाण भांडी शेगाव

उपरी

शेळवे

कमी अधिक फरकाने सगळ्या गावांची ही स्थिती होती. त्यापैकी ठळक उदाहरण सांगायचे झाल्यास कटफळ हे गाव, कासाळगंगाचे उगमस्थान. या गावात सुमारे तीन हजार एकर वन जमीन आहे, तेथून सुरू होणारा हा ओढा पंढरपूर येथे चंद्रभागेला मिळतो. परंतु गेल्या ३० वर्षांपासून क्वचितच हा शांतपणे चंद्रभागेला मिळाला असेल. मे २०१६ मध्ये दुष्काळाची तीव्रता पाहून लोकांनी ओढ्यावर काम करण्याचे ठरले ठरविले.

कासाळगंगेचा अभ्यास

शास्त्रीय अभ्यासामध्ये पाणलोटाचा अभ्यास, ओढ्याचा अभ्यास, करावयाची कामे आणि त्यांचा प्राधान्यक्रम या सगळ्यांची मांडणी करून काम सुरू झाले. तज्ज्ञांनी आखून दिलेल्या नकाशानुसार काम सुरू झाले. सुरुवातीला पैशाची उपलब्धता नव्हती. तथापि, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर स्थानिकांनी काम सुरू केले. लोकांनी यथाशक्ती योगदान दिले. सुरुवातीला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून यंत्र पुरविण्यात आली, तसेच लोकसहभागातून इंधन पुरवण्यात आले. २०१६ मध्ये मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीचे पाच किलोमीटरचे काम झाले. २०१७ मध्ये काम सुरू झालेले काम २०१९ मध्ये काम संपले. कासाळगंगा ओढ्यावरील सांगोला,माळशिरस, आणि पंढरपूर हे तीन तालुके येतात.

लोकांना मिळाली प्रेरणा

महूद गावात काम सुरू झाल्याची बातमी आसपासच्या गावात पोचली.लोक काम बघायला देखील आले. कामाची प्रेरणा घेऊन आपल्या गावात देखील काम करू या असा संकल्प करून ते आपापल्या गावी पोहोचले, परंतु त्यांना स्वस्थ बसवेना. काम करण्याची तीव्र इच्छा शक्ती होती. संपूर्ण ओढ्याचा अभ्यास झालेला होता. उगमापासून महूदपर्यंत असलेली गावे पुढे आली, त्याचप्रमाणे महूदपासून चंद्राभागेपर्यंतच्या अनेक गावांनी याचा कित्ता गिरवला.

सुमारे २३ गावे या ओढ्याच्या काठी आहेत. या ग्रामपंचायत हद्दीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील तरुण, उत्साही नागरिक, महिला यांनी सहभाग घेतला आणि कामाला सुरुवात झाली. सुमारे दोन वर्षांत हे काम पूर्ण झाले, तथापि काही कारणांमुळे शेवटच्या टप्पा राहिला आहे. या कामासाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन (जलयुक्त शिवार), टाटा ट्रस्ट, जेएनपीटी, आर्ट ऑफ लिव्हिंग, रयत शिक्षण संस्थेचे सहकार्य मिळाले. याचबरोबरीने कृषी, महसूल, वने, सामाजिक वनीकरण, लघू पाटबंधारे, जलसंपदा अशा विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सुरुवातीच्या टप्प्यात डॉ. राजेंद्र सिंह आणि सुनील जोशी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आणि त्यांचा उत्साह वाढवला.

लोकसंख्या ७६,२९६

भौगोलिक क्षेत्र ३६,२७४ हेक्टर

कोरडवाहू क्षेत्र ११,०७७ हेक्टर

वन क्षेत्र १,३५३ हेक्टर

सरासरी पर्जन्यमान ५३८ मिमी

कामाची फलश्रुती

पाण्याच्या उपलब्धतेनुसार, पीक पद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली. विहीर पुनर्भरण, कूपनलिका पुनर्भरण, छतावरील पाण्याचे संकलन इत्यादी कामे हाती घेतली. बेचाळीस किलोमीटरमधील कामामधून सुमारे २८,३८,६७९ घ.मी. गाळ निघाला. या गाळामुळे सुमारे ४७३ हेक्टर क्षेत्र नव्याने लागवडीखाली आले. या प्रकल्पासाठी विविध संस्था आणि शासनाच्या माध्यमातून सुमारे ८ कोटी रुपये खर्च आला. यामध्ये सुमारे ३ कोटी रुपयांचा लोकवाटा होता.

दुष्काळापासून मुक्ती

कटफळ : २०१७ पूर्वी येथे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नव्हती, तेव्हा शेतीचा विचारदेखील करायला नको. उपजीविकेसाठी येथील सुमारे ७० टक्के लोक मजुरीसाठी वसई,विरार इत्यादी ठिकाणी जातात. तसेच ऊस तोडणी मजूर म्हणून सांगली, सातारा येथे जातात. गावाची परिस्थिती हलाखीची होती. परंतु जल, मृद्‌ संधारणामुळे येथे ८० टक्के जमीन सिंचनाखाली आली. रोजची भाजीपाला विक्रीतून सुमारे ५० लाख उलाढाल होते. या गावशिवारातून कोलकाता, पाटणा येथे सुमारे १० टन ढोबळी मिरची जाते. व्यापारी बांधावर येऊन व्यवहार करतात. आता कामासाठी लोकांचे स्थलांतर शून्यावर आले आहे. येथेच आता मजुरांची चणचण भासते आहे. हा बदल केवळ शाश्वत पाण्याच्या उपलब्धतेमुळे झाला आहे. गावामध्ये बॅंकेची शाखा सुरू झाली.

महूद ः येथील लागवडी खालील क्षेत्र सुमारे ३६४२ हेक्टर, पैकी सुमारे १६०० हेक्टर सिंचनाखाली. गाळ वापरून सुमारे ५२ हेक्टरमध्ये वाढ. फळबाग, भाजीपाला इत्यादी लागवड क्षेत्रात सुमारे ३० टक्के वाढ. दरडोई उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा अधिक आहे.

महीम : या शिवारात देखील दुष्काळी परिस्थिती होती. तथापि परंपरेने दुधाचा व्यवसाय करणारे लोक या गावात आहेत. पूर्वी परिसरातील गावातून वैरण विकत घेतली जायची;अगदी दिघंची इतर ठिकाणाहून वैरण विकत आणली जायची. त्या वेळी दररोज सुमारे १२,००० लिटर दूध उत्पादन होत असे. जलसंधारणाच्या कामामुळे आता वैरण लागवडीसाठी पाणी उपलब्ध झाले. दूध वाढले. आता दररोज सुमारे ३२,००० लिटर दूध संकलन आहे.

पुरापासून मुक्ती : २०२१ मध्ये एकाच दिवशी अति पावसामुळे पाणी गावात येऊ लागले. तथापि, कासाळगंगेवर योग्य पद्धतीने काम केल्यामुळे पावसाचे पाणी नदी वाटे चंद्रभागेला मिळाले. हे काम झाले नसते, तर हजारो हेक्टर जमीन खचली असती वित्त आणि जीवित हानी देखील झाली असती, असे गावकरी सांगतात.

पुरस्कार : या कामासाठी केंद्र सरकारच्या जलसंपदा मंत्रालयाने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी देशातील सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत म्हणून महूद गावाला पुरस्काराने गौरविले आहे. या शिवाय इतर अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

डॉ. सुमंत पांडे

माजी कार्यकारी संचालक,

जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे

९७६४००६६८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT