Agriculture Success Story : सांगली जिल्ह्याचे कोकण असलेल्या शिराळा तालुक्याच्या वारणा खोऱ्यातील पश्चिम भाग भात पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १५०० ते २००० मिमी. आहे. देशी वाणांसह काळानुसार संकरित भातवाण घेण्यासही इथला शेतकरी प्राधान्य देत आहे. शेती तुकड्यांमध्ये असल्याने बहुतांश ग्रामस्थ उदरनिर्वाहासाठी मुंबईला स्थलांतरित झाले. पण भात लागवड आणि काढणी हंगामात येण्यामधून गावकऱ्यांनी गावाची नाळ कधी तुटू दिलेली नाही.
तालुक्यातील वाणसंपदा
शिराळा जाडा, वरंगाळ, दोडगा, तुलशीभात, मासाड, जोंधळा, कोल्ह्याची शेपूट, बकासूल हे या भागांतील पारंपरिक भातवाण. त्यांची पिढ्यान् पिढ्या शेती व्हायची. पण बाजारातील मागणीव दर पाहता विक्रीवर मर्यादा आल्या होत्या. या वाणांना पुन्हा ऊर्जितावस्था देण्याची गरज होती.
तालुक्यातील चिंचेवाडी येथील सत्तावीस वर्षे वयाचा स्वप्नील संभाजी सुतार हा तरुणत्यासाठी पुढे आला. बी.एस्सी. (वनस्पतिशास्त्र), कृषीतील पदविका व बहिःस्थ ‘एमबीए’अशी त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. कृषी पर्यवेक्षक गणेश क्षीरसागर व कृषी सहायक एकनाथ भोसले यांच्या मदतीने त्याने भात लागवड आणि विक्री साखळी उभारण्यासाठी शेतकरी पुरुष बचत गट स्थापन करण्याचे ठरवले.
बचत गटांद्वारे भातवाणांची शेती
तिघांच्या प्रयत्नांतून २०१९ मध्ये ‘बळीराजा’, ‘खरेश्वर’, ‘ज्योतिर्लिंग’, ‘सह्याद्री’, ‘जय हनुमान’ अशा पाच गटांची स्थापना झाली. त्या माध्यमातून भात लागवड सुरू झाली. मात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे भाताच्या विविध वाणांची मागणी केली. त्यातून ३६ वाण उपलब्ध करून देण्यात आले. यात प्रामुख्याने गोविंदभोग, काळा नमक, बासमती, मधुराज ५५, रक्तशाळी, शष्टीशाळी, रत्ना ७, आंबेमोहोर आदींचा समावेश राहिला. गटातील साठ ते सत्तर शेतकरी पुढे आले. ‘एसआरटी’, चारसूत्री, ‘एसआरआय’ आदी पद्धतीद्वारे त्यांनी भातशेती सुरू केली.
बाजारपेठेचे प्रयत्न
कंपनीचे कार्यकारी संचालक संभाजी सुतार सांगतात, की आमच्या भागातील शेतकरी आठवडी बाजारात भात कांडून तांदूळ विक्री करतो. या भागात पर्यटनास आलेल्या ग्राहकांकडून व काही व्यापाऱ्यांकडूनही खरेदी होते. मात्र या पद्धतीत तांदळाला उठाव नव्हता.
गटातर्फे घेत असलेल्या वाणांच्या तांदळाला बाजारपेठा मिळण्यासाठी कृषी- आत्मा विभाग यांच्यासोबत चर्चा झाल्या. गावांमध्ये होणाऱ्या यात्रांमध्ये तांदूळ महोत्सव भरविला तर मार्केटला दिशा मिळेल असा सूर गटातील सदस्यांमधून आला. त्यानुसार २०२१ मध्ये पणुंब्रे गावात यात्रेनिमित्त तांदूळ महोत्सवाचे आयोजन झाले.
त्या वेळी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांना विविध वाणांच्या तांदळाच्या खरेदीसाठी हाक देण्यात आली. तांदळाची उत्तम गुणवत्ता व विश्वासार्हता या बळावर व्यापाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कृषी प्रदर्शने, धान्य महोत्सव यातून तांदळाचा उठाव होऊन अपेक्षित दरही मिळू लागला.
अजून गट जोडले गेले
साहजिकच अन्य गावांमधील शेतकरी या गटाकडे आपोआप जोडले गेले. ‘जय बजरंग बली’,‘ज्ञानेश्वर माउली’, दत्तगुरू, ‘मळाई देवी’, ‘मळाई देवी कृषी विज्ञान मंडळ’, ‘सह्याद्री स्वयंसाह्यता’,‘ज्योतिर्लिंग’ आदी गटही पूर्वीच्या गटांशी जोडले गेले. त्या माध्यमातून ४०० ते ६०० एकर क्षेत्रात गोविंदभोग, काला नमक, मधुराज-५५, रक्तसाळ, रत्ना-७, इंद्रायणी, आंबेमोहोर, काला मूँछ, बासमती, शिराळा, जोंधळा आदी वाण पिकू लागले.
कंपनीची स्थापना
बाजारपेठेत आपला ब्रॅण्ड तयार होण्याची गरज या शेतकऱ्यांना वाटू लागली. त्यातूनच १९ मार्च २०२४मध्ये चांदोली कोयना परिसर शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना झाली. तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार वेताळ यांचे त्यासाठी सहकार्य लाभले. त्यासाठी स्वप्नील सुतार, तानाजी मोहिते, सोमनाथ पाटील, सुजय देशपांडे हे संचालक तर संभाजी सुतार, विश्वास कारंडे, शिवाजी मोहिते, संजय देशपांडे, सखाराम पाटील हे शेतकरी एकत्र आले. त्यातून एक लाख रुपये भांडवल उभे राहिले. अंकुश पाटील, प्रकाश भाष्टे, रितेश पाटील हे देखील कंपनीसोबत जोडले आहेत.
स्वप्नील सुतार ९१३०४०६९४६
कार्यकारी संचालक, शेतकरी कंपनी
कंपनीच्या सुविधा
सुमारे ३६ भातवाणांची कंपनीची बियाणे बँक.
तीन शेतकऱ्यांकडून या वाणांचे संवर्धन. त्यांच्या शेतातही वाणांचे प्रात्यक्षिक. फुटवे, लोंब्या, रंग, पोषणद्रव्ये आदी गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भाने या वाणांचा अभ्यास. हे बियाणे खरेदी करून गटातील शेतकऱ्यांना होते विक्री.
कंपनीकडे पाच पॉवर टिलर्स, भात मळणी यंत्रे, १० भात कापणी यंत्रे, ४० टन क्षमतेचे पॅक हाउस या सुविधाही आहेत.
प्रातिनिधिक उत्पादन किलो प्रति गुंठा
इंद्रायणी- ८५ ते ९०
काला नमक- ६५ ते ७० किलो
काही वाणांची वैशिष्ट्ये
कमी ग्लायसेमिक इंडेक्स. त्यामुळे आरोग्यासाठी हितकारक.
जस्त, लोहाचे चांगले प्रमाण.
स्वाद उत्तम.
कंपनीच्या कार्यपद्धतीविषयी
शिराळा, पाटण व शाहूवाडी भागातील शेतकरी हे कंपनीशी जोडले आहेत. अंदाजे १५०० पर्यंत शेतकऱ्यांची संख्या.
प्रचितगड ब्रॅण्डने विविध वाणांच्या तांदळाची विक्री. वाणांमधील पोषक घटकांची प्रयोगशाळेत झाली तपासणी. ग्राहकांमध्ये त्याद्वारे पटवून देण्यात येते वाणांचे महत्त्व.
चांदोली, गणपतीपुळे हा पर्यटनस्थळी शिराळा भागातून जाता येते. ते इथला तांदूळ खरेदी करतात. शिवाय सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांच्या हद्दी जवळ असल्याने येथील सातशेपर्यंत थेट ग्राहक मिळाले आहेत. कृषी प्रदर्शने, धान्य महोत्सवातही तांदूळ विक्रीस ठेवला जातो. दर्जा, गुणवत्ता उत्कृष्ट असल्याने मुंबई, पुणे व अन्य शहरांतील पर्यटकांकडून या तांदळाला पसंती.
तांदळाचे घावूक दर
(प्रति किलो)
इंद्रायणी ६५
गोविंदभोग ७५
रत्ना ७ ८०
मधुराज ८०
काला नमक १५०
विक्री
वर्ष विक्री (टन)
२०२१-२२ २०
२०२२-२३ ३०
२०२३-२४ ५०
चांदोली कोयना परिसर शेतकरी उत्पादक कंपनीचा साडेसात लाखांचा प्रकल्प आहे. पंतप्रधान सूक्ष्म उद्योजकता अभियानातून ‘मिनी राइस मिल’साठी कंपनीला पाच लाखांचे कर्ज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कंपनीचा अजून विस्तार होण्यास मदत होईल.- किरण पवार, तालुका कृषी अधिकारी, शिराळा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.