Paddy Variety : किमया काळ्या भाताची!

Kala Jeera Rice : चीनमध्ये एका आरोग्य परिषदेमध्ये गेलो असता मला ‘काला जिरा’ या स्वादिष्ट भाताची चव पहिल्यांदा चाखायला मिळाली. सध्या ‘सुपर फूड’ म्हणून ओळखला जाणारा हा तांदूळ चीनमध्ये ६२ टक्के, तर आपल्या देशात जेमतेम ५ टक्के पिकविला जातो.
Kala Jeera Rice
Kala Jeera RiceAgrowon
Published on
Updated on

Organic Farming : आंतरराष्ट्रीय कृषी संघटनेच्या ७५ राष्ट्रांच्या एक हजार प्रतिनिधींची पाच दिवसांची ३२ वी त्रैवार्षिक परिषद नुकतीच भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

प्रत्येक वेळी या परिषदेसाठी यजमान राष्ट्र एक घोषवाक्य तयार करते. या घोषवाक्यावरच पुढील तीन वर्षे सदस्य राष्ट्रांनी काम करावे, असे अपेक्षित असते. या वर्षी आपला देश यजमान राष्ट्र असल्यामुळे आपण तयार केलेले घोषवाक्य आहे - ‘शाश्‍वत कृषी अन्नप्रणालीकडे परिवर्तन.’

शाश्‍वत कृषी अन्नप्रणाली म्हणजे निसर्गाशी समतोल राखत शरीरास पोषक असे धान्य उत्पादन घेणे. लहान शेतकरी हे भारताच्या अन्नसुरक्षेची सर्वांत मोठी ताकद असून, या शेतकऱ्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले, तर त्यांच्या शाश्‍वत शेतीमधून पोषक आहाराबरोबरच देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळू शकते. आज भारतामधील शेतकरी अशा प्रकारच्या शाश्‍वत कृषी अन्नप्रणालीमध्ये समाविष्ट आहेत काय? याचे उत्तर नकारार्थी आहे.

अल्पभूधारक शेतकरी प्रत्येक वर्षी सोयाबीन आणि कापूस पेरून शेतीला अशाश्‍वत करीत आहेत. थोडक्यात, सध्याच्या वातावरण बदलाच्या प्रभावाखाली त्यांची शेती ही भरवशाची राहिली नाही. यास मुख्य कारण म्हणजे या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची सोडलेली कास!

वातावरण बदलाच्या प्रभावाखालीसुद्धा सेंद्रिय शेती आणि पारंपरिक बी-बियाणे आपणास शाश्‍वत उत्पादन देतात. ते पोषकही असतात. आणि सेंद्रिय शेतीत जमिनीचा कस सुधारतो. अशी जमीन अधिक पाणी धरून ठेवते. अशा जमिनीत पाणीही अधिक मुरते.

‘एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य’ या सर्वसमावेशक दृष्टिकोनातून शाश्‍वत शेती आणि अन्न व्यवस्थेपुढील आव्हाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सहज पेलली जाऊ शकतात.

आज शेतकऱ्‍यांनी असे अन्न तयार करावयास हवे जे विषमुक्त तर असेलच त्याचबरोबर खाणाऱ्‍यांसाठी ते पोषणयुक्त आरोग्यदायीही असले पाहिजे. महाराष्ट्रामधील पिवळी ज्वारी, ओडिशामधील कालाजिरा भात, तर मणिपूरमधील काळा भात ही यातील काही सुंदर उदाहरणे आहेत.

Kala Jeera Rice
Rice Export : एक हजार टन बिगर-बासमती पांढरा तांदूळाच्या निर्यातीस केंद्राची मान्यता; नामिबियाला जाणार भारताचा तांदूळ

महाराष्ट्रामधील विशेषतः मराठवाडा, खानदेशात ६-७ दशकांपूर्वी जवळपास सर्व अल्पभूधारकांच्या शेतात असणारी पिवळी ज्वारी आता लोप पावली आहे. तिच अवस्था खपली म्हणजेच जोड गव्हाची.

ओडिशामधील कालहंडी भागातील कालाजिरा भात, मणिपूरमधील काळा भात हे शाश्‍वत सुरक्षित अन्नाचे उत्कृष्ट प्रकार आहेत, जे आज राजाश्रय मिळाल्यामुळे अल्पभूधारकांना चांगलाच आधार देत आहेत. पण अजूनही हजारो लहान शेतकरी यापासून दूर असल्याने त्यांची महाग किंमत सर्वसामान्य नागरिकांना त्यापासून दूर ठेवत आहे.

कृषी शास्त्रज्ञांनी अशा उत्कृष्ट प्रजातीवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांचे उत्पादन चार-पाच पट कसे वाढेल, हे पाहायला हवे. ओडिशामधील कालाजिरा तांदळाच्या बाबतीत हे खरे ठरले. आज या भाताचे उत्पादन पूर्वोत्तर राज्यांत विशषत: मणिपूरमध्ये जास्त होते. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला हा ५०० ते ९०० रुपये किलो असलेला सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला तांदूळ सध्या फक्त श्रीमंताच्याच ताटात आढळतो.

चीनमध्ये उत्पत्ती, तेथील हजारो वर्षांचा इतिहास, पेरल्यानंतर अतिशय कमी उत्पादन, पण औषधी गुणधर्माने परिपूर्ण म्हणून तेथील राजे-महाराजांच्या आहारात समाविष्ट, हे कालाजिरा भाताचे गुणवैशिष्ट्ये.

थोडक्यात, शेतकऱ्‍यांच्या शेतात पिकणारा आणि फक्त राजे-महाराजे यांच्याच ताटात शोभणारा हा काळा भात कृषी शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांतून सर्वसामान्य ग्राहकांच्या ताटात योग्य किमतीत आणून शेतकऱ्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशानेच केंद्र शासनाने अल्पभूधारकांनी सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचे धोरण आखले आहे.

मागील अर्थसंकल्पात यास प्राधान्य सुद्धा दिले आहे. मणिपूर, आसाम, मेघालयमध्ये अल्पभूधारकांना हा भात पिकविण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्राच्या मदतीने आता प्रोत्साहन देण्यात येत आहे.

हृदयविकार, कर्करोग प्रतिबंधक शक्ती, मधुमेह नियंत्रण, वजन कमी करणे, दीर्घायुषी इत्यादी औषधी गुणधर्म असलेला हा तांदूळ आपल्या देशामधून परदेशात विशेषतः अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात पाठविला जातो.

Kala Jeera Rice
Paddy Cultivation : भात लागवडी उरकल्या

आपण मात्र स्वस्तात मिळणारा पांढरा भात खाऊन या अनेक रोगांना आमंत्रित करतो आणि महिन्याच्या एकूण खर्चापैकी ३० टक्के पैसा डॉक्टर आणि दवाखान्यावर खर्च करतो. मणिपूरमध्ये पिकत असुनही तेथील लोक फक्त मोठ्या सणामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमात नारळाचे दूध आणि साखर घालून याची स्वादिष्ट खीर आग्रहाने निमंत्रित केलेल्या पाहुण्यांना वाढतात.

इतर वेळी मात्र पारंपरिक भातच खातात. उत्पादन अतिशय कमी म्हणून मोजकेच शेतकरी पारंपरिक सेंद्रीय पद्धतीने काळ्या भाताची शेती करतात. मात्र शासनाच्या प्रयत्नांमधून मणिपूरचा हा तांदूळ आता उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड मध्येही काही शेतकरी प्रायोगिक तत्त्वावर पिकवत आहेत.

आसाममधील गोलपारा जिल्ह्यामधील दूधनोई तालुक्यातील उपेंद्र राभा या अल्पभूधारक शेतकऱ्‍याने त्यांच्या भात शेतीच्या एका कोपऱ्‍यात काळ्या भाताची दोन रोपे २०११ मध्ये लावली, त्यापासून १५० ग्रॅम बी मिळवून पुढील वर्षी ४८ किलो बी मिळविले.

त्यानंतर त्याने दीड एकर मध्ये हे बी पेरून १५०० किलो उत्पादन घेतले. आज उपेंद्रने १०० शेतकऱ्यांचा गट तयार केला असून, गटातील प्रत्येक शेतकरी एक एकरमध्ये या भाताचे उत्पादन घेत आहे. त्यांचा हा सर्व भात मुंबईमधील व्यापारी जागेवर खरेदी करून परदेशात पाठवतात.

चीनमध्ये एका आरोग्य परिषदेमध्ये गेलो असता मला या स्वादिष्ट भाताची चव पहिल्यांदा चाखायला मिळाली. मेघालयामध्ये सध्याचे मुख्यमंत्री कोनरॅड संगमा यांच्या निवासस्थानी मी पाहुणा म्हणून गेलो असतानाही परत एकदा ती स्वादिष्ट खीर चाखण्यास मिळाली. सध्या सुपर फूड म्हणून ओळखला जाणारा हा तांदूळ चीनमध्ये ६२ टक्के पिकवला जातो तर आपल्या देशात जेमतेम ५ टक्के पिकविला जातो.

त्यातील सणासुदीला थोडासा घरात ठेवून बाकी सर्व तांदूळ निर्यात केला जातो. आज आपल्या देशात भात पिकविणाऱ्या राज्यात त्याचबरोबर महाराष्ट्रामधील कोकण, सह्याद्रीचा भाग, पश्‍चिम महाराष्ट्र, नाशिक या क्षेत्रात आपल्या पारंपरिक भाताबरोबरच या भात लागवडीचा प्रयत्न करून शेतकऱ्यांनी दोन पैसे जास्त मिळविण्यास काय हरकत आहे.

केंद्र शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत आपल्याकडील कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रांनी यात पुढाकार घेऊन इच्छुक शेतकऱ्‍यांचा गट तयार करावा. या गटामार्फत सेंद्रीय पद्धतीने कालाजिरा तांदळाचे उत्पादन घेण्यास प्रोत्साहित करावयास हवे.

इंग्रजीमध्ये म्हण आहे, ‘दररोज एक सफरचंद तुम्हास डॉक्टरापासून दूर ठेवते.’ मी पुढे जाऊन असे म्हणेन ‘जेवणामधील एक लहान चमचा काळा भात तुम्हास अनेक रोगांपासून दूर ठेवू शकतो.’ शेवटी अन्न हे औषध म्हणूनच खावयास हवे.

ज्या अन्नापासून शरीरास सुरक्षा मिळते त्यालाच अन्नसुरक्षा म्हणतात. स्वतःला अन्नसुरक्षा प्राप्त करीत देशाला आरोग्याचा संदेश देत ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश आपण निश्‍चित अमलात आणू शकतो. परंतु यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्‍यांनी परावलंबित्व झुगारून स्वाभिमानाने जगावयास हवे, हाच तर या लेखाचा सकारात्मक संदेश आहे.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com