Women Self - Help Group
Women Self - Help Group Agrowon
यशोगाथा

एकदंत महिला ग्राम संघाची अर्थकारणाला बळकटी

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

ऐनपूर (ता.रावेर, जि.जळगाव) येथील एकदंत महिला ग्राम संघाने केळीचे उपपदार्थ तसेच कापडी पिशव्या, मास्क निर्मिती आदी उपक्रमांच्या मदतीने गावामध्येच रोजगार, वित्तीय स्रोत उभारला आहे. या गटाच्या माध्यमातून पन्नास महिलांना थेट बारमाही रोजगार मिळाला आहे.

ऐनपूर (ता.रावेर, जि.जळगाव) परिसर केळीसाठी प्रसिद्ध आहे. तापी नदीकाठच्या भागात गावशिवार असल्याने पिकांना बारमाही पाणी उपलब्ध आहे. गावातील उपक्रमशील महिलांनी २०१५ मध्ये जय श्रीकृष्ण महिला बचत गटाची स्थापना केली होती. या गटाने मिळविलेल्या यशानंतर इतर महिलांनीदेखील बचत गट स्थापन केले. हळूहळू गावात १७ महिला बचत गट तयार झाले. यातील सक्रिय महिला सभासदांनी एकत्र येऊन २०१८ मध्ये एकदंत महिला ग्राम संघाची स्थापना केली. गेल्या काही वर्षात या संघाने नजरेत भरणारी कामगिरी केली आहे. या संघाच्या ज्योत्स्ना पंडित महाजन या अध्यक्षा आहेत. गटामध्ये १७० महिला सभासद आहेत.

कापडी पिशव्या, मास्कची निर्मिती :
महिला संघातर्फे (women's team) वर्षभर कापडी पिशव्या, मास्कची निर्मिती केली जाते. रावेर, भुसावळ परिसरातील दुकानदार, सुपर शॉपीकडून पिशव्यांना मागणी असते. यामध्ये ५० महिलांना रोजगार मिळाला आहे. सरासरी १५, १८, २५ रुपयांना कापडी पिशव्यांची विक्री केली जाते. गटाची दररोज पाच हजार पिशव्या निर्मितीची क्षमता आहे. परंतु अनेकदा पिशव्यांबाबत आगाऊ नोंदणी नसते. यामुळे दर महिन्याला सरासरी ५० हजार पिशव्यांची निर्मिती केली जाते. गटाची दररोज १० हजार मास्क निर्मितीची (Mask) क्षमता आहे. ५, १० ते २० रुपये अशा किमतीचे मास्क या संघातर्फे तयार केले जातात.
लॉकडाऊनच्या काळात गटाला रावेर (जि.जळगाव) येथील तत्कालीन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मदतीने ग्रामपंचायतींकडून मास्क निर्मितीचे काम मिळाले होते. त्या काळात सुमारे तीन लाख मास्कची निर्मिती संघाने केली. लॉकडाऊनच्या काळात गटाने पोलीस, आरोग्य कर्मचारी, बँक, (Bank) तहसील कार्यालय आदी विभागातील कर्मचाऱ्यांना मास्कचे मोफत वितरण सामाजिक बांधिलकीतून केले. गेले सहा महिने प्रतिदिन सरासरी एक हजार मास्कची निर्मिती गटातर्फे केली जाते.

ग्रामपंचायतीतर्फे गटाला जागा :
जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या मदतीने महिला संघाला गावात ग्रामपंचायतीची जागा मिळाली. त्यात एक हजार चौरस फूट एवढे बांधकाम असून, त्यात शिवण केंद्र चालविले जाते. गेल्या वर्षभरात ५० महिलांना या केंद्रातून काम मिळाले आहे. या केंद्रात गरजू महिलांना गटातर्फे शिवण कामाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी पुढील काळात गटाला शासकीय यंत्रणांच्या मदतीने मास्टर ट्रेनर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संघाने या वित्तीय वर्षात १० लाख रुपये कर्जाची परतफेड केली आहे. संघाला अलीकडेच वीस लाख रुपये कर्ज उपलब्ध झाले आहे.

बऱ्यापैकी वित्तीय स्रोत :
गावात (Village) काम करताना महिला संघाला बऱ्यापैकी वित्तीय स्रोत तयार झाला आहे. दर महिन्याला शिवणाचे साहित्य, वीजबिल, केळी उपपदार्थ निर्मितीसाठी १५ ते १८ हजार रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता किमान ५० हजार रुपये नफा मिळतो. संघात बारमाही सक्रिय ५० महिलांना किमान २०० रुपये रोज मिळतो. पावसाळ्यात शिवण काम, वेफर्स निर्मितीला अडचणी येतात. मात्र नोव्हेंबर ते मे यादरम्यान शिवण, वेफर्स, केळी पीठ निर्मितीचे काम गतीने सुरू असते.

इन्फो
तज्ज्ञांशी संपर्क, परसबागेतून जनजागृती :
महिला संघाने (Women Team) परसबाग उपक्रम राबविला होता. यामध्ये वांगी व इतर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली होती. पाल (ता.रावेर) येथील कृषी विज्ञान (Agriculture Science) केंद्रातील विषय विशेषज्ञ डॉ.धीरज नेहेते, महेश महाजन यांच्या मदतीने परसबाग यशस्वी केली. लॉकडाऊनमध्ये संघाने परबागेत उत्पादित भाजीपाल्याचा गावातील गरजू महिलांना पुरवठा केला. तसेच आपापल्या शेतातही संघाच्या महिलांनी भाजीपाला लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. सध्या संघाच्या १५ महिला आपल्या शेतात टोमॅटोचे उत्पादन घेत असून, त्याची थेट रावेरमध्ये ग्राहकांना विक्री केली जाते. सुमारे सात एकरात १५ महिलांनी टोमॅटोची लागवड केली आहे.

शासकीय यंत्रणांनादेखील भाजीपाला पुरवठ्याची (Vegetable Supply) तयारी संघाने केली आहे. परंतु त्याबाबत आगाऊ नोंदणी किंवा करार होत नसल्याने भाजीपाला उत्पादनाचा प्रयोग, उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात अडथळा येत आहे. परसबाग उपक्रमातून गरोदर माता, महिला, मुलांना विविध जीवनसत्त्वांची आवश्यकता, जीवनसत्त्व उपलब्ध करून देणाऱ्या भाज्या, फळे याची जनजागृतीदेखील गावात करण्यात आली.

इन्फो
केळी वेफर्स, पीठ निर्मिती आणि विक्री :
संघातर्फे केळीचे पीठ, वेफर्सची निर्मिती केली जाते. संघाने दर महिन्याला १० किलो केळीचे पीठ पुरविण्याची क्षमता तयार केली आहे. आगाऊ नोंदणीनुसार केळीचे पीठ तयार केले जाते. केळीच्या पिठापासून शिरा, लाडू, शेव आदी उपपदार्थ तयार केले जातात. विविध फ्लेवरमधील केळीचे वेफर्सही तयार केले जातात. वेफर्स, चकली देखील आगाऊ नोंदणी किंवा ऑर्डरनुसार तयार करतात. वेफर्स १२०, १४० रुपये प्रति किलो, केळीचे पीठ १२० रुपये प्रति किलो आणि चकली ३०० रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जाते.
प्रक्रियेसाठी आवश्यक केळीची खरेदी गावातील शेतकऱ्यांकडून केली जाते. किमान ८०० आणि कमाल १००० रुपये प्रति क्विंटल या दरात गावातच केळी उपलब्ध होते. यामुळे वाहतूक खर्चात बचत होते. थेट खरेदीच्या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे शक्य झाले आहे. प्रक्रियेसाठी दरवर्षी किमान चार ते पाच टन केळीची गरज असते.
यंदा लॉकडाऊनमध्ये वेफर्स निर्मिती बंद होती. आता पुन्हा एकदा वेफर्स, केळी पीठ निर्मितीला गती मिळाली आहे. रावेर, भुसावळ, जळगाव येथे वेफर्सची विक्री केली जाते. यासाठी महिलांचे कुटुंबीय मदत करतात. प्रदर्शनांमध्ये संघाच्या सदस्या सहभागी होतात.येथे पिशव्या, मास्क, केळीच्या (Banana Product) उपपदार्थांची विक्री केली जाते. महिला संघाच्या (Women Team) विविध उपक्रमांना उमेद अभियानाचे अधिकारी अंकुश जोशी यांचे चांगले सहकार्य मिळते, असे संघाच्या अध्यक्ष ज्योत्स्ना महाजन सांगतात.
संपर्क : ज्योत्स्ना महाजन, ७५५८६४६९४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

Turtle Conservation Issue : रायगडमध्ये तापमानवाढीमुळे कासवसंवर्धन संकटात

Forest Fire Himachal : उत्तराखंडसारखीच आगीमुळे हिमाचलची अवस्था, भाजपचा हल्लाबोल, गावकऱ्यांचा इशारा

Summer Heat : उष्णता वाढली पारा ४५ अंश सेल्सिअसवर

Agrowon Podcast : गव्हाच्या भावात सुधारणा ; कापूस, सोयाबीन, हळद, तसेच काय आहेत गहू दर ?

SCROLL FOR NEXT